tipeharish.blogspot.com

Saturday, November 5, 2022

पर्यटन भूगोल

पर्यटन हा शब्द इंग्रजीतील  Tourism या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. Tourism हा शब्द Tour या शब्दापासून तयार झाला आहे. Tour हा शब्द लॅटिन भाषेतील Tornos या शब्दापासून तयार झाला आहे. Tornos या शब्दाचा अर्थ Journey (प्रवास) सा होतो. हा प्रवास जागेसंबंधी शोध घेणे, शिकणे, अभ्यास करणे तसेच व्यवसाय किंवा मनोरंजनासाठी होत असतो.

व्याख्या : 
  • परदेशी व्यक्तीचे एखाद्या देशात प्रदेशात किंवा शहरात आगमन, वास्तव्य, भ्रमंती आणि तेथून त्याच्या मूळच्या ठिकाणी जाणे म्हणजेच पर्यटन होय.
  • एखाद्या व्यक्तीने आपल्या मूळच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून एका दिवसापेक्षा जास्त प्रवास करून मूळ ठिकाणी आल्यास पर्यटन असे म्हणतात.
  • एखाद्या व्यक्तीने आपल्या मूळच्या ठिकाणापासून केलेला प्रवास, वास्तव्य आणि भ्रमंती म्हणजे पर्यटन होय.
  • एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कायमस्वरूपी वास्तव्य न करता ते ठिकाण सोडून फुरसतीच्या वेळी मनोरंजन, व्यवसाय व इतर विविध उद्देश पूर्ण करून परत आपल्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी येणे म्हणजे पर्यटन होय.
पर्यटनाचे स्वरूप: 
  • पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप 
  • पर्यटनाचे ऐतिहासिक स्वरूप 
  • पर्यटनाचे सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप  
  • वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप
  • अनेकविध स्वरूप
  • मनोरंजनात्मक स्वरूप
  • अनुत्पादक स्वरूप
  • गतिशील व स्थिर स्वरूप
  • पर्यटनाचे हंगामी स्वरूप

पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप: पर्यटन हे मोठ्या प्रमाणावर भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. या भौगोलिक घटकांत भूमिस्वरूपे, हवामान, जलाशये, वनस्पती व प्राणी इ. समावेश होतो. पर्यटक हे उंच गिरिशिखरे, थंड हवेची ठिकाणे, बर्फाच्छादित शिखरे, धबधबे, समुद्रकिनारे पूळण (बीच), जंगले, सरोवरे, बेटे, तलाव, नद्यांचे उगम व संगम, वन्य पशुपक्षी इत्यादी अनेक भौगोलिक स्थळांना भेटी देतात. त्यामुळे या सर्व बाबींतून पर्यटनाला भौगोलिक स्वरूप प्राप्त होते.

पर्यटनाचे ऐतिहासिक स्वरूप : गड, कोट, दुर्ग, राजधान्या, तहस्थळे, राजवाडे, युद्धभूमी, ऐतिहासिक समाधी व स्मारके हे पर्यटनाचे ऐतिहासिक घटक आहेत. अशा ऐतिहासिक ठिकाणांना पर्यटक भेटी देतात यातूनच पर्यटनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होते.

पर्यटनाचे सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप : वस्तुसंग्रहालये, लेण्या, शिल्पे, नृत्य, गायन, संगीत, वेशभूषा, शिक्षण, सण, उत्सव, कला हे सांस्कृतिक घटक आहेत. धार्मिक स्थळे (चर्च, मंदिर, ईदगाह, स्तूप, पॅगोडा, गुरुद्वारा) व पवित्र ठिकाणांना पर्यटक भेटी देण्यासाठी पर्यटन करतात. त्यामुळे पर्यटनास सांस्कृतिक व धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

पर्यटनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप:  पर्यटनामधे प्रवास आणि वास्तव्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पर्यटकाने आपल्या राहत्या ठिकाणापासून व कार्यापासून दूर जाऊन मनोरंजन व आनंद मिळविण्यासाठी केलेला प्रवास हा पर्यटनाचा प्रमुख हेतू असतो. या व्यवसायात आनंद व मनोरंजन मिळविणे हे मूळ वैशिष्टय आहे.

पर्यटनाचे अनेकविध स्वरूप : पर्यटनामध्ये पर्यटन, पर्यटक, प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था, प्रवासी मार्गदर्शक, पर्यटन संस्था व संघटना, विक्रेते इत्यादी अनेक घटकांचा समावेश होतो. म्हणून पर्यटनाला अनेकविध स्वरूप प्राप्त झाले आहे.

पर्यटनाचे मनोरंजनात्मक स्वरूप :पर्यटनाचा मुख्य उद्देश पर्यटकांचे मनोरंजन होणे हा आहे. पर्यटक आनंद मिळविण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणे, सूर्यस्नान, समुद्रात पोहणे, पोलो, धनुर्विद्या, स्कुबा डायविंग, बर्फावरील घसरगुंडी, गिर्यारोहण करणे, जंगलसफरी करणे, आल्हाददायक हवामानाचा आस्वाद घेणे, निसर्गसौंदर्य पाहणे इ. मुळे पर्यटनाचे स्वरूप मनोरंजनात्मक बनले आहे.
पर्यटनाचे अनुत्पादक स्वरूप : पर्यटन व्यवसायात कोणत्याही वस्तूचे प्रत्यक्ष उत्पादन होत नाही. पर्यटकाचा पर्यटन करीत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात किंवा उपजीविकेच्या धंद्यात रूमावेश नसतो. अशा प्रकारे पर्यटनात अनुत्पादक हा गुण दिसून येतो.

पर्यटनाचे गतिशील व स्थिर स्वरूप : पर्यटनात प्रवास व मुक्काम या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रवास हा गतिशील घटक असून त्यामुळे पर्यटनामध्ये गतिमानता प्राप्त होते. प्रवासात पर्यटकाला वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करावा लागत असल्यामुळे तो एका ठिकाणी स्थिरावतो. त्यामुळे त्याला स्थिरता प्राप्त होते.

पर्यटनाचे हंगामी स्वरूप : पर्यटन हे अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे असते. पर्यटनाचा उद्देश, पर्यटन स्थळाचे अंतर, पर्यटकाची आर्थिक परिस्थिती या घटकांवर पर्यटनाचा कालावधी आधारित असतो. तसेच पर्यटन हे ऋतूनुसार व हंगामानुसार केले जाते म्हणजेच पर्यटनावर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूंचा परिणाम होतो. त्यामुळे एका विशिष्ट ऋतूत विशिष्ट पर्यटन स्थळी पर्यटन करतात. उदा., उन्हाळयात थंड हवेच्या तर पावसाळ्यात याच्या ठिकाणी पर्यटक पर्यटनास जातात. त्यामुळे पर्यटनाला हंगामी स्वरूप प्राप्त झाले आहे

पर्यटन भूगोलाची व्याप्ती
पर्यटनाची व्याप्ती काळानुरूप बदलत आहे. प्राचीन काळी पर्यटन, देवधर्म, यात्रा, जत्रा यांना पायी किंवा बैलगाडीने प्रवास केला जात होता. मध्ययुगात धार्मिकतेकडून पर्यटन शोधमोहिम, नवीन खंडाचा शोध लावणे अशा बाबीकडे वळले. पण आधुनिक कालखंडात पर्यटनाची व्याप्ती पूर्णपणे बदलली दिसते. मनोरंजनासाठी फिरायला जाणे, आनंद मिळविणे, मौज-मजा करणे अशा पध्दतीने पर्यटन केले जाते. सध्याच्या पर्यटनाला आधुनिकतेची आर्थिक विकासाची व सुबत्तेची जोड मिळाली आहे.

पर्यटनाचे आधुनिकीकरण :- पूर्वी पर्यटन हे पायी, बैलगाडी, घोडागाडी अशा स्वरूपाचे होते. मुक्काम हा ठराविक गावात किंवा धर्मशाळेत असायचा, राहण्याची व जेवणाची पर्यटक जास्त चिंता करत नव्हते. परंतु अलिकडे पर्यटनाची व्याप्ती बदलली आहे. मोटारगाडी, रेल्वे, विमान या वाहतूक साधनाने प्रवास करतात. तर हॉटेल्स, लॉज, मोटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जेवणाची व राहण्याची सोय करतात. पद्धतीने पर्यटनामध्ये आधुनिकीकरण आले आहे.

पर्यटनातून रोजगारनिर्मिती :-पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला सेवा पुरविण्यासाठी विविध टप्प्यावर रोजगार उपलब्ध होतात वस्तू विक्री, दुकानदार, भाजीपाला, दूध, विक्रेता, हॉटेल कामगार, गाईड व इतर असे हजारों प्रकारची कामे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोक करतात. त्यातूनच त्यांना रोजगार उपलब्ध होतो.

पर्यटनातील व्यक्तीसमूह :-पर्यटनामध्ये दोन प्रकारचे व्यक्तीसमूह आहेत. एक पर्यटकांचा व्यक्तीसमूह व दुसरा त्यांना सोयी- सुविधा देणाऱ्या व्यक्तींचा समूह आहे. पहिल्या गटात पर्यटन हे वैयक्तिक किंवा सामूहिक असू शकते. यामध्ये कुटुंब, शाळेच्या सहली, मित्र-मैत्रिणींचा प्रवास व वृद्ध व्यक्तींचा प्रवास अशा पध्दतीने कार्यरत आहे. तर दुसरा गट हॉटेल चालक-मालक, किरकोळ व होलसेल दुकानदार, ट्रान्सपोर्ट, मार्गदर्शक या दुसऱ्या गटाचा सहभाग पर्यटन व्यक्ती समुहामध्ये महत्त्वाचा आहे.

पर्यटकांची वाढती लोकसंख्या :-सध्या मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून तो पर्यटनासाठी बाहेर पडतो. पर्यटन व्यवसायात आधुनिक सोयी-सुविधा आल्या आहेत. प्रवास व राहण्याच्या उत्तम सोयी, घरबसल्या बुकिंग, पर्यटन स्थळांची माहिती, माहितीपूर्व मार्गदर्शक या सर्व बाबींच्यामुळे पर्यटनामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे. 

पर्यटनाचा सर्वांगीण अभ्यास :-पर्यटन स्थळे, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटनाचे व्यवस्थापन व नियोजन, महत्त्व व समस्या या व इतर सर्व अंगांनी पर्यटनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त आर्थिक घटक डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही, तर पर्यटनातून सामाजिक व सांस्कृतिक विकास कसा होईल. या बाबींचा पक्का विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटनाचा विविध दृष्टीकोणातून अभ्यास करणे गरजेचे आहे.

पर्यटनातून नाविन्यतेचा शोध घेणे :- नवीन पर्यटन स्थळे, नवीन प्रदेश, विविध वस्तू, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो पहिल्यांदाच अनुभवतो. त्यावेळेस त्याला त्यामध्ये नाविन्यपूर्णतः वाटते. पर्यटक एखाद्या पर्यटन स्थळाला दुसऱ्यांदा भेट देण्यासाठी येतो, त्यावेळेस तो तेवढा खुष नसतो, जेवढा तो पहिल्यांदा भेट देताना असतो. यातून नाविन्यता ही प्रत्येक मानवाला आनंद देणारी असते.

पर्यटनातील समस्या :-पर्यटनाची व्याप्ती अभ्यासताना त्याच्या समस्याही अभ्यासणे खूप गरजेचे आहे. पर्यटकांना असनाऱ्या समस्या, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी असणारे प्रश्न, पर्यटनातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक समस्या, पर्यावरणाची हानी या सर्व प्रश्नांचा अभ्यास पर्यटनाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. 

पर्यटन भूगोलाचे महत्त्व

देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत :-देशी व विदेशी पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळत असतो. रोजगार निर्मिती, पर्यटन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व निवास व्यवस्था या सर्व ठिकाणी पर्यटक पैसा खर्च करत असतो. या सर्व क्षेत्रातून कर स्वरूपात हा पैसा काही प्रमाणात देशाच्या तिजोरीत पडत असतो. यातूनच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

प्रादेशिक समतोल राखण्यास मदत :-मोठ्या खंडप्राय देशात काही भाग विकसीत तर काही प्रदेश अविकसित अशा पध्दतीचे स्वरूप पहावयास मिळते. यामध्ये असे दिसून येते की, अप्रगत प्रदेशात पर्यटनाच्या संधी जास्त असतात. उदा. भारतातील ईशान्य भारत पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्याठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ईशान्य भारत सुद्धा विकसीत झाल्यास जो प्रादेशिक असमतोल आहे तो कमी होईल. 

बाजारपेठांची निर्मिती :-पर्यटन स्थळाला भेट देवून झाल्यानंतर तेथील वस्तू खरेदी करणे, आठवण म्हणून घेणे, प्रसाद म्हणून घेणे किंवा आपल्या जवळच्या नातलगासाठी मित्रासाठी वस्तू खरेदी करणे हा पर्यटकाचा आवडता छंद असतो. त्यातूनच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी खेळणी, कपडे, पूजा साहित्य, प्रसाद, ऐतिहासिक वस्तू, प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू इ. खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यातूनच तेथील बाजारपेठांचे विस्तारीकरण व विकास होतो.

देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत :-देशी व विदेशी पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळत असतो. रोजगार निर्मिती, पर्यटन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व निवास व्यवस्था या सर्व ठिकाणी पर्यटक पैसा खर्च करत असतो. या सर्व क्षेत्रातून कर स्वरूपात हा पैसा काही प्रमाणात देशाच्या तिजोरीत पडत असतो. यातूनच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

प्रादेशिक समतोल राखण्यास मदत :-मोठ्या खंडप्राय देशात काही भाग विकसीत तर काही प्रदेश अविकसित अशा पध्दतीचे स्वरूप पहावयास मिळते. यामध्ये असे दिसून येते की, अप्रगत प्रदेशात पर्यटनाच्या संधी जास्त असतात. उदा. भारतातील ईशान्य भारत पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्याठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ईशान्य भारत सुद्धा विकसीत झाल्यास जो प्रादेशिक असमतोल आहे तो कमी होईल. 

बाजारपेठांची निर्मिती :-पर्यटन स्थळाला भेट देवून झाल्यानंतर तेथील वस्तू खरेदी करणे, आठवण म्हणून घेणे, प्रसाद म्हणून घेणे किंवा आपल्या जवळच्या नातलगासाठी मित्रासाठी वस्तू खरेदी करणे हा पर्यटकाचा आवडता छंद असतो. त्यातूनच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी खेळणी, कपडे, पूजा साहित्य, प्रसाद, ऐतिहासिक वस्तू, प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू इ. खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यातूनच तेथील बाजारपेठांचे विस्तारीकरण व विकास होतो.

जागतिक सामंजस्य निर्माण होण्यास मदत :-दोन देशांमध्ये असणारे भांडण तरे यामुळे त्या देशातील संघर्ष निर्माण होतो. त्या देशांमधील व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण होतात. परंतु या दोन्ही देशातील पर्यटक जर त्यांच्या देशात पर्यटनासाठी गेले तर सत्य परिस्थिती समजते. उदा. भारत व पाकिस्तानातले पर्यटक एकमेकांशी सौहार्दपूर्ण वातावरणात पर्यटनासाठी गेले तर सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल.

संस्कृतिचे जतन :-पर्यटक पर्यटनासाठी ज्या प्रदेशात जातो तेथील संस्कृती ही त्याच्यासाठी भिन्न असते. त्यातील तो चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. तसेच त्याची जी संस्कृती आहे त्याचा ठसासुध्दा त्याची भाषा, वेश, आवड-निवड, भोजन यातून त्या प्रदेशातील लोकांना एकप्रकारे सांगत असतो. थोडक्यात भिन्न संस्कृतीच्या व्यक्ती पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या तर संस्कृतीची देवाण-घेवाण होते. तसेच संस्कृतीचे जतनही होते.

पर्यटनातील आधुनिक कल :
पर्यावरणपूरक / पारिस्थितिकी पर्यटन (इको टुरिझम) : अनियंत्रित व अनिर्बंध पर्यटन वाढीमुळे पर्यटन स्थळाचे ठिकाणावरील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होऊन त्याचा पर्यटनाच्या विकासावर वाईट परिणाम होतो. पर्यटनाचा पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळून त्याचे संवर्धन करण्यासाठी तसेच स्थानिक लोकांच्या विकासासाठी पर्यटनाचा उपयोग व्हावा यासाठी अलीकडच्या काळात पर्यावरण पूरक पर्यटनाची सुरुवात झाली आहे. पर्यटन स्थळावरील नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांना हानी न पोहोचवता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद दिला जातो. या प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले जाते. या प्रकारच्या पर्यटनामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद देण्याबरोबरच नैसर्गिक व सांस्कृतिक साधनसंपत्तीचे संवर्धन होते. पर्यटनाचा विकास करताना प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध घातले जातात व उपलब्ध नैसर्गिक व स्थानिक सुविधांच्या साह्याने पर्यटकांना सोयी सुविधा पुरविल्या जातात.

पर्यावरणपूरक  / पारिस्थितिकी पर्यटनाच्या व्याख्या
  • पारिस्थितिकीय पर्यटन म्हणजे पर्यावरण संवर्धन करणारा, स्थानिक लोकांचे कल्याण साधणारा,स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि पर्यावरण शिक्षणासाठी केला जाणारा प्रवास होय.
  • पर्यावरणीय पर्यटन म्हणजे आपल्या आवडीच्या नैसर्गिक किंवा पारिस्थितिकीय क्षेत्रात पर्यावरण संवर्धन करणे व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नैसर्गिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांचे निरीक्षण करणे आणि पर्यावरणाबद्दल जाणून घेण्यासाठी केलेले पर्यटन होय.
पारिस्थितिकीय पर्यटनाचे महत्व : 
  • पारिस्थितिकीय पर्यटनामुळे प्रत्येक देशातील नैसर्गिक सृष्टिसौंदर्याचे जतन व संवर्धन होते.
  • पृथ्वीतलावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन होते.
  • स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात व त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावते.
  •  वेगवेगळ्या समुदायाच्या संस्कृतीतील विविध घटकांचेअध्ययन करता येते.
  •  पर्यावरणीय संवर्धनासाठी जनजागृती करण्यास मदत होते.
  •  निसर्गाशी जवळीक निर्माण होते.
  • नामशेष होत चाललेल्या पशुपक्ष्यांच्या जातींच्या संवर्धनासाठी या पर्यटनाचा उपयोग होतो.
  • लोकशाहीविषयक चळवळी व मानवी हक्काचे संरक्षण होते.

कृषी पर्यटन:  कृषी पर्यटनामध्ये शेती व पर्यटन ही दोन मुख्य क्षेत्रे एकत्र आणली जातात. पर्यटन क्षेत्रामध्ये विस्तारण्याची क्षमता आहे तर कृषी क्षेत्रामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे कृषी क्षेत्र व पर्यटन क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांचा फायदा होत आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतात पर्यटकांसाठी निवास, भोजन, शेतातील कामात सहभाग, शेती व शेतीपूरक व्यवसायांचे ज्ञान यांची संधी उपलब्ध करून देणे होय. कृषी पर्यटनामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय शेतकऱ्यांच्या घरांमध्ये किंवा त्यासारख्या सोयी बांधून घेऊन उपलब्ध करून दिल्या जातात. येथील वातावरण हे ग्रामीण भागातील जीवनाचा आनंद देणारे असते. धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती व निवांत क्षण मिळावेत यासाठी लोक शांत, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित अशा दुर्गम भागातील कृषी पर्यटन केंद्रास भेट देण्यासही तयार असतात

कृषी पर्यटन म्हणजे पर्यटकाची शेतावरील सहल, शेतावरील फेरफटका, धावपळीच्या व कृत्रिम जीवनशैलीला कंटाळून काही दिवसांसाठी शेतकऱ्यांच्या शेतातील घरी जाऊन राहणे व त्याबदल्यात शेतकऱ्यांना मोबदला देणे होय. 

कृषी पर्यटन विकास महामंडळाची (Agro Tourism Development Corporation) स्थापना 16 मे, 2004 रोजी झाली. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वतःच्या शेतात कृषी पर्यटन केंद्र निर्माण करून कृषी पर्यटनाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व प्रतिष्ठा मिळू शकते हे सिद्ध केले. त्यामुळे कृषी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढू लागला. सन 2004 मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील माळेगाव येथील पांडुरंग तावरे या शेतकऱ्याने 101 एकरात 40 लाख रुपये खर्च करून कृषी पर्यटन केंद्र निर्माण केले. या पर्यटन केंद्राला सन 2012 पर्यंत 33,03,000 पर्यटकांनी भेट दिली. या केंद्रातून सन 2010 पर्यंत 28 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. आज महाराष्ट्रात जवळपास 375 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत.

कृषी पर्यटनाचे महत्व: 
  • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास व ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधला जातो.
  • कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते.
  •  हा कृषीपूरक व्यवसाय असल्यामुळे इतर सोईसुविधांचा विकास होतो. 
  • ग्रामीण भागातील लोककला, हस्तकला, खाद्यसंस्कृती शहरी भागांपर्यंत कृषी पर्यटनामुळे पोहोचते.
  • ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
  •  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावते.
  • ग्रामीण भागातील पडीक, गायरान, क्षारपड जमिनीचा योग्य वापर होतो.

*****

No comments:

Post a Comment

  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...