tipeharish.blogspot.com

Thursday, November 17, 2022

जागितक लोकसंख्यावाढ

जागतिक लोकसंख्यावाढ

लोकसंख्या ही एक साधनसंपत्ती आहे. लोकसंख्या ही संख्यात्मक व गुणात्मक असते. जर लोकसंख्या कर्तृत्ववान व गुणात्मक असेल तर प्रदेशाचा विकास जलद घडून येतो. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी श्रमशक्ती वाढते. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी प्रत्येक देशाजवळ पुरेशी व गुणात्मक लोकसंख्या असणे आवश्यक असते. राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबरच त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, संरक्षण व राष्ट्रीयदृष्ट्या राष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्त्वाचे स्थान असते

जागतिक लोकसंख्यावाढ :

लोकसंख्यावाढ ही धन (+) व ऋण (-) देखील असू शकते. लोकसंख्येत झालेला बदल जनगणनेनुसार दर दहा वर्षांनी समजू शकतो. लोकसंख्यावाढीचा वेग ठरविताना वार्षिक कालावधी विचारात घेतला जातो. जगात लोकसंख्येची वाढ सर्वत्र समान आढळत नाही, कारण लोकसंख्येच्या वाढीवर भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या लोकसंख्याविषयक घटकांचा परिणाम होतो. मुख्यतः लोकसंख्येची वाढ, जन्मदर, मृत्युदर व स्थलांतर या घटकांवर अवलंबून असते.

इ.स. 1300 मध्ये 40 कोटी - इ.स. 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. यानंतर जगाच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत गेली. इ.स. 1650 नंतर पुढील 200 वर्षांत म्हणजेच इ.स. 1850 मध्ये जगाची लोकसंख्या दुप्पट (100 कोटी) झाली. पुढील 80 वर्षांत म्हणजेच 1930 मध्ये ती दुप्पट (200 कोटी) झाली. जगातील लोकसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 200 वर्षे, 80 वर्षांवरून ती 45 वर्षे असा घटलेला आहे. म्हणजेच इ.स. 1975 मध्ये जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. या जलद व प्रमाणाबाहेर वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाला 'लोकसंख्येचा विस्फोट' असे म्हणतात. या वाढत्या लोकसंख्येमुळे जगात निर्माण झालेला असमतोल व परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) 1974 हे वर्ष 'जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून घोषित केले, तर 11 जुलै, 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली म्हणून यूनोने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. 12 वर्षांनंतर म्हणजेच 12 ऑक्टोबर, 1999 या दिवशी जगाची लोकसंख्या 600 कोटी झाली, 31 ऑक्टोबर, 2011 रोजी जगाची लोकसंख्या 700 कोटी झाली तर 2019 मध्ये ती 750 कोटी झाली.

जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक

जगात लोकसंख्येचे वितरण विषम स्वरूपाचे आहे कारण त्यावर पुढील घटकांचा प्रभाव पडतो

भौगोलिक किंवा नैसर्गिक किंवा भौतिक/ प्राकृतिक घटक :

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा भौगोलिक हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. भौगोलिक घटकामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, नैसर्गिक वनस्पती, पाणीपुरवठा, खनिजे व ऊर्जा साधने यांचा समावेश होतो.

प्राकृतिक रचना / भूरचना :

लोकसंख्येच्या वितरणावर फार मोठा परिणाम होतो. प्राकृतिक रचनेत पर्वत, पठारे, मैदान यांचा समावेश होतो. पर्वतीय प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल असल्याने लोकसंख्या कमी आढळते. पर्वतीय प्रदेश हे ओबडधोबड भूपृष्ठ, तीव्र उतार, घनदाट जंगल, अपरिपक्व मृदा, प्रदेशाची दुर्गमता असल्यामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. उदा. रॉकी, अँडीज, आल्प्स, किलीमांजारो, हिमालय पर्वत इ. पठारी प्रदेश हे पर्वतीय प्रदेशापेक्षा मानवी जीवनास थोडे अनुकूल असतात त्यामुळे लोकसंख्येचे वितरण मध्यम स्वरूपाचे आढळते. जगातील काही पठारी प्रदेशात खनिजसंपत्ती व सुपीक जमिनीमुळे शेतीचा विकास होऊन लोकसंख्या थोडी जास्तआढळते. उदा. आफ्रिकेचे पठार, कोलंबियाचे पठार, ब्राझीलचे पठार मैदानी प्रवेश मानवी जीवनासाठी अनुकूल असल्याने लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. सपाट भूप्रदेश, सुपीक मृदा मुबलक पाणीपुरवठा, प्रदेशाची सुगमता, औद्योगिक विकास इत्यादींमुळे लोकसंख्या जास्त आढळते. उदा., गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रेचे मैदान, यांगत्सी कंग, यांगत्से, हो सँग-हो नदीचे मैदान, नाईल नदीचे मैदान इ.

हवामान:

हवामान हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ज्या प्रदेशात हवामान अनुकूल असते तेथे लोकसंख्या दाट आढळते. याउलट, ज्या प्रदेशात हवामान प्रतिकूल असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. अनुकूल हवामानाच्या प्रदेशात शेती, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक व दळणवळणाचा विकास होतो म्हणून तेथे लोकसंख्या जास्त आढळते. उदा., भूमध्य सागरी हवामान,मोसमी हवामान,पश्चिम युरोपीय हवामान. याउलट जेथे हवामान प्रतिकूल असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. अति उष्ण, अति शीत, अति पर्जन्याचे प्रदेश इत्यादी प्रदेशात लोकसंख्या फारच विरळ आढळते. उदा. सहारा, कलहारी, थर, अटाकामा, इत्यादी बाळवंटी प्रदेश, अलास्का, सैबेरिया, ग्रीनलैंड, अंटार्क्टिका इत्यादी. टुंड्रा हवामानाचा प्रदेश इत्यादी प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते.

जमीन किंवा मृदा :

जमीन ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. जमिनीवरच मानवाचा शेती हा व्यवसाय अवलंबून आहे. ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते. तेथे शेतीचा विकास होतो, तेथे अन्नधान्य व कृषिमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कृषीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास होतो. म्हणून सुपीक जमिनीच्या प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. उदा. गाळाची मृदा, काळी मृदा इ. याउलट ज्या प्रदेशात जमीन नापीक असते त्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदा.वाळवंटी मृदा, पर्वतीय मृदा इ.

खनिजसंपत्ती :

लोहखनिज, मैगनीज, बॉक्साइट, चांदी, सोने, युरेनियम इत्यादी खनिजे व दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी ऊर्जा साधनांचे साठे ज्या प्रदेशांत मुबलक प्रमाणात आढळतात, त्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. उदा., ऑस्ट्रेलियातील कुलगार्डी व कालगुर्डी , भारतातील छोटा नागपूरचे पठार, जर्मनीतील हूर प्रदेश, संयुक्त संस्थानातील पंचमहासरोवरे इ.

पाणीपुरवठा:

मानवाला पिण्यासाठी, शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, उद्योगधंद्यासाठी, जलविद्युत निर्मितीसाठी, जलसिंचनासाठी, पाण्याची नितांत गरज असते. याच कारणामुळे प्राचीन संस्कृतीचा उदय व विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला आहे. उदा., रावी नदीकाठी हडप्पा, सिंधू नदीकाठी मोहोंजोदडो, नाईल नदीकाठी इजिप्शियन, युफ्राटिस व तैग्रीस नदीकाठी ग्रीक संस्कृती,पो नदीकाठी इटालियन संस्कृती, होयँग-हो नदीकाठी चिनी संस्कृती इत्यादी.याउलट ज्या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते तेथे लोकसंख्या विरळ आढळते. उदा., उष्ण वाळवंटी प्रदेश.

नैसर्गिक वनस्पती :

नैसर्गिक वनस्पती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मानवासाठी उपयुक्त असतात. नैसर्गिक वनस्पतीवर लाकूडतोड, कागदनिर्मिती, फर्निचरनिर्मिती, काडीपेटी, जहाजबांधणी निर्मिती, वन्यपदार्थ संकलन इ. उद्योग अवलंबून असतात.आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या जंगलात लोकसंख्या जास्त आढळते. उदा.तैगा अरण्याचे प्रदेश, समशीतोष्ण जंगलाचे प्रदेश. याउलट घनदाट जंगलव्याप्त व वनस्पतीविरहित प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदा.उष्ण कटिबंधीय घनदाट जंगलाचा प्रदेश.

आर्थिक घटक :

औद्योगिक विकास:

औद्योगिक विकासामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. विविध प्रदेशातील लोक औद्योगिक प्रदेशात केंद्रित होतात. अशा भागात लोकवस्ती वाढत जाऊन लोकसंख्या वाढते. उदा., जपानमधील ओसाका, कोबे, याकोहामा, रशियातील मॉस्को जर्मनीतील व हाईन प्रदेश, ग्रेट ब्रिटनमधील मँचेस्टर, संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क ते फिलाडेल्फिया औद्योगिक पट्टा, भारतातील मुंबई- पुणे, दिल्ली-अंबाला-मीरत, मदुराई-कोईमतूर, अहमदाबाद-बडोदा, कलोल- अंकलेश्वर, हुगळी औद्योगिक प्रदेश इत्यादी औद्योगिक प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते.

वाहतूक:

ज्या प्रदेशात वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास होतो तेथे लोकसंख्या दाट आढळते. कारण वाहतुकीच्या साधनाने प्रवासी, कृषीमाल, खनिजांची वाहतूक होते. त्यामुळे शेती, उद्योग, व्यापार व पर्यटन व्यवसायाचा विकास होतो. उदा., ट्रान्स सैबेरियन, रेल्वेमुळे कोकणचा विकास, भारतीय मैदानी प्रदेशातील रेल्वेमार्गामुळे, संयुक्त संस्थानातील पंचमहासरोवरातील औद्योगिक विकास, भारतातील पूर्व व पश्चि किनारपट्टीवरील बंदरांमुळे लोकसंख्या दाट आढळते. तर याउलट जेथे वाहतुकीची साधने अपुरी असतात तेथे लोकसंख्या कमी आढळते. उदा., अति उंच पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रवेश, घनदाट जंगलाचा प्रदेश इ.

व्यापार:

उत्पादन, वितरण व विनिमय केंद्रे असणाऱ्या ठिकाणी व्यापाराचा विकास होतो. ज्या प्रदेशात व्यापारी केंद्राचा विकास झाला आहे तेथे लोकवस्ती दाट आढळते. उदा. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, ग्रेट ब्रिटनमधील लंडन, लिव्हरकून व मैचेस्टर, संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क, बोस्टन, शिकागो इत्यादी चीनमधील शांघाय, जपानमधील टोकिओ, रशियातील मॉस्को, फ्रान्समधील पॅरिस इत्यादी, व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी आसपासच्या प्रदेशातील माल केंद्रित व विकेंद्रित होतो. अशा ठिकाणी लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे लोकसंख्या दाट आढळते.

जलसिंचन:

जलसिंचनाच्या साधनांमध्ये धरणे, कालवे, तलाव, सरोवर यांचा समावेश होतो. ज्या प्रदेशात या साधनांची प्रगती होते तेथे शेती व उद्योगधंद्याचा विकास होत असल्यामुळे लोकसंख्या दाट आढळते उदा., भारतातील गंगा, सिंधू, सतलज, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा इ. इजिप्तमधील नाईल, पाकिस्तानातील सिंधू, युरोपातील हाईन, संयुक्त संस्थानातील मिसिसिपी, मिसुरी, चीनमधील हो हँग हो, यांगत्सी कँग इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात जलसिंचनाच्या सुविधांमुळे लोकसंख्या दाट आढळते.

खाणकाम :

ज्या प्रदेशात खनिजे व ऊर्जा साधनांचे साठे उपलब्ध असतात, अशा प्रदेशात खाणकाम व उद्योगधंद्याची प्रगती होते, प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते. उदा. भारतातील छोटा नागपूरचे पठार, सूर प्रदेश संयुक्त संस्थानातील अपिलेशियन पर्वत, दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन, जोहान्सबर्ग, ऑस्ट्रेलियातील मरे - डार्लिंग.

शहरीकरण:

ग्रामीण वस्तीचे रूपांतर नगरामध्ये होते त्या क्रियेस शहरीकरण असे म्हणतात. नगरामध्ये रोजगाराच्या संधी, सेवासुविधांची उपलब्धता, करमणूक व मनोरंजनाची साधने, व्यापार, उच्च राहणीमान इत्यादी घटकांमुळे लोकसंख्या केद्रित होते. उदा., मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, टोकियो, शांघाय, लंडन, मॉस्को, मेलबर्न, कोलंबो, इ.

सामाजिक व सांस्कृतिक घटक:

सामाजिक रूढी, परंपरा व त्याची बंधने, मूलतत्त्वे इत्यादी घटक समाजावर नियंत्रण करीत असतात. ज्या प्रदेशामध्ये मूलभूत सेवासुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी दाट लोकसंख्या आढळते. उदा. पुणे, कोलकाता, मुंबई, केंब्रिज, ऑक्सफर्ड, हॉवर्ड इत्यादी. संस्कृतीचा विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते

धार्मिक घटक:

धार्मिक कारणांमुळे लोकसंख्यावाढ होते. त्यामुळे लोकसंख्या वितरणात विविधता आढळते. उदा., इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्व, हिंदू धर्मातील बालविवाह, मुलगा वंशाचा दिवा इत्यादी प्रथांमुळे लोकसंख्या वाढते. तसेच संरक्षणाच्या दृष्टीने विशिष्ट धर्माचे लोक एकत्रित येऊन राहतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते. त्यामुळेच ढाका से मक्का या अरब प्रदेशात इस्लामधर्मीयांची लोकसंख्या आढळते. तसेच हिंदू बहुल धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या जास्त आढळते.

ऐतिहासिक घटक:

ऐतिहासिक प्रसिद्ध घटनांमुळे ठिकाणे नावारूपाला येतात त्यामुळे त्या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व वाढून लोकसंख्या वाढते. उदा., पानिपत (हरियाणा), प्लासी (मध्य प्रदेश), औरंगाबाद, पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल), आग्रा, दिल्ली, उत्तर प्रदेश, विजापूर (कर्नाटक), पॅरिस (फ्रान्स), लंडन (इंग्लंड), वाटर्ली (इटली), तसेच ऐतिहासिक काळातील राजधान्या, किल्ले, राजवाडे, युद्धभूमी, इत्यादी ठिकाणीही ऐतिहासिक महत्त्वामुळे लोकसंख्यावाढ आढळते

राजकीय घटक:

राजकीय घटकांचाही कमी-अधिक प्रमाणात लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. ज्या प्रदेशात अशांतता निर्माण होते तेथे लोकसंख्या कमी आढळते.उदा. भारत - पाकिस्तान सीमा. स्थिर शासनव्यवस्था असलेल्या प्रदेशात शांतता व स्थैर यामुळे सामाजिक, आर्थिक व सामाजिक विकास होऊन लोकवस्ती वाढत जाऊन लोकसंख्येत वाढ होते.

1 comment:

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक  पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या...