पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक
पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन प्रादेशिक विकासास मदत होते. असे असले तरी पर्यटनाचा सर्वत्र सारखा विकास झालेला नाही कारण त्यावर खालील घटकांचा प्रभाव पडतो.
१. प्राकृतिक घटक
२. सामाजिक व सांस्कृतिक घटक
३. आर्थिक घटक
1. प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक :
भूपृष्ठ रचना / भूरुपे: उत्तुंग पर्वतरांगा, हिरवाईने नटलेले डोंगर, पाना-फुलांनी बहरलेल्या दऱ्या, घळ्या, नद्यांची बहारदार पात्रे, हिमनद्यांचे मनमोहक भुआकार, विस्तृत मैदाने, अथांग महासागर, वाळूचे रुपेरी मैदाने, मरुस्थळी पर्यटकांचे देहभान हरपून टाकतात.
पर्वत व डोंगररांगा : पूर्वीच्या काळी परंपरागत शेती व चराऊ कुरणांसाठी डोंगररांगाचा वापर केला जात असे.
पर्यटन क्षेत्राचा विकास होवू लागल्यापासून विकसीत देशात पर्यटक मोठ्या संख्येने या पर्वतरांगातील हिरवाईने नटलेल्या भागात आपला वेळ व्यतीत करू लागले आहेत. हिमाच्छादित उत्तुंग पर्वतरांगाचे आकर्षण साहसप्रेमी पर्यटकांमध्ये वाढू लागले आहे. पानाफुलांनी बहरलेली झाडे, इंद्रधनुषी,सूर्यकिरणे, सूर्यास्त मनमोहक असतात. स्वच्छ व प्रदुषणमुक्त हवेमुळे आरोग्यधामांची निर्मिती केली जाते. डेहराडून, सिमला, दार्जिलिंग, मसुरी, उटी, महाबळेश्वर अशा असंख्य डोंगररांगांनी वेढलेल्या हिरवाईने नटलेल्या स्थळांवर पर्यटक गर्दी करतात.
पर्यटन क्षेत्राचा विकास होवू लागल्यापासून विकसीत देशात पर्यटक मोठ्या संख्येने या पर्वतरांगातील हिरवाईने नटलेल्या भागात आपला वेळ व्यतीत करू लागले आहेत. हिमाच्छादित उत्तुंग पर्वतरांगाचे आकर्षण साहसप्रेमी पर्यटकांमध्ये वाढू लागले आहे. पानाफुलांनी बहरलेली झाडे, इंद्रधनुषी,सूर्यकिरणे, सूर्यास्त मनमोहक असतात. स्वच्छ व प्रदुषणमुक्त हवेमुळे आरोग्यधामांची निर्मिती केली जाते. डेहराडून, सिमला, दार्जिलिंग, मसुरी, उटी, महाबळेश्वर अशा असंख्य डोंगररांगांनी वेढलेल्या हिरवाईने नटलेल्या स्थळांवर पर्यटक गर्दी करतात.
ज्वालामुखी: भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला लाव्हारस एखाद्या भेगेतून किंवा छिद्रातून बाहेर येण्याच्या क्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. या उद्रेकातून लाव्हारसाबरोबर अंतर्गत भागातून खडकांचे तुकडे, राख, धुलीकण, चिखल, विषारी वायू भूपृष्ठावर फेकले जातात. व काही कालावधीनंतर थंड होतात. लाव्हारसापासून विविध भूआकारांची निर्मिती होते. मृत ज्वालामुखीच्या मुखापाशी पावसाचे पाणी साठून क्रेटर लेक्सची निर्मिती होते. हा निसर्गाचा रौद्र अवतार असला तरी त्याचे सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करत असते. जपानमधील फुजियामा, भूमध्य सागरातील व्हॅल-कॅनो, पिलीयन स्ट्रॅम्बोली
दऱ्या, घळई : पानाफुलांनी, हिमाच्छादीत डोंगररांगाच्या पायथ्याला हिरवाईचा शालू पांघरलेल्या खोल दऱ्या पर्यटकांना साद घालत असतात. दऱ्या खोऱ्याचे सौंदर्यही अवर्णनीय असते. विविध वृक्षांनी नटलेल्या दऱ्या वन्य प्राणी पक्षांचे आश्रयस्थान असतात. मुक्तपणाने वावरणाऱ्या जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या या प्राण्यांचा मुक्त वावर पाहण्यासाठी पर्यटक या भागात जातात. जबलपूर येथील नर्मदा नदीने तयार केलेली संगमरवरी दरी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. अमेरिकेतील कोलोरॅडो घळई , हिमाचल प्रदेशातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केरळमधील सायलेंट व्हॅली
प्रवाळ द्विपे: समुद्रात राहणाऱ्या प्रवाळ किटकांच्या अवशिष्ठ भागापासून प्रवाळ खडकांची निर्मिती होते. प्रवाळ किटक हे अतिशय सूक्ष्म स्फटिकासारखे व रंगीबेरंगी असतात. त्यांचे सांगाडे एकत्र येवून या प्रवाळ खडकाची निर्मिती होते. पर्यटक पाण्याखाली जावून या प्रवाळ खडकांचे सौंदर्य अनुभवत असतात. आज पृथ्वीवरील सर्व प्रवाळ दिपे त्यांच्या विलक्षण सौंदर्याने पर्यटकांना मोहित करत आहेत. ही बेटे आज पर्यटन केंद्रे म्हणून विकसीत झाली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात क्वीन्सलॅन्डच्या किनाऱ्याने पसरलेली 'ग्रेट बॅरिअर रिफ' ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ मालिका १९२० कि.मी. लांबीची आहे. भारतातील आदमान निकोबार बेटाजवळील संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनान्यावरील फ्लोरीण रिफ ही ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे बनू लागली आहेत.
हवामान: स्वच्छ व अल्हाददायक हवामान असलेल्या भागात पर्यटक नेहमी गर्दी करतात. सर्वत्र हवामान सारखे आढळत नाही. काही ठिकाणी हवामान उष्ण व दमट असते तर काही ठिकाणी उष्ण व कोरडे असते. स्वच्छ आरोग्यवर्धक हवामान असलेल्या प्रदेशात पर्यटनाचा विकास होतो. विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा समशितोष्ण कटिबंधातील पर्यटन स्थळे स्वच्छ हवामानामुळे विकसित होतात. पर्वतीय प्रदेशात आरोग्यधामांची निर्मिती होते. उदा. डलहौसी, कुलू-मनाली, सिमला, कोडाई कॅनॉल, उटी इ. ठिकाणची आरोग्यधामे प्रसिद्ध आहेत. भूमध्य सागरी, पश्चिम युरोपीय व मौसमी हवामानाच्या प्रदेशात पर्यटन व्यवसाय विकसित होतो. स्वच्छ व सुर्यप्रकाशयुक्त हवेमध्ये सूर्य स्नानासाठी (Sun Bath) पर्यटकांची गर्दी असते. अनुकूल हवेमुळे पर्यटन व्यवसाय विकसीत होण्यास मदत होते.
पर्जन्य : रिमझिम पावसात मनसोक्त फिरण्याची मजा तरुण पर्यटकांना मात्र साद घालत असते. उष्ण कटिबंधातीलपर्जन्य हंगामी असते. समशितोष्ण कटिबंधात पर्जन्य वर्षभर रिमझिम स्वरुपाचा असतो. पाण्याचा मुबलक पुरवठा होतो. पाणी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे इथे पर्यटन विकसित होते. माथेरान, पंचमढी, महाबळेश्वर येथे पावसाळ्यात तरुणाई स्वच्छंदे बागडताना दिसते. पर्जन्यामुळे काही भागात धबधबे, झरे निर्माण होतात, तलाव भरतात. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटक याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.
हिम: पृथ्वीवरील उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवीय भागात अतिशीत हवामान आढळते. ही क्षेत्रे नेहमी बर्फाच्छादित असतात. अतिशय थंड हवामारामुळे वर्षातील बहुतेक दिवस येथे बर्फवृष्टी होत असते. उन्हाळ्यात काही पर्यटक या ठिकाणी पर्यटनास येतात. अतिशय थंड हवामानामुळे या भागात पर्यटकांची संख्या कमी आढळते. हिमवृष्टीचा अनोखा अविष्कार पाहण्यासाठी पर्यटक उंच पर्वतीय प्रदेशात गर्दी करतात. हिवाळ्यात पर्वतीय प्रदेशात चालणारे हिवाळी खेळ पर्यटकांचे आकर्षण आहेत. उदा. जन्मू काश्मिरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, हिमाचल प्रदेशात - उलहौसी, सिमला, कुलू-मनाली हिवाळी स्पर्धांचे आयोजन केले जाते. काही वेळेला हिमवृष्टीमुळे वाहतुकीच्या सुविधा विस्कळीत होतात. विमान वाहतूक व रस्ते वाहतूक बंद होते. हवामानाचे इतर आविष्कारही पर्यटकांना साद घालतात. दाट धुक्यातून वाट काढत फिरण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. दव, धुके, राईम, गारा निसर्गाच्या सौंदर्यात भर घालत असतात.
वन्य प्राणीजीवन: प्राण्याचे निवासस्थान म्हणजे डोंगराळ भागात असणारी घनदाट जंगले होय. मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राण्यांचे हे वस्ती स्थानांचे क्षेत्र कमी होवू लागले आहे. जंगलामध्ये वन्य पशु पक्षांना मुक्तपणे आपले जीवन जगता येते. पशुपक्षांचा हा मुक्त संचार जवळून अनुभवण्यासाठी पर्यटक जंगलयुक्त प्रदेशात जात असतात.. या पशु-पक्षांचे विहंगम दर्शन मानवी मनाला आनंद देते.
अभयारण्ये: पशुपक्षांसाठी तयार करण्यात आलेल्या संरक्षित क्षेत्रास अभयारण्य म्हणतात. मानवाच्या अतिवावरामुळे प्राण्यांच्या मुक्तपणे फिरण्यावर काही प्रमाणावर बंधने आली. देश विदेशचे हजारो पर्यटक या अभयारण्यांना भेटी देतात. भारतातही सुमारे २४० अभयारण्ये अस्तित्वात आहेत. विशिष्ट प्राण्यासाठी ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. उदा. आसाम – काझीरंगा, गुजरातमधील सौराष्ट्र - गीर, आंध्र प्रदेशातील - नागार्जुनसागर महाराष्ट्रात चंद्रपूर – ताडोबा, म. प्रदेशातील - कान्हा, उत्तरांचलमधील - जिम कार्बेट नॅशनल पार्क तमिळनाडू - मदूमलाई, महाराष्ट्रातही अशी अभयारण्ये निर्माण केली आहेत. उदा. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील 'नागझिरा अभयारण्य' व नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान
मृगया क्षेत्रे : शिकार हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. पूर्वी अन्नासाठी शिकार केली जात असे. प्राचीनकाळी राजे, महाराजे, मंत्री, सरदार यांच्या शिकारीच्या छंदासाठी मुघयाक्षेत्र निर्माण केली जात असत. सागरी भागातही मासेमारीसाठी पर्यटकांची गर्दी असते. आज शिकार बंदी असल्याने व त्यांच्या अवयवाची विक्री करणे पर्यटनास मर्यादित स्वरूप प्राप्त झालेले आहे.
जंगले: पर्यटन व पर्यावरण या दोन्हीसाठी जंगलाची आवश्यकता असते. उच्च पर्वतीय जास्त पावसाच्या ठिकाणी वनस्पतींच्या आश्रयाने राहणाऱ्या पशूपक्षांचे निरीक्षण केले जाते. भारतात सिमला, उटी, दार्जिलिंग केठिकाणी जंगलामध्ये पर्यटनाचा विकास झालेला आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले आंबा, फोंडा ही ठिकाणे सांगली, सातारा,कोल्हापूरच्या पर्यटकासाठी पर्वणीच ठरलेली आहेत.
गवताळ कुरणे :-खंडातर्गत कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात गवताळ कुरणे पसरलेली असतात. या कुरणांना जगभरात विविध नावानी ओळखले जाते. आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय गवळात प्रदेशास सॅव्हाना म्हणून ओळखले जाते. समशितोष्ण कटिबंधात यांना स्टेपी (रशिया), प्रेअरी (उत्तर अमेरिका), व्हेल्ड (आफ्रिका) नावाने ओळखले जाते. पावसाळ्यात ही कुरणे हिरवेगार तर हिवाळ्यात ती पिवळी पडतात. पावसाळ्यातील व हिवाळ्यातील हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात
मरूस्थळी :-वाळवंटी प्रदेशात हिरवाईने नटलेला प्रदेश म्हणजे मरूस्थळ होय. मरूस्थळानाच ओयासिस असेम्हटले जाते. येथे पाण्याची थोडीफार उपलब्धता असल्याने खजूराची व इतर झाडी आढळतात. सहारा व अरबस्थानच्या वाळवंटात अशी मरूस्थळी पाहावयास मिळतात.
जलविभाग: निसर्गाच्या सौंदर्यात पाण्याचे विविध अविष्कार सौंदर्यवृद्धी करत असतात. नदी, सरोवरे, हिमनद्या, उष्णोदकाचे फवारे, धबधबे, समुद्र अशा विविध अविष्कारांतून पर्यटक आनंदाची अनुभूती घेत असतो. जगातील अनेक संस्कृत्या नदीकाठावर विकसित झाल्या आहेत. उदा. भारतीय संस्कृती - सिंधू नदीच्या काठावर, इजिप्शियन संस्कृती - नाईलच्या काठावर
नदया : पूर मैदान तसेच बारमाही पाण्यामुळे शेतीचा विकास होतो. शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास होतो. नदीने आपल्या प्रवाह मार्गात निर्माण केलेले भूआकारही तितकेच सौंदर्यपूर्ण असतात. नद्यांच्या काठावर अनेक स्थळे निर्माण होतात. नदी ही आपणासाठी पवित्र असल्याने तिच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे विकसित झाली आहेत. उदा. गंगेच्या पवित्र काठावर - अलाहाबाद, वाराणसी, हरिद्वार, ऋषीकेश यमुनेच्या काठावर - मथुरा, वृंदावन, गोदावरी - नाशिक, नांदेड, भीमा - पंढरपूर, कृष्णा - औदुंबर, नृसिंहवाडी अशी शेकडो पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. नदी आपल्या प्रवाहमार्गात निर्माण करत असलेली कुंडल कासार सरोवर, त्रिभूज प्रदेश प्रेक्षणीय असतात. नदयांनी आपल्या पात्रात निर्माण केलेल्या घळ्या अतिशय सौंदर्यपूर्ण असतात. उदा. जबलपूर जवळ नर्मदेने भेडाघाट येथे तयार केलेली संगमरवरी घळई, तसेच काही नदी प्रदेश घनदाट जंगलांनी युक्त असतात. उदा. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे
सरोवरे : सरोवरे म्हणजे भूपृष्ठावरील खोलगट भागातील जलसंचय होय. सरोवरांची निर्मिती खडकात असलेल्या खोल भागात पाण्याचे संचयन होवून होते. यांचे अस्तित्व पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. काही सरोवरे गोड्या पाण्याचे तर काही खारट पाण्याचे असतात. निसर्ग सौंदर्याबरोबर नौकानयनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. भारतात लोणार (महाराष्ट्र) चिल्का (ओरिसा), सांबर ( राजस्थान) ही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. दाल, वूलर (जन्मू काश्मिर), कोलेरू (आंध्र), नैनीताल, दक्षिण तिबेट मधील मानस सरोवर ही गोड्या पाण्याची सरोवरे सृष्टीसौंदर्याच्या दृष्टीने यांना विशेष महत्व आहे. निसर्ग सौंदर्यांनी बहरलेल्या शांत सरोवरांचे प्रदेश आरोग्यधाम विश्रांतीस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. उदा. भारतातील उटी, महाबळेश्वर, तोरणमाळ येथील सरोवरे, मध्य आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवर, संयुक्त संस्थाने व कॅनडाच्या सीमेवरील ग्रेट लेक्स इ.
जलप्रपात : निसर्गाचे सौंदर्य वाढवणारा एक अविष्कार म्हणजे जलप्रपात होय. खळाळत खडकांवरून खाली झेपावणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आपणाला उल्हासित करत असतो. या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाच्या खाली खडकांवर पडत असताना होणारा आवाज, खाली झेपावताना उडणारे पाण्याचे तुषार, या प्रचंड जलौंधावर पडणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य आजूबाजूच्या परिसरात असणारा हिरवाईने नटलेला निसर्ग यांचे तरुण पर्यटकांना जास्त आकर्षण असते. जगात अनेक नद्यांच्या पात्रात धबधब्याची निर्मिती झाली आहे. धबधब्यांची ही ठिकाणे आज पर्यटन स्थळे म्हणून विकसित झाली आहेत.
बेटे: सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूखंडभूमीस बेटे म्हणतात. चारही बाजूंनी अथांग निळा महासागर, रुपेरी वाळूचे किनारी मैदान, वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जीवनसंस्कृती, अप्रतिम निसर्ग सौंदयनि बहरलेली. क्षेत्रे यामुळे पर्यटन विकास होत आहे. भारताच्या जवळील अंदमान निकोबार, लक्षद्विप बेटे. हिंदी महासागरातील मॉरिशस बेटे. पॅसिफिक महासागरातील हवाई बेटे तेथील अप्रतिम सौंदयनि पर्यटकांची आवडीची ठिकाणे आहेत.
समुद्रकिनारे : सागरी बेटांप्रमाणे निसर्गसौंदर्याची उधळण करणारे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. अथांग महासागर किनाऱ्यावर खळाळत येणाऱ्या लाटा, भरती-ओहोटी किनाऱ्यावरील वाळूची मैदाने, नारळ-पोफळीच्या बागा, लाल मातीची मैदाने डोंगर उतारावर असणारी भाताची शेती यांचे सौंदर्य सागरी किनाऱ्याचे सौंदर्य वाढवत असते. या सौंदर्यात सुर्योदय व सूर्यास्त भर घालत असतात. समुद्रकिनारे आहेत अशा भागात पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. उदा. गोवा, मुंबई इ.
2. सामाजिक घटक व सांस्कृतिक घटक :
पर्यटनामध्ये भौगोलिक घटकांबरोबरच सामाजिक घटकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. रॉबिन्सन यांनी 'पर्यटन भूगोल' या प्रभात सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक घटकांना विशेष महत्व दिले आहे. मानवी वस्त्या, प्रार्थना स्थळे, ऐतिहासिक अवशेष, स्मारके यांचे पर्यटकांना आकर्षण असते.
धर्म:- धर्म व धार्मिक स्थळांना पर्यटनामध्ये विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळात पर्यटन हे धार्मिक कारणासाठी केले जात असे. तीर्थक्षेत्र. नद्याची उगमस्थाने, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, दर्गे व मस्जित, साधुसंतांच्या समाध्या यांना मोठ्या प्रमाणवर पर्यटक भेटी देतात. हरिद्वार, वाराणसी, अलाहाबाद, मधुरा, वृंदावन, तिरुपती, मदुराई, सारनाथ, कन्याकुमारी, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी-नाशिक. हिंदू धर्मियांची पवित्र धार्मिक स्थळे आहेत. तेथे पर्यटकांची गर्दी असते. इस्लाम धर्मियांची मक्का, मदिना, ख्रिश्चनांचे व्हॅटीकन सिटी, ज्यु लोकांचे जेरूसलेम येथेही पर्यटक येत असतात. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी यात्रा व उत्सवानिमित्त लाखो भाविक पर्यटन स्थळांना भेटी देतात. उदा. पंढरपूर, पाली, जोतिबा, तुळजापूर, शिर्डी, अक्कलकोट इ.
क्रीडा :- जगामध्ये विविध ठिकाणी सातत्याने खेळांचे आयोजन केले जाते. उदा. फुटबॉल स्पर्धा, ऑलिंपिक स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा इ. अशा विविध स्पर्धामुळे पर्यटक त्याठिकाणी जमा होतात व खेळाचा आनंद लुटतात. त्यामुळे तेथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते.अलीकडील काळात भारतामध्ये अनेक प्रकारचे साहसी खेळ खेळले जातात. उदा. हिवाळी स्किडंग, स्कूबा ड्रायव्हिंग, पैराग्लाइडिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहण, वॉटर राफ्टिंग इ. उत्तर भारतामध्ये गंगा, सिंधू, सतलज, चिनाब या नद्यांमध्ये रिव्हर राफटिंग हा साहसी खेळ पर्यटकांना अनुभवता येतो. पश्चिम घाट व हिमालयीन पर्वत रांगांमध्ये पॅराग्लाइडिंग या साहसी खेळाचे आयोजन केले जाते. समुद्री किनारी भागात सेलिंग, वॉटर स्कीइंग, विंड सर्फिंग अशा खेळाचे आयोजन केले जाते.
चालीरिती, परंपरा व उत्सव :- प्रत्येक समाजाच्या चालीरिती, रूढी-परंपरा वेगवेगळ्या असतात. पर्यटकांना अशा भिन्न-भिन्न परंपरांचे आकर्षण असते. समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सण, उत्सव अनुभवण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत असतात.भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक प्रदेशाचा विशेष असा सण व उत्सवसाजरा केला जातो. उदा. संक्रांत (महाराष्ट्र), पतंग महोत्सव (गुजरात), पोंगल (आंध्र प्रदेश, तामिळनाडू), नवरात्री, जन्माष्टमी, दसरा दिपावली, रामनवमी (संपूर्ण भारत), ओनम (केरळ), रथयात्रा (ओडिशा) इ. भारतातील अशा उत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटक सहभागी होत असतात
नृत्य व संगीत :- मानवी समाजात व त्यांच्या परंपरा, चालिरीती, रूढी-परंपरा यामध्ये विविधता पहावयास मिळते. या विविधतेचे प्रतिबिंब त्यांच्या नृत्य व संगीतात पहावयास मिळते. भारताला नृत्य व संगीताची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. विविध प्रदेशाचे नृत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदा. भरतनाट्यम् (कनार्टक), कुचीपुडी (आंध्र प्रदेश), कचकली (केरळ), ओडिसी (ओडिसा) इ. या नृत्यातून मानवी भावना व्यक्त केल्या जातात. जीवनातील आनंदी क्षणी व नवीन ऋतूच्या आगमनावेळी नृत्ये सादर केली जातात. उदा. भांगडा (पंजाब), बांबूनृत्य ( मिझोराम), गरबा, दांडिया (गुजरात), लेझीम, लावणी (महाराष्ट्र) इ.भारतीय शास्त्रीय संगीत फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ढोलक, बासरी, संतूर, पखवाज, सरोद, शहनाई इ. वाद्ये आपल्या प्राचीन संगीताची उज्ज्वल परंपरा व्यक्त करतात.
हस्तकला :-लहान-मोठे हस्त उद्योग पर्यटकांना आकर्षित करतात. उदा. कश्मिरच्या शाली, गालीचे, म्हैसूरच्या रेशमी साड्या , चंदनाच्या वस्तू , औरंगाबादची पैठणी इ. हस्तउद्योगांमुळे तेथील पर्यटनाचा विकास झाला आहे.
आहार :- जगामध्ये आहारामध्ये भिन्नता पहावयास मिळते. काही पर्यटन केंद्रेही तेथे मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहारामुळे प्रसिध्द आहेत. उदा. सिंगापूर, हाँगकाँग चायनीज पदार्थ, कोकणातील-भात, मासे, दिल्ली-पेढा, म्हैसूर म्हेसूरपाक, दक्षिण भारत-तांदळाचे विविध पदार्थ, महाराष्ट्र पुरण पोळी इ.
ऐतिहासिक घटक: यामध्ये युद्धभूमी, स्मारके, किल्ले व ऐतिहासिक वास्तू याचा सामावेश होतो. सुरुवातीच्या काळी सत्ता विस्तारासाठी सतत युद्धे होत असत अशी ठिकाणे युद्धभूमीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. उदा. पानिपत, प्लासी, हल्दिघाट इ. स्मारके: श्रीरंगपट्टणम, रायगड, वढू बुद्रुक, किल्ले: रायगड, आग्रा, चितोड, मेवाड, जयपूर, सिंधुदुर्ग, जिंजीरा. ऐतिहासिक वास्तू: म्हैसूर- म्हैसूर पॅलेस , विजापूर- गोलघुमट , हैदराबाद- चारमिनार, आग्रा- ताजमहाल ,पुणे – शनिवार वाडा
3. आर्थिक घटक :
वाहतूक : पर्यटन विकासामध्ये सुगमतेला महत्त्वाचे स्थान असते. प्रदेशांचा आर्थिक विकास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रस्ते, रेल्वे, हवाई व सागरी मार्गांच्या विकासाबरोबरच दळणवळण साधनांमध्ये झालेला आमूलाग्र बदल होय. यामुळे पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होत असतो. पर्वतीय व पठारी प्रदेशांपेक्षा मैदानी प्रदेशात सुलभ दळणवळण मार्गांचा व साधनांचा विकास झालेला असतो. त्यामुळे मैदानी प्रदेशात धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्रांचा उदय व विकास झालेला आहे. उदा., मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर, अलाहाबाद इत्यादी. याउलट ज्या प्रदेशात वाहतुकीचा विकास झालेला नाही अशा ठिकाणी पर्यटनाचा विकास होत नाही. याच कारणामुळे नैसर्गिक सृष्टिसौंदर्याबरोबर अनेक घटकांची उधळण करणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांचा पर्यटन क्षेत्रात विकास झाला नाही. वाहतुकीची साधने सोईची असतील तर पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळी गर्दी करतात.
उद्योग : पर्यटन विकासात उद्योगधंदे हा आर्थिक घटक महत्त्वाचा आहे. पर्यटक कोणताही उद्योगधंदा न करण्याच्या हेतूने आलेला असतो, परंतु काही पर्यटकांना विविध उद्योगधंद्यांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झालेली असते. याच जिज्ञासेपोटी जी औद्योगिक नगरे आहेत त्या नगरांना पर्यटक भेटी देतात. उदा., बर्कले, लंडन, शिकागो, गॅरी, मँचेस्टर, टोकिओ, बीजिंग, केपटाउन, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता इत्यादी उद्योगधंद्यांच्या संदर्भातील त्या ठिकाणचे असलेले वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य व तंत्रज्ञान यांचे अवलोकन करून निरीक्षणाद्वारे स्वदेशातील उद्योगधंद्यांच्या विकासात त्याचा वापर करणे पर्यटकांच्या हिताचे असते. याशिवाय पर्यटन स्थळी विविध हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. उदा., काश्मीरमधील शाली व गालिचे, पैठणी, जोधपुरी, पितांबरी इत्यादी स्थानिक मालास उठाव निर्माण होतो. याशिवाय महाबळेश्वरमधील विविध फळांचे ज्यूस, चॉकलेट्स, लाकडी नक्षीदार काठ्या, सावंतवाडीतील लाकडी खेळणी पर्यटकांना आकर्षित करून घेत असतात. तसेच विविध समुद्रकिनाऱ्यावरील मोती. शंखांच्या माळा त्याचबरोबर इतर ठिकाणची मद्यनिर्मिती, विविध प्रकारच्या नवनवीन गोष्टी पर्यटकांना गर्दी करण्यास कारणीभूत असतात. विविध औद्योगिक नगरे ही पर्यटनाला पोषक ठरतात
हॉटेल आणि निवास व्यवस्था : पर्यटन स्थळी असलेली निवासस्थाने, (हॉटेल, धर्मशाळा, लॉजेस) हीदेखील पर्यटकांची आकर्षणे असतात. ज्या ठिकाणी निवास व्यवस्था व जेवणाची उत्तम सोय असते व जेथे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सेवा चांगल्या, स्वस्त व तत्पर मिळतात अशा ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षिले जातात. तेथे पर्यटनाचा विकास होतो. उदा., गणपतीपुळे, पावस, सावंतवाडी इत्यादी. याउलट ज्या ठिकाणी निवासाचा अभाव असतो तेथे पर्यटनाचा विकास होत नाही.
No comments:
Post a Comment