tipeharish.blogspot.com

Saturday, November 26, 2022

मृत्युदर

मृत्युदर 
संयुक्त राष्ट्रसंघ व जागतिक आरोग्य संघटना यांनी मृत्यू, गर्भमृत्यू व अर्भक मृत्यू यांच्या व्याख्या पुढीलप्रमाणे केलेल्या आहेत. 
 मृत्यू :व्यक्तींचा जन्म झाल्यानंतर केव्हाही ती व्यक्ती जिवंत असल्याचा जर सर्व पुरावा कायमचा नष्ट झाला तर त्या घटनेस मृत्यू असे म्हणतात. गर्भमृत्यू : मानवी गर्भाचा गर्भाअवस्थेतच मृत्यू झाला तर त्यास गर्भमृत्यू असे म्हणतात. अर्भक मृत्यू जर जन्मलेले बालक एका वर्षाच्या आत मृत्यू पावल्यास त्यास अर्भक मृत्यू असे म्हणतात. 

मृत्युदर मापनाची परिमाणे:   ढोबळ मृत्युदर, वय सापेक्ष मृत्युदर, वय व लिंग सापेक्षदर , बालमृत्यू दर 
ढोबळ मृत्युदर : ढोबळ मृत्युदर म्हणजे दरवर्षी दर हजार व्यक्तींमागे घडणारे मृत्यू होय.
वय सापेक्ष मृत्युदर : एखाद्या वर्षात विशिष्टगटातील दरहजारी लोकसंख्येमागे त्याच वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तींचे प्रमाण म्हणजे वयसापेक्ष मृत्युदर होय. वयसापेक्ष मृत्युदर काढण्यासाठी खालील सूचा उपयोग केला जातो. 
वय व लिंगसापेक्ष मृत्युदर : मृत्युदराचे प्रमाण जसे वयानुसार भिन्न असते तसेच लिंगानुसारही भिन्न असते. वय व लिंगसापेक्ष मृत्युदराला लोकसंख्येच्या अभ्यासात महत्त्वाचे स्थान आहे. कारण मृत्युदराचे प्रमाण स्त्री-पुरुषात वेगवेगळे असते. वय व लिंगसापेक्ष मृत्युदरात स्त्रिया व पुरुषांचे प्रमाण वयोगटानुसार वेगवेगळे करून मृत्युदर काढला जातो. यासाठी खालील सूत्राचा उपयोग करून वय व लिंगसापेक्ष मृत्युदर काढला जातो.
बालमृत्यू दर : साधारणपणे एक वर्ष वयापर्यंतच्या मुलामुलींना बालके किंवा अर्भके असे संबोधले जाते. बालमृत्यू दर काढताना याच वयोगटातील लोकसंख्या व त्यातील मृत्यू विचारात घेतले जातात. बालमृत्यू दर काढणे हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरते  प्रमाण जास्त आढळले, तर त्यामागे असलेली कारणे उदा., कुपोषण, साथीचे रोग, लसीचा अभाव इत्यादी शोधून त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. बालमृत्यू दर काढण्यासाठी खालील सूत्राचा उपयोग केला जातो.
मृत्युदरावर परिणाम करणारे घटक:  
वैवाहिक स्थिती : सर्वसाधारणपणे विवाहित व्यक्तीचे मृत्युदर अविवाहित व्यक्तींपेक्षा कमी असतो. कारण वैवाहिक जीवनात कौटुंबिक स्वास्थ्य, समाधान, जीवनाबद्दल दक्षता व सुरक्षितता, एकमेकांची काळजी घेतली जात असल्याने मृत्युदर कमी असतो. तर याउलट, अविवाहित व्यक्ती स्वैर व छंदिष्ट जीवन, व्यसनाधीनता, अनियंत्रण, एकाकीपणा, चिंताग्रस्त असल्यामुळे शारीरिक व मानसिक असंतुलन निर्माण होऊन मृत्युदराचे प्रमाण वाढते. 
व्यवसायाचे स्वरूप:  व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन व जेथे ती व्यक्ती काम करत असते तेथील परिस्थितीचा व्यक्तीच्या मृत्युदरावर परिणाम होतो. शेतीशी निगडित कष्ट करणाऱ्या व्यक्तींना शारीरिक व्यायाम, शुद्ध व स्वच्छ पर्यावरण उपलब्ध असल्यामुळे मृत्युदराचे प्रमाण कमी आढळते. मात्र सूतगिरण्यातील मजूर, रंगकाम करणारे, कोळसा खाणीतील खाण कामगार यांच्यामध्ये श्वसनसंस्थेचे आजार अधिक प्रमाणात आढळतात. उदा., क्षयरोग, दमा इत्यादी. तसेच धातू शुद्धीकरण केंद्र, पेट्रोकेमिकल्स उद्योग, रासायनिक उद्योग, वाहतूक व्यावसायिक, सागरी मासेमारी, औद्योगिक कामगार इत्यादींना धोकादायक कामे करावी लागतात. त्यांच्यामध्ये अपघाताने मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. 
शिक्षण: शिक्षणामुळे व्यक्ती स्वच्छता व आरोग्याविषयी दक्ष असते. स्वतः प्रमाणेच कुटुंबातील इतर व्यक्तींची विशेषता मुलांची काळजी घेतली जाते. त्यामुळे सुशिक्षितांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. सुशिक्षित लोकांची आर्थिक व सामाजिक स्थिती समाधानकारक असते. याउलट, अशिक्षित लोकांमध्ये व्यक्तींमध्ये आरोग्याची काळजी घेतली जात नाही. बऱ्याच वेळा बेफिकिरी, निष्काळजीपणा इ. आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मृत्युदर अधिक आढळतो.
ग्रामीण व नागरी प्रदेश : शहरांमध्ये नागरी सुविधा, वैद्यकीय सोईसुविधा व स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे तसेच राहणीमानाचा उच्च दर्जा, सामाजिक व आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे सर्वसामान्य मृत्युदर कमी आढळतो. याउलट, ग्रामीण भागात दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक कुचंबणा, निम्न राहणीमानाचा दर्जा, वैद्यकीय सोईसुविधांचा अभाव, वाहतूक व दळणवळण साधनांचा अभाव यांमुळे मृत्युदराचे प्रमाण जास्त असते.
वयसंरचना : वयसंरचनेचा मृत्युदरावर परिणाम होतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये राहणीमानाचा दर्जा उंचावून बालमृत्यूचे प्रमाण घटते. त्यामानाने प्रौढांचे व वृद्धांचे मृत्यू सावकाश होतात. यामुळे विकसित राष्ट्रांमध्ये बालमृत्यू दर कमी तर विकसनशील देशात जास्त असतो. 
लिंग संरचना: जगातील वेगवेगळ्या देशात पुरुष आणि स्त्री यांच्या मृत्युदराची पातळी वेगवेगळी आढळते. निसर्गतः स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आढळते. त्यामुळे पुरुषांचा मृत्युदर जास्त आढळतो. मात्र स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, वारंवार होणारी बाळंतपणे, निकृष्ट आहार, मानसिक व शारीरिक छळ इत्यादींचा परिणाम होऊन स्त्रियांचा मृत्युदर वाढतो. 
तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार:  तंत्रज्ञानात जे देश आघाडीवर आहेत अशा देशांमध्ये सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय क्रांती होऊन मृत्युदरात घट झाल्याचे दिसून येते. विकसित राष्ट्रांपेक्षा अविकसित व विकसनशील देशात तंत्रज्ञानाची प्रगती कमी झाल्यामुळे मृत्युदराचे प्रमाण जास्त असते
नैसर्गिक आपत्ती:  ज्या प्रदेशात वारंवार महापूर, भूकंप, दुष्काळ, भूमिपात, ज्वालामुखी, चक्रीवादळे, त्सुनामी, विजा पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती येतात. अशा प्रदेशात मृत्युदराचे प्रमाण अधिक असते.
मृत्युदराचे  परिणाम : 
  • जगात मृत्युदराचे प्रमाण सर्वत्र सारख्या प्रमाणात दिसून येत नाही. मृत्युदरावर अनेक घटकांचा परिणाम झालेला दिसून येतो
  • जास्त मृत्युदरामुळे जागतिक लोकसंख्येत घट होते.
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास श्रमशक्तीचा अभाव आढळतो त्यामुळे देशाचा विकास खुंटला जातो.
  •  मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्येचा आकार कमी होऊन स्थानिकबाजारपेठेतील उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही.
  • मृत्युदरात वृद्धांचे प्रमाण जास्त असल्यास तरुणांना दिशा दाखविणाऱ्यामार्गदर्शकांची कमतरता जाणवते. 
  •  मृत्युदर वाढल्यास अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात.
  • मृत्युदर जास्त झाल्यामुळे लोकसंख्येत घट होऊन घटल्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही.
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास लोकसंख्येत घट होऊन देशाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो
  • मृत्युदराचे प्रमाण जास्त असल्यास लोकसंख्येत घट होते व नैसर्गिक व आर्थिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन राहणीमानाचा दर्जा उंचावतो.
*****


No comments:

Post a Comment

  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...