tipeharish.blogspot.com

Friday, November 18, 2022

जन्मदर

जन्मदर / जननदर: 

लोकसंख्येत बदल घडवून आणणारा जनन हा एक प्रमुख घटक असल्यामुळे लोकसंख्येच्या गतिमानतेचा अभ्यास करताना मानवी जननाचा अभ्यास केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूमुळे लोकसंख्येत होणारी घट भरून काढून समाजाची पुन:स्थापना होण्याची प्रक्रिया जननामुळेच अखंडपणे चालू असते. 

व्याख्या: 

  • जनन म्हणजे एखाद्या स्त्रीने किंवा स्त्रियांच्या समूहाने केलेले प्रत्यक्ष प्रजोत्पादन म्हणजे जनन होय
  • जन्म देण्यास योग्य असलेल्या वयोगटातील स्त्रीने प्रत्यक्ष जन्म दिलेल्या मुलांची संख्या होय
  • नवीन जन्माला आलेल्या बालकांमुळे ज्या दरामध्ये लोकसंख्येत भर पडतो त्यास जननदर असे म्हणतात

जन्मदर मापनाची परिमाणे 

  • ढोबळ जन्मदर 
  • सामान्य जन्मदर
  • वयसापेक्ष जन्मदर 
ढोबळ जन्मदर : जनन मापनाचे अत्यंत सोपे, नेहमी वापरात असलेले परिमाण म्हणजे ढोबळ  जन्मदर होय, 
"एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वर्षातील एक हजार लोकसंख्येमागे जन्मलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जन्मदर होय." 

एखाद्या समाजात दरवर्षी दरहजारी किती जन्म होतात, त्या जन्मावरून समाजातील जन्मदर समजतो. ढोबळ जन्मदरांचा प्रमुख उपयोग म्हणजे जननामुळे लोकसंख्येत कसा बदल होतो ते दाखविले जाते. उदा. एखाद्या प्रदेशातील ढोबळ जन्मदर दरवर्षी दरहजारी 40 असेल तर त्या प्रदेशात जननांमुळे दरवर्षी दरहजारी 40 व्यक्तींची भर पडते. ढोबळ जन्मदरात कोणत्याही प्रदेशातील सर्व लोकसंख्येचा समावेश केला जातो. मात्र ती सर्वच लोकसंख्या जन्म देण्यास सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे ढोबळ जन्मदर अधिक परिणामकारक ठरू शकत नाही.

सामान्य जन्मदर: ढोबळ जन्मदरापेक्षा हे सुधारित जन्मदराचे परिमाण आहे. या जन्मदर प्रकारात ज्याचा प्रत्यक्षात जन्मदराशी संबंध आहे. अशाच वयोगटातील स्त्रियांचा समावेश आहे. विशिष्ट प्रदेशातील एका वर्षातील जन्माच्या संख्येचे 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या संख्येशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणून दरहजारी साधारण जन्मदर निश्चित करतात. 

या जन्मदर प्रकारात प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांचाच फक्त विचार केलेला असतो. त्यामुळे ढोबळ जन्मदरातील त्रुटी या जन्मदरात कमी झालेल्या आहेत. असे जरी असले तरी या जन्मदरात काही उणिवा असतात. उदा., सर्वच प्रजननक्षम स्त्रियांचा विवाह होतोच असे नाही. तसेच प्रत्येक स्त्रियांमध्ये जननक्षमता वेगवेगळी असते. या काही त्रुटी वगळता हा जन्मदर ढोबळ जन्मदरापेक्षा चांगला प्रकार मानला जातो.
वयसापेक्ष जन्मदर: ढोबळ जन्मदरापेक्षा हे सुधारित जन्मदराचे परिमाण आहे. या जन्मदर प्रकारात ज्याचा प्रत्यक्षात जन्मदराशी संबंध आहे. अशाच वयोगटातील स्त्रियांचा समावेश आहे. विशिष्ट प्रदेशातील एका वर्षातील जन्माच्या संख्येचे 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या संख्येशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणून दरहजारी साधारण जन्मदर निश्चित करतात. 


वयसापेक्ष जननदर निश्चित करताना विशिष्ट वयोगटातील स्त्रियांनी जन्म दिलेल्या अर्भकांचीच संख्या विचारात घ्यावी लागते. या मुलांच्या संख्येचे त्याच वयोगटातील स्त्रियांशी गुणोत्तर काढून त्याला 1000 ने गुणले की त्या वयोगटातील 1000 स्त्रियांमागे असलेला सरासरी जन्मदर कळतो.

जन्म दरावर परिणाम करणारे घटक:

जीवशास्त्रीय कारणे:
प्रजोत्पादनाचा कालावधी: व्यक्तीचे वय व लिंग या दोन घटकांचा प्रजननावर परिणाम होतो. मुलास जन्म स्त्रीकडून दिला जात असून सामान्यपणे वयाच्या 15 वर्षापासून ते 49 वर्षांपर्यंत स्त्री अपल्याला जन्म देऊ शकते. प्रजोत्पादनाचा कालावधीमध्ये 20 ते 25 वयात अपत्यनिर्मिती क्षमता सर्वांत जास्त असते, यानंतर वाढत्या वयानुसार अपत्यनिर्मिती क्षमता कमी-कमी होत जाते. 
वंश व वांशिक समूह : वंश हा जननदरावर परिणाम करणारा सर्वांत महत्त्वाचा जीवशास्त्रीय घटक आहे. वेगवेगळ्या वांशिक समूहानुसार जननदर बदलतो. कॉकेसाइड वंशाच्या लोकांपेक्षा निग्रोइड वंशाच्या लोकांचा जन्मदर जास्त आढळतो. 
वंध्यत्व : काही स्त्रिया या शारीरिक दोषांमुळे प्रजननक्षम नसतात, स्त्रियांना गर्भधारणाच होत नाही, तर काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा 1-2 अपत्यांच्या जन्मानंतर वंध्यत्व येते. तर कित्येक स्त्रियांना अपत्य जन्मानंतर काही काळ गर्भधारणेची शक्यता कमी असते व जन्मदर कमी होतो. 
आहार : सकस व पौष्टिक आहार उपलब्ध असल्यास प्रजनन क्षमता वाढून जन्मदराचे प्रमाण जास्त आढळते. याउलट, निकृष्ट व कमी प्रतीचा आहार मिळाल्यामुळे प्रजनन क्षमता घटून जन्मदराचे प्रमाण कमी होते. निकृष्ट आहारामुळे अशक्तपणा येऊन गर्भपात होतो. 
आरोग्य : आरोग्याचा व्यक्तिगत जननक्षमतेशी संबंध असतो. निरोगी शरीर असणाऱ्या स्त्रियांमध्ये जननक्षमता जास्त आढळते. तर याउलट शारीरिक व मानसिक आरोग्य प्रतिकूल स्वरूपाचे असल्यास जननदरावर परिणाम होऊन जननदर घटतो. 
हवामान : प्रदेशानुसार हवामानामध्ये विविधता दिसून येते. हवामानाचा जननदरावर परिणाम होतो. उष्ण कटिबंधीय हवामानात मुली लवकर विवाहास योग्य ठरतात, अशा मुलींचे विवाह लवकर झाल्यामुळे त्यांना प्रजोत्पादनाचा कालावधी अधिक मिळतो, त्यामुळे जन्माचे वाढते.
लोकसंख्याशास्त्रीय कारणे : जननदरावर परिणाम करणारा लोकसंख्याशास्त्रीय घटक महत्त्वाचा असून यामध्ये वय संरचना, लिंग संरचना, शहरीकरणाचे प्रमाण, वैवाहिक जीवनाचा काळ व स्त्रियांचा श्रमशक्तीतील सहभाग इ. समावेश होतो.
वय संरचना : ज्या देशात प्रजोत्पादनक्षम वयातील म्हणजेच तरुणांचे प्रमाण जास्त त्या देशाचा जननदर जास्त होऊन लोकसंख्येत वाढ होते. आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बऱ्याचशा देशात अशी परिस्थिती आढळते.
लिंग संरचना : ज्या देशात स्त्री व पुरुषांचे प्रमाण समसमान असल्यास तेथे सामान्य सरासरी जन्मदर आढळतो. याउलट, ज्या प्रदेशात स्त्री व पुरुषांचे प्रमाण असमान असते तेथे जननदरावर विपरीत परिणाम होतो. उदा., भारतासारख्या देशात शहरांमध्ये पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे शहरातील जन्मदर खेड्यांपेक्षा खूपच कमी आढळतो.
शहरीकरणाचे प्रमाण : नागरीकरणाचा परिणाम जननदरावर होतो. शहरी भागात काम, शिक्षण व इतर कारणाने स्थलांतर करण्याचे तरुणांचे प्रमाण जास्त असते. शहरात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आढळते. त्यामुळे शहरी भागात खेड्यांपेक्षा जन्मदराचे प्रमाण कमी आढळते.
वैवाहिक जीवनाचा काळ : वैवाहिक जीवनाचा काळ जास्त असल्यास जननाचे प्रमाण जास्त आढळते. उदा., भारतासारख्या देशात विवाह लवकर होत असल्याने वैवाहिक जीवनाचा काळ जास्त असल्याने जननदर वाढते.
स्त्रियांचा श्रमशक्तीतील सहभाग : विविध व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त असेल तर जन्मदराचे प्रमाण कमी असते. कारण काम करणाऱ्या स्त्रिया या आपल्या अधिकाराच्या बाबतीत जास्त सजग असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने व शिक्षणामुळे कुटुंब मर्यादित ठेवण्याकडे स्त्रियांचा कल असतो. विकसित देशात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने पूर्णवेळ कार्यरत असल्याने फुरसतीचा वेळ कमी मिळतो, त्यामुळे जननदर कमी असतो.
सामाजिक कारणे : 
धर्म: प्रत्येक धर्माचे जीवनविषयक तत्वज्ञान भिन्न असते. ख्रिश्चनव इस्लाम धर्मामध्ये अधिकाधिक मुलांना जन्म देण्यास मान्यता आहे. त्यामुळे या धमतिजननाचे प्रमाण जास्त असते.
शिक्षण : ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. तेथे जन्मदराचे प्रमाण कमी आढळते. कारण या देशात राहणीमानाचा दर्जा उच्च कुटुंब लहान ठेवण्याकडे कल आढळतो. तर याउलट ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तेथे जननदराचे प्रमाण जास्त आढळते. कारण कमी शिक्षित लोकांचे विवाह लवकर होतात, त्यामुळे प्रजोत्पादनाचा कालावधी जास्त मिळतो. 
घटस्फोट: घटस्फोट हा प्रजोत्पादनाच्या काळात झाला तर जननदर कमी आढळतो. मात्र वंध्यत्व असेल तर घटस्फोटाचा जननावर परिणाम होत नाही. ज्या देशात घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे तेथे जननदर कमी आढळते.
ऐच्छिक गर्भपात: गर्भपातामुळे जननाचे प्रमाण कमी होते. ज्या देशात कायदेशीर गर्भपातास मान्यता असते. तेथे जननाचे प्रमाण कमी होते. उदा. जपान या देशात पूर्वी ही परिस्थिती होती. सध्या या देशात कुटुंबनियोजनाचा प्रभाव झालेला दिसून येतो.
सामाजिक बंधने व समाजाच्या रूढी व परंपरा : मुले ही देवाची देणगी मुलगा हा वंशाचा दिवा, मुले म्हातारपणात आधार देतील, जास्त अपत्य असल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल अशा अनेक अंधश्रद्धा व रूढीमुळे जननाचे प्रमाण वाढते. काही समाजामध्ये पती-पत्नीच्या लैंगिक संबंधावर विशिष्ट वेळेला काही सामाजिक बंधने असतात. 
बहुपत्नीत्व: बहुपतित्व म्हणजे एकापेक्षा जास्त नवरे केले जातात. तर बहुपत्नीत्व म्हणजे एकापेक्षा जास्त बायका करणे होय. काही समाजात बहुपत्नीत्वापेक्षा बहुपतित्वाचे प्रमाण खूपच कमी असते. बहुपत्नीत्वाने जनन पातळी घटते.
आर्थिक कारणे : आर्थिक घटकांत कुटुंबाचे उत्पन्न,औद्योगिकीकरण व व्यवसायाचे स्वरूप इत्यादींचा समावेश होतो. 
कुटुंबाचे उत्पन्न : ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी असते,अशा कुटुंबात जन्मदर  जास्त आढळतो . याउलट ज्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असते अशा कुटुंबात जन्मदर कमी आढळतो. ज्या कुटुंबाचे उत्पन्न फारच कमी असते, अशा कुटुंबाचा जन्मदर फारच जास्त असतो, कारण जास्त मुलांमुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल अशी आशा असते. ज्या कुटुंबाचे उत्पन्न फार जास्त असते अशा कुटुंबाचा जन्मदर फारच कमी असतो.
औद्योगिकीकरण : औद्योगिकीकरणामुळे औद्योगिक नगरे निर्माण होत आहेत. या औद्योगिक नगरात लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक तरुण अशा नगराकडे स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे अशा नगराची लोकसंख्या दाट होऊन अनेक समस्या निर्माण होतात. नगरात विविध क्षेत्रांत मोठी स्पर्धा निर्माण होत असल्याने नगरातील कुटुंबाचा कल अपत्याची संख्या मर्यादित ठेवण्याकडे असतो. 
व्यवसायाचे स्वरूप : मानवाच्या आर्थिक व्यवसायाचाही जननदरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. सर्वसामान्यपणे प्राथमिक व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये जननदराचे प्रमाण जास्त असते उदा., शेती, खाणकाम इत्यादी तसेच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये जननदराचे प्रमाण कमी असते. उदा., वकील, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक इत्यादी.
जन्मदराचे परिणाम 
  • जागतिक लोकसंख्येतील प्रचंड वाढीस जननदर हाच एकमेव घटक कारणीभूत असतो. 
  • जन्मदराचे प्रमाण जास्त असल्याने श्रमशक्तीचा पुरवठा होतो. 
  • जन्मदराचे प्रमाण जास्त उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. 
  • जननदर जास्त असल्याने तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून देशाचा सर्वांगीण विकास होतो.
  • ज्या देशात जन्मदराचे प्रमाण जास्त असते, त्या देशात तरुणांचे प्रमाण वाढून देशाच्या संरक्षणासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
प्रतिकूल परिणाम
  • ज्या देशात जननदर जास्त असतो त्या देशात लोकसंख्या वेगाने वाढून लोकसंख्येचा विस्फोट होतो.
  • जननदर अपुरा किंवा कमी असल्यास तसेच अतिरिक्त असल्यास अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात.
  • जननदर जास्त असल्याने राष्ट्रीय उत्पन्न जास्त लोकसंख्येत विभागले जाऊन दरडोई उत्पन्न घटते व राहणीमानाचा दर्जा खालावतो.
  • जननदर जास्त असल्यास लोकसंख्येचा विस्फोट होऊन शेतजमिनीचे विभाजन किंवा तुकडीकरण होते. 
  • जननदर जास्त असल्यामुळे लोकसंख्येत वाढ होऊन वाढत्या लोकसंख्येचासाधनसंपत्तीवर अतिरिक्त ताण पडतो.
  • जननदर जास्त असल्यामुळे बेरोजगारी ही समस्या निर्माण होते.
  • जननदर जास्त असलेल्या प्रदेशात वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात


No comments:

Post a Comment

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक  पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या...