tipeharish.blogspot.com

Wednesday, November 16, 2022

वातावरणाची रचना (Structure of Atmosphere)

  1. तपांबर

  2. स्थितांबर

  3. आयनांबर

  4. बह्यांबर

  5. तपांबर:

    पृष्ठभागापासून ११ किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबरअसे म्हणतात. तपांबराची उंची अक्षवृत्त नुसार बदलत जाते. विषुववृत्तावर तपांबराची उंची १६किलोमीटर तर ४५ अंश अक्षवृत्तावर ही ११ किलोमीटर तर ध्रुवावर ती ८ किलोमीटर असते. तपांबराच्या थरात वाढत्या उंचीनुसार तापमान कमी-कमी होत जाते. १६० मीटर उंचीला तापमान १ अंश सेल्सिअसने कमी होते. वातावरणाच्या या थरात उष्णतेचे संक्रमन वहन,अभिसरण व उत्सर्जन या तिन्ही अवस्थांद्वारे होते . तपांबराच्या या थरात ढग, वादळे, पाऊस, विजा चमकणे व मेघगर्जना असे आविष्कार आढळून येतात.

    तपस्तब्धी :

    तपांबर व स्थितांबर यांना अलग करणाऱ्या तीन किलोमीटर जाडीच्या थरास तपस्तब्धी असे म्हणतात. या विभागात हवेचे तापमान उणे ५६ अंश सेंटिग्रेड असून ते सर्वत्र सारखे असते म्हणून या थरास तपस्तब्धी असे म्हणतात.

    स्थितांबर :

    तपस्तब्धीनंतर असलेल्या वातावरणाच्या थरास स्थितांबर असे म्हणतात. स्थितांबर या थराचा विस्तार ८० कि.मी. उंचीपर्यंत आहे. मात्र ऋतुमानानुसार व अक्षवृत्तानुसार स्थितांबर याचा विस्तार बदलत जातो. उन्हाळ्यात स्थितांबर या थराचा विस्तार हिवाळ्यापेक्षा जास्त असतो तर विषुववृत्तावर या थराचा विस्तार सर्वाधिक असून ध्रुवाकडे मात्र तो कमी-कमी होत जातो. वातावरणाच्या या थरात उष्णतेचे संक्रमण होत नाही. याशिवाय हवेची हालचाल आर्द्रता, मेघ व धूलिकण इत्यादींचा अभाव असतो.

    ओझोनांबर:

    स्थितांबरात २५ ते ४० किलोमीटरच्या दरम्यान ओझोन या वायूचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे वातावरणाच्या या थरास ओझोनांबर असेही म्हणतात. ओझोन हा थर सूर्याकडून येणारी अतिनील किरणांचे शोषण करतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण होते म्हणून या धरास पृथ्वीचे संरक्षक कवच किंवा संरक्षक छत्री असेही म्हणतात.

    आयनांबर :

    स्थितांबरानंतर असणाऱ्या वातावरणाच्या थरास आयनांबर असे म्हणतात. वातावरणाच्या या थरात मुक्त आयन असून ते विद्युतभारित असतात म्हणूनच या थरास आयनांबर असे म्हणतात. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे व अंतरिक्षातून येणाऱ्या अतिनील किरणांचे विकिरण होऊन वातावरणातील ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्यामध्ये विद्युतभाराची क्रिया व प्रतिक्रिया होऊन यांची निर्मिती होते. रेडिओ लहरी परावर्तित करीत असल्यामुळे बिनतारी संदेश पाठविणे शक्य होते. आयनांबर थराची उंची भूपृष्ठापासून ८० ते ५०० किलोमीटर पर्यंत असून या थरात हवा विरळ असून रेडिओ लहरी, रॉकेट उडान या प्रयोगात या थराचा शोध लागलेला आहे.आयनांबराचे उपथर असून ८० ते ९६ किलोमीटर उंची दरम्यान डी थर असून या घरातून रेडिओच्या दीर्घ लहरी परावर्तित होतात. ९६ ते १४० किलोमीटर उंचीच्या दरम्यान असलेल्या आयनांबराच्या या धरास ई थर किंवा केनिली हेवीसाईड थर असेही म्हणतात. आयनांबराच्या तिसऱ्या उपथरास अपलटन थर किंवा एफ थर असेही म्हणतात.

    बह्यांबर :

    पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५०० ते ७५० किलोमीटर व त्यापलीकडील वातावरणाच्या थरास बहिमंडल असे म्हणतात. इ.स. १९४९ मध्ये लेमन स्पीटझर यांनी या थरास बहिर्मडल असे नाव दिलेले आहे. वातावरणाच्या या थरात ऑक्सीजन, हायड्रोजन व हेलियम या वायूंचे सूक्ष्म कण मुक्तपणे वावरताना आढळतात. या थरात अणूंची हालचाल ऊर्ध्वगामी दिशेने होते. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचे अस्तित्व ऋण विद्युतभारित व धन विद्युत भारित असतात, म्हणून या थरास चुंबकीय मंडल असे म्हणतात.

वातावरणाचे घटक

हवामानशास्त्र : व्याख्या

‘हवामानशास्त्र ज्याला इंग्रजीमध्ये (Climatology) नावाने संबोधले जाते. या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील क्लाईमा (Clima) या शब्दापासून झालेली आहे.

व्याख्या

  1. पृथ्वीवरील विविध हवामानाचा नैसर्गिक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजेच हवामानशास्त्र होय.-डब्ल्यू.जी.मूर

  2. हवामानशास्त्र हे पृथ्वीवरील विविध हवामानाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे.- होव्हीर्ज व ऑस्टीन

  3. ह्वामानाशास्त्रात जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील हवामान व त्यांचा मानवावर व त्याच्या व्यवसायावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.

  4. पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रकारचे हवामान व त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हवामानशास्त्र असे म्हणतात.

वातावरण

  • पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.

  • पृथ्वीभोवतीअसलेल्या रंगहीन, गंधहीन व स्वादहीन थरास वातावरण असे म्हणतात.

वातावरण हे अनेक घटकांचे मिश्रण आहे. वातावरण हे प्रामुख्याने पुढील प्रमुख घटकांनी बनलेले आढळते.

  1. वायु

  2. पाण्याची वाफ / बाष्प

  3. धुलीकण

वायु (Gases):

वातावरण हे निरनिराळ्या वायुच्या मिश्रणांनी बनलेले आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन, कार्बनडाय ऑक्साईड व इतर वायु आढळतात.

वनायट्रोजन (N2):

नायट्रोजन वायू वजनाने जड असल्याने वातावरणाच्या खालच्या थरात आढळतो. वातावरणात या वायूचे प्रमाण सर्वात अधिक ७८.०८% आढळते. सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन व कुजने, भूगर्भातील तप्त लाव्हारसाचा उद्रेक इ. क्रियांद्वारे नायट्रोजन वायूचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतीची वाढ आणि संवर्धनासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. नायट्रोजन वायू निष्क्रिय आहे. झाडांच्या पेशी मजबूत करण्यासाठी नायट्रोजन वायूची गरज असते.

ऑक्सिजन(O2):

वातावरणात प्रमाण २०.९४% इतके आहे. सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन खूपच महत्त्वाचा वायू आहे म्हणूनच त्यास "प्राणवायू” असेही म्हणतात. जमीनीपासून जसजसे वातावरणाच्या वरच्या थरात जावे तसतसे ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमीकमी होत जाते. म्हणूनच अतिउंचीवर किंवा उंच शिखरावर जाताना गिर्यारोहकांना, वैमानिकांना कृत्रिम ऑक्सिजन वायूचे सिलेंडर बरोबर घेऊन जावे लागते. ज्वलन क्रियेसाठी ऑक्सिजन उपयोगी ठरतो.

कार्बन डाय ऑक्साईड (CO2):

वातावरणात कार्बनचे प्रमाण अस्थिर असते. वातावरणातील प्रमाण ०.०३% आहे. प्राण्यांचे श्वसन, ज्वालामुखी क्रिया, वनस्पतींचे विघटन इ. मुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होते. हा वायू वनस्पतींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वायूचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असले तरी त्याचे वातावरणातील प्रमाण कमी होत नाही कारण दिवसा वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषतात व रात्रीच्या वेळी उच्छवासाद्वारे कार्बन बाहेर सोडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वायू सूर्यकिरणांबरोबर आलेले अतिनिल किरण शोषतात. जमीनीलगतच्या थराचे तापमान संतुलित रहाते, मात्र औद्योगिकरण वाढल्याने व स्वयंचलीत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे.

ओझोन वायु (O3):

जमिनीलगत या वायूचे प्रमाण कमी आढळते हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायु .हा वायू भृपृष्ठापासून १५ ते ३५ कि.मी. उंची वरील वातावरणाच्या थरात पसरलेला आहे. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६% इतके अत्यल्प आहे. याला पृथ्वीची 'संरक्षक छत्री' असेही म्हटले जाते कारण ओझोन वायूच्या थरात सुर्यप्रकाशातील अतिनिल (Ultraviolate) किरणे शोषली जातात.

इतर वायू :

ऑरगॉन, निऑन, क्रेप्टॉन, झेनॉन वायूही वातावरणात आढळतात.

पाण्याची वाफ / बाष्प :

वातावरणात पाण्याची वाफ किंवा बाष्प वायूरूप अवस्थेत आढळते. वाळवंटी प्रदेशातही बाष्पाचे अल्प प्रमाण आढळते. सौरउर्जुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती वाफ वातावरणात येऊन मिसळते. हवेतील बाष्पकणांपासून पाऊस, धुके, दव आणि हिम यांची निर्मिती होते. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवा कोरडी किंवा दमट आहे हे ठरविले जाते. बाष्प मुळे वातावरणात विविध अविष्कार निर्माण होतात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात बाष्यांचे प्रमाण जास्त असते. उंचीनुसार तापमान कमी होत गेल्याने हवेची बाष्प धारणाशक्ती कमी होत जाते. हवा बाष्प संपृक्त होऊन मेघामुळे वृष्टी होते.बाष्पामुळे मानवी त्वचा मऊ व मुलायम राहते.

धूलिकण :

वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकण आढळतात. वातावरणातील वायू व बाष्प सोडून इतर जे घनरूप घटक वातावरणात मिसळलेले आढळतात, त्यांना धूलिकण असे म्हणतात. धूलिकणांचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते याशिवाय त्यांचा आकारही भिन्न-भिन्न असतो. धूलिकणांची निर्मिती नैसर्गिक व मानवी घटकांद्वारे होते. यात मातीचे कण, धुराचे कण, तंतू, जीवजंतू व पालापाचोळ्याचे कण अशा कणांचा समावेश होतो. वजनाने जड असणारे धूलिकण वातावरणाच्या खालच्या थरात तर हलके धूलिकण वातावरणाच्या वरच्या थरात असतात. धूलिकण सूर्याकडून येणारी सौरशक्ती वातावरणात शोषून घेतात. याशिवाय सौरशक्तीचे विकिरण व परावर्तन धूलिकणाद्वारे होत असते. वातावरणात असणाऱ्या याच धूलिकणांमुळे आपणास सूर्योदय व सूर्यास्त होण्यापूर्वी संधिप्रकाश दिसून येतो.

Monday, November 14, 2022

माल्थसचा लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त

माल्थसचा लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त

थॉमस रॉबर्ट माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने 1798 मध्ये लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त 'An Essay on the Principles of Population as it affects Future Improvement of Society' या आपल्या संशोधन ग्रंथात मांडला. लोकांचे दुःख व दारिद्र्य का निर्माण होते याचे उत्तर देण्याच्या दृष्टीने माल्यसने लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडला. लोकांच्या दुःखाला लोकच जबाबदार आहेत, बेकारी, दारिद्र्य, उपासमार, रोगराई महामारी व सामाजिक कलह यासाठी वाढती लोकसंख्याच जबाबदार आहे असे प्रतिपादन केले.

गृहीतके

  1. मानवाला जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे.
  2. स्त्री-पुरुषांमधील आकर्षण ही कायम राहणारी गोष्ट असून ती भविष्यकाळातही बदलणार नाही. म्हणजेच भिन्नलिंगी व्यक्तीमधील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या सतत वाढत राहते.

सिद्धान्त

लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त पुढील पाच मुद्द्यांमध्ये मांडला आहे.

  • लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने
  • अन्नाधान्न वाढ अंकगणिती श्रेणीने
  • लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल
  • नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय
  • प्रतिबंधात्मक उपाय
    • लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने:

    माल्यसच्या मते स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गतः जबरदस्त लैंगिक आकर्षण असते व या आकर्षणामधून प्रजोत्पादन वाढते. दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्या भूमिती श्रेणीने म्हणजे दुपटीने वाढते. दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्या 1, 2, 4, 8, 16, 32, 64 या पद्धतीने वाढत जाते.

    • अन्नधान्य वाढ गणितीय श्रेणीने :

    माल्यस यांच्या मते अन्नधान्याची वाढ ही अंकगणिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या गतीने होते. दर 25 वर्षांत अन्नधान्याचे उत्पादन या गतीनेच वाढते.

    • लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल :

    दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्यावाढ भूमिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 4, 8, 16, 32, 64 या गतीने वाढते तर याच काळात अन्नधान्याची वाढ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या अंकगणिती श्रेणीने वाढते. म्हणजेच लोकसंख्यावाढ ही अन्नधान्याच्या वाढीपेक्षा अधिक असते. त्यामुळे लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल निर्माण होतो. परिणामत: अनेक लोकसंख्याविषयक समस्या निर्माण होतात. उदा. उपासमार, दारिद्र्य, भूकबळी, कुपोषण इत्यादी.

    • नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय:

    लोकसंख्यावाढ ही अन्नधान्य उत्पादनापेक्षा जास्त असल्याने दोन्हींमध्ये असमतोल निर्माण होतो, असमतोल निर्माण झाल्यानंतर निसर्ग स्वतः लोकसंख्यावाढीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, दारिद्र्य, कुपोषण, निःसत्व आहार, साथीचे रोग, इतर रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप, युद्धे, इत्यादी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत जाते व त्यामुळे लोकसंख्या कमी होते.

    • प्रतिबंधात्मक उपाय :

    मानवाला वाढत्या लोकसंख्येवर स्वतःलाच नियंत्रण करावे लागते. मानवाला बुद्धिसामर्थ्य लाभले असल्यामुळे काही वेळा निसर्गाच्या नियंत्रणापूर्वीच तो प्रतिबंधात्मक उपाय योजतो. मानव स्वेच्छेने जन्मदरावर बंधने आणतो या संदर्भात माल्थसने खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. (अ) संयम : माल्यसने उशिरा लग्न करणे, नैसर्गिक संयम, ब्रह्मचर्य पालन, घटस्फोट,विवाहोत्तर संयम इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. (ब) शिक्षण: शिक्षणामुळे लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्याची समज निर्माण होते. (क) साधनसंपत्तीत अधिक लोकसंख्येची पोषणक्षमता विज्ञान व तंत्रज्ञानाच्याप्रगतीमुळे नवनवीन साधनसंपत्ती शोधता येते

    सिद्धान्तावरील आक्षेप / टीका:

    • भूमिती श्रेणीने वाढ :

    माल्यसने लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत आहे असे मत मांडले आहे, परंतु प्रत्यक्षात जगातील विविध भागात लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीने झालेली आढळत नाही. उलट, काही पाश्चात्त्य देशात तर लोकसंख्येत घट श्रेणीने वाढत आहे.

    • अन्नधान्य उत्पादनात गणिती श्रेणीने वाढ :

    अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने वाढत आहे. हे मान्यसचे मतही चुकीचे आहे. माल्यसने शेतीक्षेत्रातील विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा व संशोधनाचा परिणाम लक्षात घेतला नाही. तसेच सुधारित बी-बियाणे, शेती अवजारे, यंत्रे व कीटकनाशकामुळे जगातील काही भागात शेती उत्पादनात गणिती श्रेणीपेक्षा अधिक पटीने वाढ होत आहे.

    • अन्नधान्य व लोकसंख्या यामध्ये नेहमीच असमतोल नसतो :

    लोकसंख्या- वाढ ही अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा जास्त जास्त असल्यामुळे यांच्यामध्ये असमतोल निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होतात असे म्हटले आहे. परंतु टीकाकारांच्या मते, बहुतांशी वेळा बऱ्याच देशात अशा प्रकारचा असमतोल असल्याचे आढळत नाही. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याचे आढळते. उदा., संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्राईल इत्यादी राष्ट्र अन्नधान्याची निर्यात करतात.

    • स्त्री-पुरुषांमधील आकर्षणामुळे लोकसंख्येत अपरिहार्य वाढ:

    माल्थसने स्त्री-पुरुषातील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्यावाढीचा वेग कायम राहणार असे मत मांडले. परंतु माल्थसने जरी लैंगिक आकर्षण असले तरी त्यामुळे लोकसंख्यावाढ अटळ ठरते हे लक्षात घेतले नाही. उदा., फ्रान्समध्ये लैंगिक आकर्षण तेवढेच असले तरी आपला सुधारित राहणीमानाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी त्या लोकांनी संयमाने लोकसंख्यावाढ मर्यादित ठेवली आहे. कुटुंबनियोजनाची नवी साधने व सामाजिक बदलामुळे माल्यसचे भाकीत खोटे ठरविले आहे.

    • लोकसंख्यावाढ म्हणजे संकट :

    कॅनन यांच्या मते, लोकसंख्यावाढ श्रमशक्तीत वाढ ही वस्तुस्थितीही आपण विसरता कामा नये.

    • लोकसंख्येचे प्रतिबंधात्मक उपाय लोकांना न पेलणारे:

    लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय सुचविलेले होते, त्यांचा वापर अतिशय मर्यादित प्रमाणातच होऊ शकेल. उशिरा लग्न, नैतिक संयम, ब्रह्मचर्य इ. सर्वसामान्य व्यक्ती या मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता खूपच कमी असते.

    सिद्धान्ताचे महत्त्व / टीका:

    • माल्थसने पूर्वीच्या विचारांचे संकलन करून विचारात एकसुसूत्रता व नियमन आणून लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडला.

    • माल्यसच्या लोकसंख्यावाढीच्या सिद्धान्तामुळे प्रथमच लोकसंख्येचे प्रश्न व समस्यांचा सामाजिक शास्त्राच्या अभ्यासात समावेश करण्यात आला.

    • माल्थसच्या सिद्धान्तामुळे लोकसंख्या समस्यांना शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झाले.

    • माल्यसच्या सिद्धान्तामुळे लोकसंख्येच्या समस्यांविषयी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत, नियोजनकार यांचे लक्ष वेधले गेले

    • सध्याही अनेक देशांच्या लोकसंख्यावाढीच्या बाबतीत माल्यसचा सिद्धान्त काही अंशी बरोबर ठरतो

    Sunday, November 13, 2022

    जागतिक लोकसंख्येचे वितरण

    जागतिक लोकसंख्येचे वितरण

    दाट किंवा जास्त जास्त लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 200 पेक्षा अधिक घनता) :

    ज्या ठिकाणी प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, खनिजे, पाणीपुरवठा इत्यादी घटक अनुकूल असतात त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आढळते. जगाच्या ज्या प्रदेशात शेतीबरोबरच उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे त्या प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते.

    कृषीप्रधान दाट लोकसंख्येचे प्रदेश:

    भूमध्य सामुद्रिक हवामान, मोसमी हवामान प्रदेशातील चीन, भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगला देश, श्रीलंका, कोरिया, नेपाळ, भूतान इत्यादी देशांचा समावेश होतो. भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू नद्यांचा मैदानी प्रदेश, चीनमधील हो हँग हो, यांगत्से, यांगत्सिकंग, म्यानमारमधील इरावती, पाकिस्तानातील सिंधू इत्यादी सुपीक गाळाच्या मैदानी प्रदेशांमुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. या प्रदेशात सरासरी लोकसंख्येची घनता 200 पेक्षा अधिक आहे, तर काही देशात याहीपेक्षा लोकसंख्येची घनता जास्त आढळते. आशिया खंडातील बांगला देशात दर चौ.कि.मी. ला 1253, भारतात 460, पाकिस्तान 281, श्रीलंका 340, नेपाळ 202 या देशांत लोकसंख्येची घनता 200 पेक्षा जास्त आहे.

    उद्योगप्रधान दाट लोकसंख्येचे प्रदेश:

    जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, बेल्जिअम, डेन्मार्क, स्पेन, रशिया (युरोपीय), पोलंड, इटली, जपान, कॅनडा, संयुक्त संस्थानचा पूर्व व ईशान्य भाग इत्यादी देशांचा समावेश होतो. खनिजाची उपलब्धता, वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास, भांडवल पुरवठा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास, नागरिकीकरण, उच्च राहणीमान, दरडोई उत्पादन जास्त इत्यादी कारणांमुळे लोकसंख्येची घनता जास्त आढळते. ग्रेट ब्रिटनमध्ये 279, जर्मनीत 240, इटलीमध्ये 206, नेदरलँड 507, जपानमध्ये 348

    मध्यम लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 50 ते 200 घनता):

    उदरनिर्वाहक व्यापारी शेतीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. जगातील संयुक्त संस्थानचा मध्यभाग, दक्षिण कॅनडा, पूर्व युरोप, आफ्रिकेचा उष्ण कटिबंधीय प्रदेश, दख्खनचे पठार, मध्य चीन, नैर्ऋत्य रशिया, मेक्सिकोचा दक्षिण भाग, ब्राझीलचा पूर्व व ईशान्य भाग, चिलीचा मध्यभाग इत्यादी प्रदेशांत लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. या प्रदेशात शेतीबरोबर लाकूडतोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम इत्यादी व्यवसायांचा विकास झालेला असल्याने येथे लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते.

    कमी किंवा विरळ लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 50 पेक्षा कमी घनता ):

    ज्या प्रदेशात भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल स्वरूपाची असते, अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. जगातील अतिउष्ण, अतिशीत, अतिउंच, घनदाट जंगले, इत्यादी प्रदेशांत लोकसंख्या विरळ आढळते.

    जगातील अतिउष्ण वाळवंटी प्रदेश :

    सहारा, कलहारी, अटाकामा, घरचे वाळवंट, गोबीचे वाळवंट, कोलोरेंडो, अरबस्तान, ताकालामांकनचे बाळवंट, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे वाळवंट इत्यादी वाळवंटी प्रदेशात अतिजास्त तापमान व कमी पर्जन्य या प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते.

    अतिशीत ध्रुवीय प्रदेश:

    जगातील अलास्का, सैबेरिया, ग्रीनलंड, अंटार्क्टिका. उत्तर ध्रुवीय प्रदेश इत्यादी प्रदेशांचा यामध्ये समावेश होतो. या प्रदेशात तापमानाचे प्रमाण अतिशय कमी, हिमाच्छादित भाग व उदरनिर्वाह साधनांच्या अभावामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते तर अंटार्क्टिका खंड हा जवळजवळ निर्मनुष्य आहे.

    अतिउंच पर्वतीय प्रदेश:

    यामध्ये रॉकी, अँडीज, हिमालय, आल्प्स, किलीमांजारो इत्यादी पर्वतीय प्रदेशांचा समावेश होतो. या प्रदेशात तीव्र उतार, प्रदेशाची दुर्गमता, ओबडधोबड भूपृष्ठरचना, अपरिपक्व मृदा, हिमवृष्टी इत्यादी मानवी जीवनासाठी अनुकूल नसतात.

    घनदाट जंगलाचा प्रदेश :

    यामध्ये विषुववृत्तीय घनदाट जंगलाचा प्रदेश, अॅमेझॉन, कांगो व झरे नदीच्या खोऱ्यात घनदाट जंगलाचा प्रदेश - दमट व रोगट हवामान, दलदलयुक्त जमीन, अति पर्जन्य, उपद्रवी किटक इत्यादी कारणांमुळे हे प्रदेश मानवी जीवनास प्रतिकूल असतात. त्यामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते
    .

    Saturday, November 5, 2022

    पर्यटन भूगोल

    पर्यटन हा शब्द इंग्रजीतील  Tourism या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. Tourism हा शब्द Tour या शब्दापासून तयार झाला आहे. Tour हा शब्द लॅटिन भाषेतील Tornos या शब्दापासून तयार झाला आहे. Tornos या शब्दाचा अर्थ Journey (प्रवास) सा होतो. हा प्रवास जागेसंबंधी शोध घेणे, शिकणे, अभ्यास करणे तसेच व्यवसाय किंवा मनोरंजनासाठी होत असतो.

    व्याख्या : 
    • परदेशी व्यक्तीचे एखाद्या देशात प्रदेशात किंवा शहरात आगमन, वास्तव्य, भ्रमंती आणि तेथून त्याच्या मूळच्या ठिकाणी जाणे म्हणजेच पर्यटन होय.
    • एखाद्या व्यक्तीने आपल्या मूळच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून एका दिवसापेक्षा जास्त प्रवास करून मूळ ठिकाणी आल्यास पर्यटन असे म्हणतात.
    • एखाद्या व्यक्तीने आपल्या मूळच्या ठिकाणापासून केलेला प्रवास, वास्तव्य आणि भ्रमंती म्हणजे पर्यटन होय.
    • एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कायमस्वरूपी वास्तव्य न करता ते ठिकाण सोडून फुरसतीच्या वेळी मनोरंजन, व्यवसाय व इतर विविध उद्देश पूर्ण करून परत आपल्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी येणे म्हणजे पर्यटन होय.
    पर्यटनाचे स्वरूप: 
    • पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप 
    • पर्यटनाचे ऐतिहासिक स्वरूप 
    • पर्यटनाचे सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप  
    • वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप
    • अनेकविध स्वरूप
    • मनोरंजनात्मक स्वरूप
    • अनुत्पादक स्वरूप
    • गतिशील व स्थिर स्वरूप
    • पर्यटनाचे हंगामी स्वरूप

    पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप: पर्यटन हे मोठ्या प्रमाणावर भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. या भौगोलिक घटकांत भूमिस्वरूपे, हवामान, जलाशये, वनस्पती व प्राणी इ. समावेश होतो. पर्यटक हे उंच गिरिशिखरे, थंड हवेची ठिकाणे, बर्फाच्छादित शिखरे, धबधबे, समुद्रकिनारे पूळण (बीच), जंगले, सरोवरे, बेटे, तलाव, नद्यांचे उगम व संगम, वन्य पशुपक्षी इत्यादी अनेक भौगोलिक स्थळांना भेटी देतात. त्यामुळे या सर्व बाबींतून पर्यटनाला भौगोलिक स्वरूप प्राप्त होते.

    पर्यटनाचे ऐतिहासिक स्वरूप : गड, कोट, दुर्ग, राजधान्या, तहस्थळे, राजवाडे, युद्धभूमी, ऐतिहासिक समाधी व स्मारके हे पर्यटनाचे ऐतिहासिक घटक आहेत. अशा ऐतिहासिक ठिकाणांना पर्यटक भेटी देतात यातूनच पर्यटनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होते.

    पर्यटनाचे सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप : वस्तुसंग्रहालये, लेण्या, शिल्पे, नृत्य, गायन, संगीत, वेशभूषा, शिक्षण, सण, उत्सव, कला हे सांस्कृतिक घटक आहेत. धार्मिक स्थळे (चर्च, मंदिर, ईदगाह, स्तूप, पॅगोडा, गुरुद्वारा) व पवित्र ठिकाणांना पर्यटक भेटी देण्यासाठी पर्यटन करतात. त्यामुळे पर्यटनास सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

    पर्यटनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप:  पर्यटनामधे प्रवास आणि वास्तव्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पर्यटकाने आपल्या राहत्या ठिकाणापासून व कार्यापासून दूर जाऊन मनोरंजन व आनंद मिळविण्यासाठी केलेला प्रवास हा पर्यटनाचा प्रमुख हेतू असतो. या व्यवसायात आनंद व मनोरंजन मिळविणे हे मूळ वैशिष्टय आहे.

    पर्यटनाचे अनेकविध स्वरूप : पर्यटनामध्ये पर्यटन, पर्यटक, प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था, प्रवासी मार्गदर्शक, पर्यटन संस्था व संघटना, विक्रेते इत्यादी अनेक घटकांचा समावेश होतो. म्हणून पर्यटनाला अनेकविध स्वरूप प्राप्त झाले आहे.

    पर्यटनाचे मनोरंजनात्मक स्वरूप :पर्यटनाचा मुख्य उद्देश पर्यटकांचे मनोरंजन होणे हा आहे. पर्यटक आनंद मिळविण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणे, सूर्यस्नान, समुद्रात पोहणे, पोलो, धनुर्विद्या, स्कुबा डायविंग, बर्फावरील घसरगुंडी, गिर्यारोहण करणे, जंगलसफरी करणे, आल्हाददायक हवामानाचा आस्वाद घेणे, निसर्गसौंदर्य पाहणे इ. मुळे पर्यटनाचे स्वरूप मनोरंजनात्मक बनले आहे.
    पर्यटनाचे अनुत्पादक स्वरूप : पर्यटन व्यवसायात कोणत्याही वस्तूचे प्रत्यक्ष उत्पादन होत नाही. पर्यटकाचा पर्यटन करीत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात किंवा उपजीविकेच्या धंद्यात रूमावेश नसतो. अशा प्रकारे पर्यटनात अनुत्पादक हा गुण दिसून येतो.

    पर्यटनाचे गतिशील व स्थिर स्वरूप : पर्यटनात प्रवास व मुक्काम या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रवास हा गतिशील घटक असून त्यामुळे पर्यटनामध्ये गतिमानता प्राप्त होते. प्रवासात पर्यटकाला वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करावा लागत असल्यामुळे तो एका ठिकाणी स्थिरावतो. त्यामुळे त्याला स्थिरता प्राप्त होते.

    पर्यटनाचे हंगामी स्वरूप : पर्यटन हे अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे असते. पर्यटनाचा उद्देश, पर्यटन स्थळाचे अंतर, पर्यटकाची आर्थिक परिस्थिती या घटकांवर पर्यटनाचा कालावधी आधारित असतो. तसेच पर्यटन हे ऋतूनुसार व हंगामानुसार केले जाते म्हणजेच पर्यटनावर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूंचा परिणाम होतो. त्यामुळे एका विशिष्ट ऋतूत विशिष्ट पर्यटन स्थळी पर्यटन करतात. उदा., उन्हाळयात थंड हवेच्या तर पावसाळ्यात याच्या ठिकाणी पर्यटक पर्यटनास जातात. त्यामुळे पर्यटनाला हंगामी स्वरूप प्राप्त झाले आहे

    पर्यटन भूगोलाची व्याप्ती
    पर्यटनाची व्याप्ती काळानुरूप बदलत आहे. प्राचीन काळी पर्यटन, देवधर्म, यात्रा, जत्रा यांना पायी किंवा बैलगाडीने प्रवास केला जात होता. मध्ययुगात धार्मिकतेकडून पर्यटन शोधमोहिम, नवीन खंडाचा शोध लावणे अशा बाबीकडे वळले. पण आधुनिक कालखंडात पर्यटनाची व्याप्ती पूर्णपणे बदलली दिसते. मनोरंजनासाठी फिरायला जाणे, आनंद मिळविणे, मौज-मजा करणे अशा पध्दतीने पर्यटन केले जाते. सध्याच्या पर्यटनाला आधुनिकतेची आर्थिक विकासाची व सुबत्तेची जोड मिळाली आहे.

    पर्यटनाचे आधुनिकीकरण :- पूर्वी पर्यटन हे पायी, बैलगाडी, घोडागाडी अशा स्वरूपाचे होते. मुक्काम हा ठराविक गावात किंवा धर्मशाळेत असायचा, राहण्याची व जेवणाची पर्यटक जास्त चिंता करत नव्हते. परंतु अलिकडे पर्यटनाची व्याप्ती बदलली आहे. मोटारगाडी, रेल्वे, विमान या वाहतूक साधनाने प्रवास करतात. तर हॉटेल्स, लॉज, मोटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जेवणाची व राहण्याची सोय करतात. पद्धतीने पर्यटनामध्ये आधुनिकीकरण आले आहे.

    पर्यटनातून रोजगारनिर्मिती :-पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला सेवा पुरविण्यासाठी विविध टप्प्यावर रोजगार उपलब्ध होतात वस्तू विक्री, दुकानदार, भाजीपाला, दूध, विक्रेता, हॉटेल कामगार, गाईड व इतर असे हजारों प्रकारची कामे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोक करतात. त्यातूनच त्यांना रोजगार उपलब्ध होतो.

    पर्यटनातील व्यक्तीसमूह :-पर्यटनामध्ये दोन प्रकारचे व्यक्तीसमूह आहेत. एक पर्यटकांचा व्यक्तीसमूह व दुसरा त्यांना सोयी- सुविधा देणाऱ्या व्यक्तींचा समूह आहे. पहिल्या गटात पर्यटन हे वैयक्तिक किंवा सामूहिक असू शकते. यामध्ये कुटुंब, शाळेच्या सहली, मित्र-मैत्रिणींचा प्रवास व वृद्ध व्यक्तींचा प्रवास अशा पध्दतीने कार्यरत आहे. तर दुसरा गट हॉटेल चालक-मालक, किरकोळ व होलसेल दुकानदार, ट्रान्सपोर्ट, मार्गदर्शक या दुसऱ्या गटाचा सहभाग पर्यटन व्यक्ती समुहामध्ये महत्त्वाचा आहे.

    पर्यटकांची वाढती लोकसंख्या :-सध्या मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून तो पर्यटनासाठी बाहेर पडतो. पर्यटन व्यवसायात आधुनिक सोयी-सुविधा आल्या आहेत. प्रवास व राहण्याच्या उत्तम सोयी, घरबसल्या बुकिंग, पर्यटन स्थळांची माहिती, माहितीपूर्व मार्गदर्शक या सर्व बाबींच्यामुळे पर्यटनामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे. 

    पर्यटनाचा सर्वांगीण अभ्यास :-पर्यटन स्थळे, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटनाचे व्यवस्थापन व नियोजन, महत्त्व व समस्या या व इतर सर्व अंगांनी पर्यटनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त आर्थिक घटक डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही, तर पर्यटनातून सामाजिक व सांस्कृतिक विकास कसा होईल. या बाबींचा पक्का विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटनाचा विविध दृष्टीकोणातून अभ्यास करणे गरजेचे आहे.

    पर्यटनातून नाविन्यतेचा शोध घेणे :- नवीन पर्यटन स्थळे, नवीन प्रदेश, विविध वस्तू, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो पहिल्यांदाच अनुभवतो. त्यावेळेस त्याला त्यामध्ये नाविन्यपूर्णतः वाटते. पर्यटक एखाद्या पर्यटन स्थळाला दुसऱ्यांदा भेट देण्यासाठी येतो, त्यावेळेस तो तेवढा खुष नसतो, जेवढा तो पहिल्यांदा भेट देताना असतो. यातून नाविन्यता ही प्रत्येक मानवाला आनंद देणारी असते.

    पर्यटनातील समस्या :-पर्यटनाची व्याप्ती अभ्यासताना त्याच्या समस्याही अभ्यासणे खूप गरजेचे आहे. पर्यटकांना असनाऱ्या समस्या, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी असणारे प्रश्न, पर्यटनातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक समस्या, पर्यावरणाची हानी या सर्व प्रश्नांचा अभ्यास पर्यटनाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. 

    पर्यटन भूगोलाचे महत्त्व

    देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत :-देशी व विदेशी पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळत असतो. रोजगार निर्मिती, पर्यटन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व निवास व्यवस्था या सर्व ठिकाणी पर्यटक पैसा खर्च करत असतो. या सर्व क्षेत्रातून कर स्वरूपात हा पैसा काही प्रमाणात देशाच्या तिजोरीत पडत असतो. यातूनच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

    प्रादेशिक समतोल राखण्यास मदत :-मोठ्या खंडप्राय देशात काही भाग विकसीत तर काही प्रदेश अविकसित अशा पध्दतीचे स्वरूप पहावयास मिळते. यामध्ये असे दिसून येते की, अप्रगत प्रदेशात पर्यटनाच्या संधी जास्त असतात. उदा. भारतातील ईशान्य भारत पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्याठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ईशान्य भारत सुद्धा विकसीत झाल्यास जो प्रादेशिक असमतोल आहे तो कमी होईल. 

    बाजारपेठांची निर्मिती :-पर्यटन स्थळाला भेट देवून झाल्यानंतर तेथील वस्तू खरेदी करणे, आठवण म्हणून घेणे, प्रसाद म्हणून घेणे किंवा आपल्या जवळच्या नातलगासाठी मित्रासाठी वस्तू खरेदी करणे हा पर्यटकाचा आवडता छंद असतो. त्यातूनच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी खेळणी, कपडे, पूजा साहित्य, प्रसाद, ऐतिहासिक वस्तू, प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू इ. खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यातूनच तेथील बाजारपेठांचे विस्तारीकरण व विकास होतो.

    देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत :-देशी व विदेशी पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळत असतो. रोजगार निर्मिती, पर्यटन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व निवास व्यवस्था या सर्व ठिकाणी पर्यटक पैसा खर्च करत असतो. या सर्व क्षेत्रातून कर स्वरूपात हा पैसा काही प्रमाणात देशाच्या तिजोरीत पडत असतो. यातूनच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

    प्रादेशिक समतोल राखण्यास मदत :-मोठ्या खंडप्राय देशात काही भाग विकसीत तर काही प्रदेश अविकसित अशा पध्दतीचे स्वरूप पहावयास मिळते. यामध्ये असे दिसून येते की, अप्रगत प्रदेशात पर्यटनाच्या संधी जास्त असतात. उदा. भारतातील ईशान्य भारत पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्याठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ईशान्य भारत सुद्धा विकसीत झाल्यास जो प्रादेशिक असमतोल आहे तो कमी होईल. 

    बाजारपेठांची निर्मिती :-पर्यटन स्थळाला भेट देवून झाल्यानंतर तेथील वस्तू खरेदी करणे, आठवण म्हणून घेणे, प्रसाद म्हणून घेणे किंवा आपल्या जवळच्या नातलगासाठी मित्रासाठी वस्तू खरेदी करणे हा पर्यटकाचा आवडता छंद असतो. त्यातूनच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी खेळणी, कपडे, पूजा साहित्य, प्रसाद, ऐतिहासिक वस्तू, प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू इ. खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यातूनच तेथील बाजारपेठांचे विस्तारीकरण व विकास होतो.

    जागतिक सामंजस्य निर्माण होण्यास मदत :-दोन देशांमध्ये असणारे भांडण तरे यामुळे त्या देशातील संघर्ष निर्माण होतो. त्या देशांमधील व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण होतात. परंतु या दोन्ही देशातील पर्यटक जर त्यांच्या देशात पर्यटनासाठी गेले तर सत्य परिस्थिती समजते. उदा. भारत व पाकिस्तानातले पर्यटक एकमेकांशी सौहार्दपूर्ण वातावरणात पर्यटनासाठी गेले तर सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल.

    संस्कृतिचे जतन :-पर्यटक पर्यटनासाठी ज्या प्रदेशात जातो तेथील संस्कृती ही त्याच्यासाठी भिन्न असते. त्यातील तो चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. तसेच त्याची जी संस्कृती आहे त्याचा ठसासुध्दा त्याची भाषा, वेश, आवड-निवड, भोजन यातून त्या प्रदेशातील लोकांना एकप्रकारे सांगत असतो. थोडक्यात भिन्न संस्कृतीच्या व्यक्ती पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या तर संस्कृतीची देवाण-घेवाण होते. तसेच संस्कृतीचे जतनही होते.

    पर्यटनातील आधुनिक कल :
    पर्यावरणपूरक / पारिस्थितिकी पर्यटन (इको टुरिझम) : अनियंत्रित व अनिर्बंध पर्यटन वाढीमुळे पर्यटन स्थळाचे ठिकाणावरील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होऊन त्याचा पर्यटनाच्या विकासावर वाईट परिणाम होतो. पर्यटनाचा पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळून त्याचे संवर्धन करण्यासाठी तसेच स्थानिक लोकांच्या विकासासाठी पर्यटनाचा उपयोग व्हावा यासाठी अलीकडच्या काळात पर्यावरण पूरक पर्यटनाची सुरुवात झाली आहे. पर्यटन स्थळावरील नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांना हानी न पोहोचवता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद दिला जातो. या प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले जाते. या प्रकारच्या पर्यटनामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद देण्याबरोबरच नैसर्गिक व सांस्कृतिक साधनसंपत्तीचे संवर्धन होते. पर्यटनाचा विकास करताना प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध घातले जातात व उपलब्ध नैसर्गिक व स्थानिक सुविधांच्या साह्याने पर्यटकांना सोयी सुविधा पुरविल्या जातात.

    पर्यावरणपूरक  / पारिस्थितिकी पर्यटनाच्या व्याख्या
    • पारिस्थितिकीय पर्यटन म्हणजे पर्यावरण संवर्धन करणारा, स्थानिक लोकांचे कल्याण साधणारा,स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि पर्यावरण शिक्षणासाठी केला जाणारा प्रवास होय.
    • पर्यावरणीय पर्यटन म्हणजे आपल्या आवडीच्या नैसर्गिक किंवा पारिस्थितिकीय क्षेत्रात पर्यावरण संवर्धन करणे व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नैसर्गिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांचे निरीक्षण करणे आणि पर्यावरणाबद्दल जाणून घेण्यासाठी केलेले पर्यटन होय.
    पारिस्थितिकीय पर्यटनाचे महत्व : 
    • पारिस्थितिकीय पर्यटनामुळे प्रत्येक देशातील नैसर्गिक सृष्टिसौंदर्याचे जतन व संवर्धन होते.
    • पृथ्वीतलावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन होते.
    • स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात व त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावते.
    •  वेगवेगळ्या समुदायाच्या संस्कृतीतील विविध घटकांचेअध्ययन करता येते.
    •  पर्यावरणीय संवर्धनासाठी जनजागृती करण्यास मदत होते.
    •  निसर्गाशी जवळीक निर्माण होते.
    • नामशेष होत चाललेल्या पशुपक्ष्यांच्या जातींच्या संवर्धनासाठी या पर्यटनाचा उपयोग होतो.
    • लोकशाहीविषयक चळवळी व मानवी हक्काचे संरक्षण होते.

    कृषी पर्यटन:  कृषी पर्यटनामध्ये शेती व पर्यटन ही दोन मुख्य क्षेत्रे एकत्र आणली जातात. पर्यटन क्षेत्रामध्ये विस्तारण्याची क्षमता आहे तर कृषी क्षेत्रामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे कृषी क्षेत्र व पर्यटन क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांचा फायदा होत आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतात पर्यटकांसाठी निवास, भोजन, शेतातील कामात सहभाग, शेती व शेतीपूरक व्यवसायांचे ज्ञान यांची संधी उपलब्ध करून देणे होय. कृषी पर्यटनामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय शेतकऱ्यांच्या घरांमध्ये किंवा त्यासारख्या सोयी बांधून घेऊन उपलब्ध करून दिल्या जातात. येथील वातावरण हे ग्रामीण भागातील जीवनाचा आनंद देणारे असते. धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती व निवांत क्षण मिळावेत यासाठी लोक शांत, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित अशा दुर्गम भागातील कृषी पर्यटन केंद्रास भेट देण्यासही तयार असतात

    कृषी पर्यटन म्हणजे पर्यटकाची शेतावरील सहल, शेतावरील फेरफटका, धावपळीच्या व कृत्रिम जीवनशैलीला कंटाळून काही दिवसांसाठी शेतकऱ्यांच्या शेतातील घरी जाऊन राहणे व त्याबदल्यात शेतकऱ्यांना मोबदला देणे होय. 

    कृषी पर्यटन विकास महामंडळाची (Agro Tourism Development Corporation) स्थापना 16 मे, 2004 रोजी झाली. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वतःच्या शेतात कृषी पर्यटन केंद्र निर्माण करून कृषी पर्यटनाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व प्रतिष्ठा मिळू शकते हे सिद्ध केले. त्यामुळे कृषी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढू लागला. सन 2004 मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील माळेगाव येथील पांडुरंग तावरे या शेतकऱ्याने 101 एकरात 40 लाख रुपये खर्च करून कृषी पर्यटन केंद्र निर्माण केले. या पर्यटन केंद्राला सन 2012 पर्यंत 33,03,000 पर्यटकांनी भेट दिली. या केंद्रातून सन 2010 पर्यंत 28 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. आज महाराष्ट्रात जवळपास 375 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत.

    कृषी पर्यटनाचे महत्व: 
    • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास व ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधला जातो.
    • कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते.
    •  हा कृषीपूरक व्यवसाय असल्यामुळे इतर सोईसुविधांचा विकास होतो. 
    • ग्रामीण भागातील लोककला, हस्तकला, खाद्यसंस्कृती शहरी भागांपर्यंत कृषी पर्यटनामुळे पोहोचते.
    • ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
    •  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावते.
    • ग्रामीण भागातील पडीक, गायरान, क्षारपड जमिनीचा योग्य वापर होतो.

    *****

    Sunday, January 19, 2020

    वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर व सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्ममाणे दि.१८ जानेवारी २०२० भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सोलापूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याने सहभाग नोदविला.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. प्राचार्य के.एम. जमादार  

    कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. हरिष तिपे 

      प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...