tipeharish.blogspot.com

Sunday, November 13, 2022

जागतिक लोकसंख्येचे वितरण

जागतिक लोकसंख्येचे वितरण

दाट किंवा जास्त जास्त लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 200 पेक्षा अधिक घनता) :

ज्या ठिकाणी प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, खनिजे, पाणीपुरवठा इत्यादी घटक अनुकूल असतात त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आढळते. जगाच्या ज्या प्रदेशात शेतीबरोबरच उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे त्या प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते.

कृषीप्रधान दाट लोकसंख्येचे प्रदेश:

भूमध्य सामुद्रिक हवामान, मोसमी हवामान प्रदेशातील चीन, भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगला देश, श्रीलंका, कोरिया, नेपाळ, भूतान इत्यादी देशांचा समावेश होतो. भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू नद्यांचा मैदानी प्रदेश, चीनमधील हो हँग हो, यांगत्से, यांगत्सिकंग, म्यानमारमधील इरावती, पाकिस्तानातील सिंधू इत्यादी सुपीक गाळाच्या मैदानी प्रदेशांमुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. या प्रदेशात सरासरी लोकसंख्येची घनता 200 पेक्षा अधिक आहे, तर काही देशात याहीपेक्षा लोकसंख्येची घनता जास्त आढळते. आशिया खंडातील बांगला देशात दर चौ.कि.मी. ला 1253, भारतात 460, पाकिस्तान 281, श्रीलंका 340, नेपाळ 202 या देशांत लोकसंख्येची घनता 200 पेक्षा जास्त आहे.

उद्योगप्रधान दाट लोकसंख्येचे प्रदेश:

जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, बेल्जिअम, डेन्मार्क, स्पेन, रशिया (युरोपीय), पोलंड, इटली, जपान, कॅनडा, संयुक्त संस्थानचा पूर्व व ईशान्य भाग इत्यादी देशांचा समावेश होतो. खनिजाची उपलब्धता, वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास, भांडवल पुरवठा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास, नागरिकीकरण, उच्च राहणीमान, दरडोई उत्पादन जास्त इत्यादी कारणांमुळे लोकसंख्येची घनता जास्त आढळते. ग्रेट ब्रिटनमध्ये 279, जर्मनीत 240, इटलीमध्ये 206, नेदरलँड 507, जपानमध्ये 348

मध्यम लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 50 ते 200 घनता):

उदरनिर्वाहक व्यापारी शेतीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. जगातील संयुक्त संस्थानचा मध्यभाग, दक्षिण कॅनडा, पूर्व युरोप, आफ्रिकेचा उष्ण कटिबंधीय प्रदेश, दख्खनचे पठार, मध्य चीन, नैर्ऋत्य रशिया, मेक्सिकोचा दक्षिण भाग, ब्राझीलचा पूर्व व ईशान्य भाग, चिलीचा मध्यभाग इत्यादी प्रदेशांत लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते. या प्रदेशात शेतीबरोबर लाकूडतोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम इत्यादी व्यवसायांचा विकास झालेला असल्याने येथे लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आढळते.

कमी किंवा विरळ लोकसंख्येचे / घनतेचे प्रदेश (दर चौ.कि.मी. ला 50 पेक्षा कमी घनता ):

ज्या प्रदेशात भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल स्वरूपाची असते, अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. जगातील अतिउष्ण, अतिशीत, अतिउंच, घनदाट जंगले, इत्यादी प्रदेशांत लोकसंख्या विरळ आढळते.

जगातील अतिउष्ण वाळवंटी प्रदेश :

सहारा, कलहारी, अटाकामा, घरचे वाळवंट, गोबीचे वाळवंट, कोलोरेंडो, अरबस्तान, ताकालामांकनचे बाळवंट, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे वाळवंट इत्यादी वाळवंटी प्रदेशात अतिजास्त तापमान व कमी पर्जन्य या प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते.

अतिशीत ध्रुवीय प्रदेश:

जगातील अलास्का, सैबेरिया, ग्रीनलंड, अंटार्क्टिका. उत्तर ध्रुवीय प्रदेश इत्यादी प्रदेशांचा यामध्ये समावेश होतो. या प्रदेशात तापमानाचे प्रमाण अतिशय कमी, हिमाच्छादित भाग व उदरनिर्वाह साधनांच्या अभावामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते तर अंटार्क्टिका खंड हा जवळजवळ निर्मनुष्य आहे.

अतिउंच पर्वतीय प्रदेश:

यामध्ये रॉकी, अँडीज, हिमालय, आल्प्स, किलीमांजारो इत्यादी पर्वतीय प्रदेशांचा समावेश होतो. या प्रदेशात तीव्र उतार, प्रदेशाची दुर्गमता, ओबडधोबड भूपृष्ठरचना, अपरिपक्व मृदा, हिमवृष्टी इत्यादी मानवी जीवनासाठी अनुकूल नसतात.

घनदाट जंगलाचा प्रदेश :

यामध्ये विषुववृत्तीय घनदाट जंगलाचा प्रदेश, अॅमेझॉन, कांगो व झरे नदीच्या खोऱ्यात घनदाट जंगलाचा प्रदेश - दमट व रोगट हवामान, दलदलयुक्त जमीन, अति पर्जन्य, उपद्रवी किटक इत्यादी कारणांमुळे हे प्रदेश मानवी जीवनास प्रतिकूल असतात. त्यामुळे लोकसंख्येची घनता विरळ आढळते
.

No comments:

Post a Comment

  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...