tipeharish.blogspot.com

Saturday, November 26, 2022

 स्थलांतर : 

जन्मदर व मृत्युदराप्रमाणेच स्थलांतर हा घटक कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येतबदल घडवून आणणारा एक महत्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या संरचनेत तसेच लिंग,भाषा, शिक्षण, व्यवसाय यामध्येही बदल होतो. त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे सांस्कृतिक अदलाबदलही होते. 

व्याख्या

  • मानव किंवा मानवी समूह एका भागातून दुसऱ्या भागात जातो या क्रियेला स्थलांतर असे म्हणतात
  • एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे एका भौगोलिक प्रदेशाकडून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशाकडे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी जाणे या क्रियेस स्थलांतर असे म्हणतात.
  • एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणाऱ्या व्यक्तींच्या किंवा मानवी गटाच्या हालचालीस किंवा क्रियेस स्थलांतर असे म्हणतात
  •  एका विशिष्ट कालावधीत एका भौगोलिक ठिकाणापासून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात राहावयास जाणे यास स्थलांतर असे म्हणतात.
स्थलांतराचे प्रकार :
प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्देशानुसार आणि स्थानानुसार वेगवेगळे प्रकार पडतात.

A) प्रदेशानुसार स्थलांतर
प्रदेशानुसार अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर 
१. अंतर्गत स्थलांतर : जेव्हा व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह देशाच्या सिमेअंतर्गत एका भागातून दुसऱ्या भगात जातात त्यास अंतर्गत स्थलांतर म्हणतात. उदा. मुबई वरून दिल्ली 
    अंतरराज्यीय स्थलांतर : जेव्हा एखाद्या देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरास                     अंतरराज्यीय स्थलांतर' असे म्हणतात. उदा., सोलापूर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात होणारे स्थलांतर
    राज्यांतर्गत स्थलांतर : जेव्हा एखाद्या राज्याच्या सीमेअंतर्गत होणाऱ्या स्थलांतरास किंवा एका जिल्ह्यातून                दुसऱ्या  जिल्ह्यात होणाऱ्या स्थलांतरास 'राज्यांतर्गत स्थलांतर' असे म्हणतात. उदा. सोलापूर जिल्ह्यातून लातूर          जिल्ह्यात होणारे स्थलांतर
२. आंतरराष्ट्रीय स्थलांतर : एखाद्या राष्ट्राच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राष्ट्राच्या सीमेत जाणे यास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे म्हणतात. उदा., भारतातून श्रीलंका देशात होणारे स्थलांतर आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा लोकसंख्यावाढ, वितरण व संरचना यावर मोठा परिणाम होतो. सर्वसाधारणपणे जगात अविकसित देशांतून विकसित देशात आंतरराष्ट्रीय स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते.

B) कालावधीनुसार स्थलांतर : कालावधीनुसार स्थलांतराचे अल्पकालीन व दीर्घकालीन स्थलांतर असे प्रकार पडतात.
१. अल्पकालीन स्थलांतर : आपल्या कायमस्वरूपी निवासापासून काही काळासाठी स्थलांतर केले जाते त्यास अल्पकालीन स्थलांतर असे म्हणतात. यास तात्पुरते स्थलांतर असेही म्हणतात. उदा., सोलापूरमधून मुंबई  येथे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर
२. हंगामी स्थलांतर : ऋतूनुसार किंवा हंगामानुसार होणाऱ्या स्थलांतरास हंगामी स्थलांतर असे म्हणतात. उदा., मराठवाड्यातून ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात ऊस  तोडणी हंगामात.
३.दीर्घकालीन स्थलांतर : या स्थलांतरात आपले राहते ठिकाण सोडून दीर्घकाळासाठी नवीन ठिकाणी स्थलांतर केले जाते.
४.कायमस्वरूपी स्थलांतर :एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्यास जाणे म्हणजे कायमचे स्थलांतर' होय. उदा., चांगली नोकरीची संधी, उच्च राहणीमान, आल्हाददायक हवामान इत्यादी कारणांमुळे स्थलांतरित व्यक्ती आकर्षित होते व कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा निर्णय घेते. 

C) उद्देशानुसार स्थलांतराचे प्रकार : सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक स्थलांतर असे मुख्य तीन प्रकार पडतात.
१. सांस्कृतिक स्थलांतर: सांस्कृतिक स्थलांतर हे एखादा धर्म, जात किंवा पंथाचे तसेच विशिष्ट संस्कृतीचे लोक आपला धर्म व संस्कृतीच्या प्रसारासाठी व संरक्षणासाठी स्थलांतर करतात त्यास सांस्कृतिक स्थलांतर असे म्हणतात. उदा., प्रेषित पैगंबरांनी इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी व संरक्षणासाठी अनुयायांसह मक्केहून मदिनेला केलेले स्थलांतर शिक्षणासाठी केलेली स्थलांतरे ही सांस्कृतिक स्थलांतरे आहेत. भारतातून ऑक्सफर्ड,केंब्रिज विद्यापीठात झालेली स्थलांतरे या प्रकारची आहेत
२. राजकीय स्थलांतर: राजकीय स्थलांतरे ही शक्यतो सक्तीने व अनिच्छेने होतात. युद्धे, देशाची फाळणी, देशाचे विभाजन, एकीकरण, सीमा, सरहद्द, याप्रसंगी होणारे स्थलांतर राजकीय स्वरूपाचे असतात. उदा., दोन्ही महायुद्धाच्या वेळी झालेली स्थलांतरे ही राजकीय स्थलांतरे होती. उदा., ज्यू लोकांनी जर्मनीतून इस्रायलकडे केलेले स्थलांतर, भारत व पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी, उत्तर व दक्षिण कोरियामध्ये झालेले युद्ध
३.आर्थिक स्थलांतर: मानवाचे जीवन हे आर्थिक घटकांवर अवलंबून असते. नोकरी, रोजगार, व्यापार व्यवसायानिमित्त जी स्थलांतरे केली जातात त्यास आर्थिक स्थलांतर असे म्हणतात. उदा., पोर्तुगीज, फ्रेंच, डच, स्पॅनिश, ब्रिटिश या युरोपियनांनी आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडात केलेली स्थलांतरे ही आर्थिक स्थलांतरे होती. आर्थिक स्थलांतर हे ऐच्छिक असते. त्यामध्ये कोणतीही सक्ती नसते. आधुनिक काळातील बहुतेक स्थलांतरे ही या प्रकारात मोडतात.

D) स्थानानुसार स्थलांतराचे प्रकार : ग्रामीण- ग्रामीण , ग्रामीण – नागरी, नागरी – नागरी,  व नागरी - ग्रामीण स्थलांतर असे प्रकार पडतात.
१. ग्रामीण- ग्रामीण स्थलांतर : एका गावाकडून दुसन्या गावाकडे होणारे स्थलांतर म्हणजे 'ग्रामीण ग्रामीण स्थलांतर' होय. एका लहान खेड्यातून मोठ्या खेड्याकडे रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने हे स्थलांतर केले जाते. विशेषतः शेतीसमृद्ध असलेल्या गावाकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. 
२. ग्रामीण - नागरी स्थलांतर : ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतरास 'ग्रामीण-नागरी स्थलांतर' असे म्हणतात, नागरी भागातील आकर्षित करणाऱ्या सेवासुविधा, उच्च राहणीमान, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, करमणुकीची साधने या घटकांमुळे खेड्यातील लोक नागरी भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. स्थलांतरामध्ये तरुणवर्गाचे स्थलांतर शहरी भागामध्ये प्रमाणात होते. उदा., कोकण, मराठवाडा, विदर्भ या विभागातील खेड्यातून रोजगार व इतर कारणाने पुणे, मुंबई या औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर 
३. नागरी - नागरी स्थलांतर: एका शहराकडून - दुसऱ्या होणाऱ्या स्थलांतरास नागरी नागरी स्थलांतर असे म्हणतात. रोजगाराच्या उत्तम संधी, वाहतूक वळणवळण, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन इत्यादी कारणांमुळे नागरी नागरी स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. उदा., सोलापूर शहरातून पुणे, मुंबई या शहराकडे होणारे स्थलांतर 
४. नागरी - ग्रामीण स्थलांतर : नागरी भागाकडूनग्रामीण भागाकडे होणाऱ्या स्थलांतरास नागरी ग्रामीण स्थलांतर असे म्हणतात नागरी भागातील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या विविध समस्या, लोकसंख्येची वाढ, प्रदूषण, जागेची टंचाई, वाहतुकीची कोंडी, बेकारी, असुरक्षितता, स्वच्छ हवामान, मुबलक पाणीपुरवठा इत्यादींमुळे नागरी भागातून लोक आपल्या गावाकडे येतात. शासकीय सवलतीमुळे अनेक ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तरावरील उद्योग सुरू झाल्याने नागरी भागातील लोक स्थलांतर करतात. ग्रामीण भागात दूध प्रकल्प, साखर उद्योग, कागदनिर्मिती, शैक्षणिक केंद्र, सूतगिरण्या इत्यादी ठिकाणी डॉक्टर, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवस्थापक मंडळ तसेच कौशल्यपूर्ण कामगारांना संधी मिळत असल्याने ग्रामीण भागात स्थलांतर होत आहे. उदा., मुंबई-पुणे शहरातून ग्रामीण भागाकडे होणारे स्थलांतर.

स्थलांतराची कारणे: 
नैसर्गिक घटक :
१. भूकंप व ज्वालामुखी : वारंवार भूकंप व ज्वालामुखी घडून येतात. अशा प्रदेशातील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतात. उदा., 1993 मध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपाच्या वेळी अनेक लोकांनी सुरक्षित ठिकाणी इतरत्र स्थलांतर केले. तसेच कैलिफोर्निया, जपान, इंडोनेशिया, न्यू गिनी येथे भूकंप व ज्वालामुखीच्या क्षेत्रातून अनेक लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेले आढळते.
२. भूमिपात : पर्वतीय प्रदेशात अनेकदा भूमिपात पडून जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे भूमिपात होणाऱ्या ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतर करतात. उदा. भूतान, नेपाळ व भारत इत्यादी 
३.महापूर व दुष्काळ : अतिपर्जन्य व बर्फ वितळल्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळून नद्यांना पूर येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सभोवतालच्या प्रदेशात पाणी पसरून प्राणहानी व वित्तहानी होते. ज्या नद्यांना वारंवार पूर येतात अशा नद्यालगतचे लोक पूररेषेच्या पलीकडे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतात. उदा., कोसी व ब्रह्मपुत्रा नदी (भारत), हो-यँग-हो नदी (चीन) अशा नदीच्या पूरग्रस्त प्रदेशातील अनेक लोक इतरत्र स्थलांतरित झाले आहेत.वारंवार दुष्काळ व अवर्षण पडणाऱ्या प्रदेशात शेतीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शेतीक्षेत्राशी संबंधित असलेले शेतकरी, मजूर बेकार होतात. अशा दुष्काळग्रस्त भागातील लोक जेथे अन्न, पाणी, रोजगार मिळेल अशा भागात स्थलांतर करतात. उदा. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातील माण, खटाव, जत, सांगोला
४. चक्रीवादळे:  चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्रीलगतच्या प्रदेशात प्राणहानी वितहानी होते. ज्या भागात अशा वादळांचा वारंवार धोका पोहोचतो. तेथील लोकांनी स्थलांतर केलेले आढळते. उदा., 1969 मध्ये आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागात हजारो लोक मृत्युमुखी पडले, तर हजारो लोक सुरक्षित ठिकाणी कायमचे स्थलांतर केले.

आर्थिक घटक 
१. सुपीक मृदा: ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मृदा ही सुपीक आढळते. अशा प्रदेशात शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. येथे उद्योग, व्यापार, वाहतूक दळणवळण सुविधांचा विकास होतो. अशा प्रदेशात मानवी जीवनाला सुखदायी व आरोग्यप्रद संधी प्राप्त होत असल्यामुळे, अशा प्रदेशात अनेक लोक स्थलांतरित होतात, उदा., भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, 
२. उद्योगधंदे : जगातील औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याने रोजगाराच्या निमित्ताने लोक आकर्षित होतात. अशा औद्योगिक प्रदेशात अनेक उद्योगधंद्यांचा विकास होऊन कुशल व अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. ज्या प्रदेशात औद्योगिकीकरण झालेले नाही, अशा प्रदेशातून लोक रोजगाराच्या निमित्ताने औद्योगिक प्रदेशात स्थलांतरित होतात. उदा., दूर- काईन, ओसाका पुणे- मुंबई इत्यादी. - कोबे - टोकिओ - यावाता, मॉस्को तुला गोरकी, भारतातील
३. वाहतूक व दळणवळण सुविधा : ज्या प्रदेशात वाहतुकीच्या विविध मार्गांचा व दळणवळणाचा विकास झाला आहे. अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. रोजगार, व्यापार व नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. कारण या प्रदेशात वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांमुळे लोक स्थलांतरित होतात.
४. खनिजे : तेथे खाणकाम व उद्योगधंद्याचा विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर नगरांची निर्मिती होऊन व्यापार व इतर विविध व्यवसायांचा विकास होतो. उदा., छोटा नागपूर पठारावरील खनिजे व ऊर्जासाधनांच्या उपलब्धतेमुळे जमशेदपूर, झारिया, बोकारो, राणीगंज, तसेच दिग्बोई (आसाम), अंकलेश्वर, कलोल (गुजरात), कालगुर्ली व कुलगाड़ (ऑस्ट्रेलिया), जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) ही शहरे खनिजसंपत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
५.विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार व विकास : ज्या प्रदेशात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार झालेला आहे. अशा प्रदेशात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च आढळतो. राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच दरडोई उत्पन्नात वाढ होत असल्यामुळे अशा सुखसंपन्न औद्योगिक प्रदेशात मानवाच्या विकासाच्या अनेक संधी व पर्याय निर्माण होतात.

सामाजिक व सांस्कृतिक घटक : 
सामाजिक व सांस्कृतिक घटकांचाही स्थलांतरावर परिणाम होतो. सामाजिक रूढी, परंपरा, चालीरीती, एकत्र कुटुंब पद्धती, विवाह पद्धती, जातिव्यवस्था, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक समानता, वांशिक दंगली, सामाजिक बहिष्कार या घटकांचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांमध्ये समावेश होतो. उदा., भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी हजारो मुस्लीम भारतातून पाकिस्तानात गेले व हजारो हिंदू पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अनेक बौद्ध प्रसारक इतर देशांत स्थलांतरित झाले. 18 व्या शतकात ख्रिश्चन धर्माचे धर्मप्रसारक जगातील अनेक देशात स्थलांतरित झाले. जर्मनीतील नाझीवादामुळे ज्यू लोकांनी इतरत्र केलेली स्थलांतरे ही महत्त्वाची आहेत. जगभरातील अनेक देशातील लोक केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहेत. तसेच भारतात नालंदा, तक्षशिला यांसारख्या शैक्षणिक ठिकाणी जगभरातील लोक स्थलांतरित झाले होते. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अनेक लोक स्थलांतरित होतात
राजकीय घटक :
राजकीय घटकात फाळणी, आणीबाणी, राजकीय अशांतता, तह, करार इत्यादी घटकांचा समावेश होतो. उदा., भारत व पाकिस्तान, उत्तर कोरिया दक्षिण कोरिया, इस्रायल पॅलेस्टाईन इत्यादी देशांत वारंवार राजकीय स्थित्यंतरे घडून येत असल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. तसेच 19 व्या शतकात युरोपातील राजकीय अशांततेमुळे अनेक लोक इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले होते.

स्थलांतराचे परिणाम:  
  • स्थलांतरितांमुळे स्वस्त व मुबलक प्रमाणात मजूर उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांचा विकास होतो.
  • स्थलांतरितांमुळे लोकसंख्येत वाढ होऊन स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते.
  • नागरीकरणाचा वेग वाढतो. 
  • साधनसंपत्तीचा विकास होतो.
  • अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा इत्यादींचे लोक एकत्र येऊन सामाजिकसलोखा व राष्ट्रीय ऐक्य निर्माण होते.
  • आचारविचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक अभिसरण घडून येते. 
  • आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होतात.
  • वाढत्या लोकसंख्येमुळे लोकसंख्या व साधनसंपत्ती यामध्ये असमतोल निर्माण होतो.
  • लोकसंख्येतील जन्मदर, मृत्युदर, नैसर्गिक वाढ, साक्षरता प्रमाण, लिंग, वयोगट इत्यादींमध्ये परिवर्तने घडून येतात.
  • स्थलांतरित व्यक्ती नवीन प्रदेशात आल्यामुळे त्यांना समायोजनासाठी काही काळ लागतो. या काळात विविध समस्या निर्माण होतात.
  • समाज, धर्म, जात, पंथ, विचारप्रणाली यातील भेदामुळे दोन समूहात सामाजिक संघर्ष निर्माण होतात. याचे रूपांतर अराजकता, धर्मयुद्ध, सामाजिक तणाव निर्माण होतो.
  • स्थलातरांमुळे भाषिक वाद निर्माण होतो
  • सामाजिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्य बिघडते.
  • मूळ निवासीक्षेत्र व स्थलांतर केलेले क्षेत्र यांच्यातील प्रादेशिक विकासात मोठी दरी निर्माण होते. 
  • स्थलांतरितांमुळे जागेची टंचाई निर्माण होऊन गलिच्छ वस्त्या व झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. 
  • स्थलांतरितांमुळे लोकसंख्या वाढून अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.
  • वाहतूक व दळणवळण , शिक्षण, आरोग्य या सेवासुविधांवर ताण पडतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय स्थलांतरे 
जगात दुसरे महायुद्ध इ.स. 1939 ते 1945 मध्ये घडून आले. या महायुद्धात जर्मनी, जपान, इटली व मित्र राष्ट्र सहभागी होती. दुसऱ्या महायुद्धाची सर्वांत जास्त झळ युरोपियन राष्ट्रांना बसली. या काळात अनेक युरोपीय लोक बेघर झाले. 
युरोपियन लोकांची आंतरराष्ट्रीय स्थलांतरे:  
    दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपचा नकाशा बदलून सीमाही बदलल्या. पोलंड, झेकोस्लाव्हिया व जर्मनी या तीन राष्ट्रांतील लोकांनी मोठ्या प्रमाणात इतर देशांतस्थलांतर केले. सन 1950 पर्यंत पश्चिम जर्मनीत आलेल्या निर्वासितांची संख्या 9 दशलक्ष इतकी होती, तर पूर्व जर्मनीतून 3.5 दशलक्ष व इतरत्र विविध देशांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे लोकसंख्येत घट झाली. 1948 पर्यंत रशियातून व इतर देशांतून पोलंडमध्ये 3.5 दशलक्ष ज्यू लोक स्थलांतरित झाले. झेकोस्लाव्हियातून हंगेरीत 100000 तसेच हंगेरी व बल्गेरियातून निर्वासित झालेल्या सुमारे तीन लाख लोकांचे तुर्कस्तानात पुनर्वसन करण्यात आले. 10,00000 लोकांचे प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इंग्लंडमध्ये व काही लॅटिन अमेरिकन देशामध्ये पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर दरवर्षी सरासरी 6 लाख लोकांनी युरोपबाहेर इतरत्र स्थलांतर केले. मुख्यतः इंग्लंड, इटली, जर्मनी, नेदरलँड, स्पेन व पोर्तुगाल या देशांमधून मोठ्या प्रमाणात युरोपबाहेर स्थलांतर झाले. अर्थात, त्यामुळे या सर्व देशांच्या लोकसंख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र असे घडले नाही कारण युरोपमध्ये इतर देशांमधून व युरोप शिवायही इतर खंडातून स्थलांतरित येत होते.दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर अमेरिकेत युरोपमधून 2.4 दशलक्ष स्थलांतरित लोक आले व दरवर्षी एक लाखाहून अधिक लोक दक्षिण अमेरिकन खंडातील देशातही स्थलांतरित येत होते. उत्तर अमेरिकेत आलेले 85 टक्के लोक हे युरोपियन देशांतून होते. ऑस्ट्रेलियाकडेही मोठ्या प्रमाणात (सुमारे 7 लाख) लोकांनी कायमच्या वास्तव्यासाठी स्थलांतर केले. 
आशियायी लोकांची स्थलांतरे:  
    आशियायी लोकांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतरहे फारच मर्यादित स्वरूपात झालेले आहे. इ.स. 1955 ते 1962 या काळात सुमारे 1.5 लाख लोक भारत व पाकिस्तानातून इंग्लंडमध्ये आले. आशियातील काही देशांमधून डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ अशा उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांनी युरोप व अमेरिकेमध्ये केलेले स्थलांतर महत्त्वाचे आहे.आशिया खंडातून सर्वांत मोठे स्थलांतर हे हिंदुस्थानच्या फाळणीनंतर झालेले दिसून येते. भारत व पाकिस्तानमधील लोकांनी एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी स्थलांतर केले. विशेषतः पंजाब, पश्चिम बंगाल, काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन हिंदू व मुस्लीम बांधव स्थलांतरित झाले. इ.स. 1951 ते 1956 या कालावधीत भारतात 1.5 दशलक्ष हिंदू तर इ.स. 1951 ते 1961 या काळात पाकिस्तानातून भारतात 1.32 दशलक्ष हिंदू स्थलांतरित झाले. 1947 मध्ये पॅलेस्टाईनची फाळणी झाल्यानंतर अरब निर्वासित स्थलांतर करून इस्रायलच्या सीमेबाहेर जॉर्डन, सिरिया, लेबनॉन येथे स्थलांतरित झाले. हाँगकाँगच्या 1961 च्या जनगणनेत असे दिसून आले की तेथील सुमारे 50 टक्के लोकसंख्या परदेशात जन्मलेली होती. याशिवाय दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्यामुळे आशियायी राष्ट्रांनी आज स्थलांतरावर मोठ्या प्रमाणावर बंधने घातल्यामुळे नवीन स्थलांतर पूर्णपणे थांबलेच शिवाय पूर्वीचेही स्थलांतरितही मूळ देशात पाठविण्यात आले. उदा., 1961 मध्ये इंडोनेशियातून चीनमध्ये सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोक पाठविले गेले, तसेच श्रीलंका, म्यानमार व मलेशियातूनही भारतीयांचे स्थलांतर थांबविले गेले.
आफ्रिकन लोकांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतर:  
दुसऱ्या महायुद्धानंतर इ.स. 1946 ते 1964 या काळात 2.5 दशलक्ष आज स्थलांतरित युरोपमधून दक्षिण आफ्रिकेत पाठविण्यात आले. त्यातील 3/5 इंग्लंडमधून आलेले होते. आफ्रिकेतील युरोपियनांच्या वसाहतीच्या स्वातंत्र्यानंतर विविध आफ्रिकन देशातून युरोपीय लोक व उत्तर अमेरिकन लोक मूळ देशात परतले. उदा., उत्तर आफ्रिकेतून एक दशलक्ष, अल्जेरियातून 9 लाख तसेच 1957 साली सुवेझ प्रकरणानंतर युनायटेड अरब रिपब्लिकमधून पुष्कळ युरोपियन परत गेले. 1964 साली करार करून नेलेले मजूर मोठ्या प्रमाणात आफ्रिकेत परतले. 1964 साली देखील पूर्व आफ्रिकन देशात (केनिया, युगांडा) भारतीय व युरोपियनांचे प्रमाण 4:51 असे होते. याशिवाय आफ्रिका खंडाच्याच एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात होणारे स्थलांतर हा आफ्रिकेतील महत्त्वाचा प्रकार आहे. शेती, खाणकाम, उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर आफ्रिकन लोकांना स्थलांतरित केले जातात. उदा., 1960 च्या जनगणनेत धाना असे दिसून आले की एकूण लोकसंख्येतील दर 12 माणसांमागे 1 माणूस परदेशी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची आफ्रिकेतील व आफ्रिकेतून झालेली आंतरराष्ट्रीय स्थलांतरे वांशिक, भाषिक भिन्नतेशी निगडित असून, काही प्रदेशातील दुर्मीळ साधनसंपत्तीवर पडणारा वाढत्या लोकसंख्येचा ताण हे त्याचे कारण आहे. 
***************

No comments:

Post a Comment

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक

पर्यटन विकासावर परिणाम करणारे घटक  पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय असून यामुळे मोठ्या प्रमणावर परकीय चलन प्राप्त होते याशिवाय रोजगाराच्या...