tipeharish.blogspot.com

Monday, November 14, 2022

माल्थसचा लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त

माल्थसचा लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त

थॉमस रॉबर्ट माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने 1798 मध्ये लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त 'An Essay on the Principles of Population as it affects Future Improvement of Society' या आपल्या संशोधन ग्रंथात मांडला. लोकांचे दुःख व दारिद्र्य का निर्माण होते याचे उत्तर देण्याच्या दृष्टीने माल्यसने लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडला. लोकांच्या दुःखाला लोकच जबाबदार आहेत, बेकारी, दारिद्र्य, उपासमार, रोगराई महामारी व सामाजिक कलह यासाठी वाढती लोकसंख्याच जबाबदार आहे असे प्रतिपादन केले.

गृहीतके

  1. मानवाला जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे.
  2. स्त्री-पुरुषांमधील आकर्षण ही कायम राहणारी गोष्ट असून ती भविष्यकाळातही बदलणार नाही. म्हणजेच भिन्नलिंगी व्यक्तीमधील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या सतत वाढत राहते.

सिद्धान्त

लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त पुढील पाच मुद्द्यांमध्ये मांडला आहे.

  • लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने
  • अन्नाधान्न वाढ अंकगणिती श्रेणीने
  • लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल
  • नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय
  • प्रतिबंधात्मक उपाय
    • लोकसंख्या वाढ भूमिती श्रेणीने:

    माल्यसच्या मते स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गतः जबरदस्त लैंगिक आकर्षण असते व या आकर्षणामधून प्रजोत्पादन वाढते. दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्या भूमिती श्रेणीने म्हणजे दुपटीने वाढते. दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्या 1, 2, 4, 8, 16, 32, 64 या पद्धतीने वाढत जाते.

    • अन्नधान्य वाढ गणितीय श्रेणीने :

    माल्यस यांच्या मते अन्नधान्याची वाढ ही अंकगणिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या गतीने होते. दर 25 वर्षांत अन्नधान्याचे उत्पादन या गतीनेच वाढते.

    • लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल :

    दर 25 वर्षांमध्ये लोकसंख्यावाढ भूमिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 4, 8, 16, 32, 64 या गतीने वाढते तर याच काळात अन्नधान्याची वाढ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या अंकगणिती श्रेणीने वाढते. म्हणजेच लोकसंख्यावाढ ही अन्नधान्याच्या वाढीपेक्षा अधिक असते. त्यामुळे लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल निर्माण होतो. परिणामत: अनेक लोकसंख्याविषयक समस्या निर्माण होतात. उदा. उपासमार, दारिद्र्य, भूकबळी, कुपोषण इत्यादी.

    • नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय:

    लोकसंख्यावाढ ही अन्नधान्य उत्पादनापेक्षा जास्त असल्याने दोन्हींमध्ये असमतोल निर्माण होतो, असमतोल निर्माण झाल्यानंतर निसर्ग स्वतः लोकसंख्यावाढीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, दारिद्र्य, कुपोषण, निःसत्व आहार, साथीचे रोग, इतर रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप, युद्धे, इत्यादी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत जाते व त्यामुळे लोकसंख्या कमी होते.

    • प्रतिबंधात्मक उपाय :

    मानवाला वाढत्या लोकसंख्येवर स्वतःलाच नियंत्रण करावे लागते. मानवाला बुद्धिसामर्थ्य लाभले असल्यामुळे काही वेळा निसर्गाच्या नियंत्रणापूर्वीच तो प्रतिबंधात्मक उपाय योजतो. मानव स्वेच्छेने जन्मदरावर बंधने आणतो या संदर्भात माल्थसने खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. (अ) संयम : माल्यसने उशिरा लग्न करणे, नैसर्गिक संयम, ब्रह्मचर्य पालन, घटस्फोट,विवाहोत्तर संयम इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. (ब) शिक्षण: शिक्षणामुळे लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्याची समज निर्माण होते. (क) साधनसंपत्तीत अधिक लोकसंख्येची पोषणक्षमता विज्ञान व तंत्रज्ञानाच्याप्रगतीमुळे नवनवीन साधनसंपत्ती शोधता येते

    सिद्धान्तावरील आक्षेप / टीका:

    • भूमिती श्रेणीने वाढ :

    माल्यसने लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत आहे असे मत मांडले आहे, परंतु प्रत्यक्षात जगातील विविध भागात लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीने झालेली आढळत नाही. उलट, काही पाश्चात्त्य देशात तर लोकसंख्येत घट श्रेणीने वाढत आहे.

    • अन्नधान्य उत्पादनात गणिती श्रेणीने वाढ :

    अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने वाढत आहे. हे मान्यसचे मतही चुकीचे आहे. माल्यसने शेतीक्षेत्रातील विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा व संशोधनाचा परिणाम लक्षात घेतला नाही. तसेच सुधारित बी-बियाणे, शेती अवजारे, यंत्रे व कीटकनाशकामुळे जगातील काही भागात शेती उत्पादनात गणिती श्रेणीपेक्षा अधिक पटीने वाढ होत आहे.

    • अन्नधान्य व लोकसंख्या यामध्ये नेहमीच असमतोल नसतो :

    लोकसंख्या- वाढ ही अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा जास्त जास्त असल्यामुळे यांच्यामध्ये असमतोल निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होतात असे म्हटले आहे. परंतु टीकाकारांच्या मते, बहुतांशी वेळा बऱ्याच देशात अशा प्रकारचा असमतोल असल्याचे आढळत नाही. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याचे आढळते. उदा., संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्राईल इत्यादी राष्ट्र अन्नधान्याची निर्यात करतात.

    • स्त्री-पुरुषांमधील आकर्षणामुळे लोकसंख्येत अपरिहार्य वाढ:

    माल्थसने स्त्री-पुरुषातील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्यावाढीचा वेग कायम राहणार असे मत मांडले. परंतु माल्थसने जरी लैंगिक आकर्षण असले तरी त्यामुळे लोकसंख्यावाढ अटळ ठरते हे लक्षात घेतले नाही. उदा., फ्रान्समध्ये लैंगिक आकर्षण तेवढेच असले तरी आपला सुधारित राहणीमानाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी त्या लोकांनी संयमाने लोकसंख्यावाढ मर्यादित ठेवली आहे. कुटुंबनियोजनाची नवी साधने व सामाजिक बदलामुळे माल्यसचे भाकीत खोटे ठरविले आहे.

    • लोकसंख्यावाढ म्हणजे संकट :

    कॅनन यांच्या मते, लोकसंख्यावाढ श्रमशक्तीत वाढ ही वस्तुस्थितीही आपण विसरता कामा नये.

    • लोकसंख्येचे प्रतिबंधात्मक उपाय लोकांना न पेलणारे:

    लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय सुचविलेले होते, त्यांचा वापर अतिशय मर्यादित प्रमाणातच होऊ शकेल. उशिरा लग्न, नैतिक संयम, ब्रह्मचर्य इ. सर्वसामान्य व्यक्ती या मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता खूपच कमी असते.

    सिद्धान्ताचे महत्त्व / टीका:

    • माल्थसने पूर्वीच्या विचारांचे संकलन करून विचारात एकसुसूत्रता व नियमन आणून लोकसंख्यावाढीचा सिद्धान्त मांडला.

    • माल्यसच्या लोकसंख्यावाढीच्या सिद्धान्तामुळे प्रथमच लोकसंख्येचे प्रश्न व समस्यांचा सामाजिक शास्त्राच्या अभ्यासात समावेश करण्यात आला.

    • माल्थसच्या सिद्धान्तामुळे लोकसंख्या समस्यांना शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झाले.

    • माल्यसच्या सिद्धान्तामुळे लोकसंख्येच्या समस्यांविषयी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत, नियोजनकार यांचे लक्ष वेधले गेले

    • सध्याही अनेक देशांच्या लोकसंख्यावाढीच्या बाबतीत माल्यसचा सिद्धान्त काही अंशी बरोबर ठरतो

    No comments:

    Post a Comment

      प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...