tipeharish.blogspot.com

Friday, December 2, 2022

हवा व हवामानाचे घटक

हवा (Weather): 

  • कोणत्याही ठिकाणी वातावरणाचे तापमान, दाब, वारा, आर्द्रता आणि वृष्टीमुळे अल्पकाळासाठी होणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय.
  • एखाद्या ठिकाणची ठराविक वेळेची अल्पकालीन वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय
  • वातावरणाच्या क्षणिक अवस्थेला हवा म्हणतात.त्याचा संबंध निश्चित ठिकाण व निश्चित वेळेशी असतो. हवा वेळेनुसार बदलत असते 

हवेचे घटक किंवा हवेची अंगे (Elements of Weather):
  • हवेचे तापमान
  • वायुभार वारे
  • आर्द्रता
  • वारे 
  • वृष्टी 
  • दृष्यता
हवेचे तापमान (Temperature) :
वातावरणातून सुर्याची किरणे भूपृष्ठावर येऊन पडतात त्यामुळे भूपृष्ठ तापते. प्रथम भूपृष्ठालगतचा हवेचा घर तापतो त्याच्या संपकनि नंतर जमिनीपासून वर हवेचे घर तापू लागतात. ही क्रिया उष्णतेचे उत्सर्जन होऊन होते.  वातावरणाचे तापमान भूपृष्ठाजवळ जास्त तर जास्त उंच प्रदेशात कमी असते. तापमान कमी होण्याचा दर समुद्रसपाटीपासून १६० मीटर उंचीस १°सें.ग्रे.असा आहे. तापमान मोजण्यासाठी सें.ग्रेड, फरेनाईट, केल्वीन, कमाल व किमान तापमापक आणि तापमान लेखक या उपकरणांचा वापर केला जातो.

हवेचा भार / वायुभार (Air Pressure) :
हवेला वजन असते. समुद्रसपाटीस दर चौरस इंचाला १४.७ पौंड किंवा दर चौरस सेंटिमीटरवर सुमारे १ किलोग्रॅम एवढा हवेचा भार असतो. उंचीनुसार ही हवा विरळ होत जाते. सुमारे ६ कि.मी. उंचीवर हवेचा  भार निम्म्याने कमी होतो. समुद्रसपाटीवर हवेचा भार १०१३.२ मि. बार इतका असतो. सर्वसाधारणपणे १०८ मीटर्स उंचीला १ सें.मी. किंवा १२.३ मिलीबारी वायुभार कमी होतो.तापमान आणि वायुभार यांचे प्रमाण व्यस्त स्वरूपाचे असते. तापमान जास्त असल्यास वायुभार कमी असतो. हवेचा भार मोजण्यासाठी  साधा वायूभार मापक, फोर्टिनचा वायुभार मापक, निर्द्रव वायुभार मापक आणि वायुभार लेखक या उपकरणांचा वापर केला जातो.

आर्द्रता (Humidity) :
हवेत असलेल्या बाष्पाच्या अस्थित्वालाच आर्द्रता म्हणतात. आर्द्रता हा वातावरणातील महत्त्वाचा घटक आहे. बाप्पाच्या प्रमाणावर हवेतील आर्द्रता अवलंबून असते. हवेत बाष्पाचे प्रमाण जितके जास्त असेल तितकी हवेची आर्द्रता वाढत असते. कमी बाप्प असलेली हवा कोरडी असते. जास्त बाष्प असलेली हवा दमट असते. आर्द्रतेचे निरपेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता असे तीन प्रकार आहेत.

वारे (Winds) :
जास्त भाराच्या प्रदेशातील हवा थंड व जड असते तर कमी भाराच्या प्रदेशातील हवा उष्ण व हलकी असते. • परिणामी जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागते. हवेच्या हालचालीलाच 'वारा' म्हणतात.  वाऱ्याची दिशा व वेग मोजण्यासाठी वात दिग्दर्शक आणि वायुवेग मापक उपकरणांचा वापर केला जातो.

वृष्टी (Precipitation) :
बाप्प संपृक्त हवेचे तापमान कमी झाले तर हवेची बाप्प धारणा शक्ती कमी होऊन पर्जन्याच्या किंवा हिमाच्या स्वरूपात भूपृष्ठावर येते. बाष्प संपृक्त हवेचे तापमान ४.४° सें.ग्रे. (४०° फॅ.) पेक्षा जास्त असेल तर बाप्पाचे सांद्रिभवन होऊन जलवृष्टी होते पण हेच तापमान ०° सें.ग्रे. पेक्षा कमी झाले तर बाष्पाचे घनीभवन होऊन गारांचा पाऊस किंवा हिमवृष्टी होते.

दृष्यता (Visibility) :
वातावरण धूसर किंवा अंधुक झाल्यास दूरच्या वस्तू / घटना दिसत नाहीत याला कमी दृष्यता  असे म्हणतात. पाऊस पडत असताना किंवा धुके पडले असताना वातावरण धूसर किंवा अंधूक होते त्यामुळे दूरचे दिसत नाहीत. याउलट आकाश स्वच्छ सुर्यप्रकाशित असेत तर दूरपर्यंत दिसते .


हवामान (Climate): 
  • एखाद्या प्रदेशावरील वातावरणाच्या परिस्थितीचा अनेक वर्षे अभ्यास केल्यावर आढळणारी वातावणाची सर्वसाधारण स्थिती असते यास हवामान म्हणतात.
  • कोणत्याही ठिकाणच्या हवेचे सातत्याने अनेक वर्षे निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीची जी सरासरी काढली जाती त्याला हवामान असे म्हणतात. 
  • एखाद्या ठिकाणचा ३० ते ४० वर्षे वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान निश्चित केले जाते. कोणत्याही ठिकाणचे तापमान ठरविण्यासाठी तापमान आणि पर्जन्य या दोन घटकांना जास्त महत्त्व दिले जाते.उदा. एखाद्या प्रदेशात सातत्याने अनेक वर्षे हवा थंड असेल तर तेथील हवामान शीत ठरविले जाते किंवा एखाद्या ठिकाणच्या हवेचे तापमान व आर्द्रता सातत्याने अनेक वर्षे जास्त आढळल्यास तेथील हवामान उष्ण दमट आहे असे म्हणतात.
हवामानावर परिणाम करणारे घटक :
  • अक्षांश
  • समुद्रसपाटी पासून उंची
  • समुद्र सानिध्य
  • समुद्र प्रवाह
  • प्रचलित वारे
  • मेघाच्छादन
  • वनस्पतीचे आच्छादन 
  • प्रदेशाचा उतार
अक्षांश:
विषुववृत्ताकडे म्हणजेच कमी अक्षांशावर वर्षभर सुर्यकिरणे लंबरूप पडत असतात तर ध्रुवीय प्रदेशाकडे म्हणजेउच्च अक्षांशाकडे ती तिरपी होत जातात. परिणामी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त उष्णता तर ध्रुवाकडे उष्णतेचे प्रमाण कमी कमी होत जाते. या उष्णतेमुळे हवेच्या तापमानामध्ये फरक पडतो म्हणूनच विषुववृत्तापासून कर्क व मकरवृत्ता पर्यंत हवामान उष्ण बनते. मध्य कटिबंधीय प्रदेशात ते मध्यम असते. तर ध्रुवीय प्रदेशात हवामान शीत  आहे.


समुद्रसपाटीपासूनची उंची : समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तस तसे तापमान कमी कमी होत जाते. कारण सूर्यकिरणे जरी वातावरणातून येत असली तरी त्यामुळे वातावरण तापविले जात नाही. प्रथम भूपृष्ठ तापते व वहन क्रियेने एकाच्या एक वरचे थर तापविले जातात. परिणामी भूपृष्ठाजवळ तापमान जास्त असते तर भूपृष्ठापासून जास्त उंचीवर तापमान कमी असते. सर्व साधारणपणे दर १६० मीटर उंचीला १° से. ग्रेडने तापमान घटते. त्यामुळे अधिक उंचीवरील ठिकाणे ही थंड हवामानाची व  आल्हादायक हवामानाची बनलेली आहेत. उदा. उटी, महाबळेश्वर, नैनिताल 

समुद्र सानिध्य : जमीन व पाणी यांचे तापण्याचे व थंड होण्याचे गुणधर्म भिन्न आहेत. जमीन लवकर तापते व लवकर थंड होते याउलट पाणी उशिरा तापते उशिरा थंड होते. या  गुणधर्मामुळे समुद्र किनाऱ्या जवळील जमीनीवरील हवा जास्त तापून, हलकी होऊन वर  जाते. तेथे तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठी समुद्रावरील थंड बाप्पायुक्त हवा तेथे येते. ही हवा जमीनीवरील तापमान वाढू देत नाही. तसेच ही हवा स्वतः बरोबर बाष्प वाहून आणते व जमीनी वरील हवेला ते पुरविते. त्यामुळे समुद्र किनाऱ्या लगत जमीनीवरील हवामान सम व दमट बनते. मात्र समुद्रापासून दूर खंडांतर्गत भागात हवा जास्त उष्ण व कोरडी राहून तेथील हवामान उष्ण व कोरडे बनते. उदा. समुद्रकिनाऱ्यावरील मुंबईचे हवामान सम-दमट आहे तर तेथून दूर खंडांतर्गत भागात असलेल्या सोलापूरचे हवामान उष्ण व कोरडे आहे.

समुद्र प्रवाह : समुद्रातून उष्ण व थंड पाण्याचे प्रवाह वाहत असतात. जर समुद्र किनाऱ्या जवळून उष्ण पाण्याचा प्रवाह वाहत असेल तर त्यावरील उष्ण किंवा उबदार हवा जमीनीकडे वाहत जाऊन जमिनीवरील हवेचे तापमान वाढविते त्यामुळे तेथील हवामान उबदार किंवा उष्ण बनते. याउलट थंड प्रवाह वाहत असल्यास त्यावरील थंड हवा जमीनीकडे चाहत जाऊन जमीनीवरील हवेचे तापमान कमी करते व तेथील हवामान थंड बनते उदा. लॅब्रेडोर या थंड समुद्र प्रवाहामुळे न्यूफाउंडलँड किनाऱ्यावरील हवा फारच थंड झाली असून हवामान शीत बनले आहे. तर कॅनरी या शित प्रवाहामुळे सहाराच्या पश्चिम किणाऱ्यावरील हवा थंड व कोरडी बनली आहे.

प्रचलित वारे :
  नित्य व नियमित वाहणाऱ्या  प्रचलित वारे म्हणतात.उष्ण प्रदेशातील वारे उष्ण तर थंड प्रदेशातील वारे थंड असतात.  जर उष्ण प्रदेशातील उष्ण वारे थंड प्रदेशाकडे वाहत गेल्यास ते त्या प्रदेशातील तापमान वाढवितात आणि थंड प्रदेशातील वारे उष्ण प्रदेशाकडे वाहत गेल्यास तेथील तापमान कमी करतात. वाऱ्यांच्या गुणधर्माला अनुसरून त्या भागातील हवामान तयार होते. उदा. नॉर्वे ध्रुवाजवळ असूनसुध्दा पश्चिमी उष्ण वाऱ्यामुळे नॉर्वेचा किनारा गोठत नाही. तेथील हवामान उबदार बनते.

मेघाच्छादन :
आकाश सतत मेघाच्छादित राहिल्यास भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौरशक्तीत अडथळा येतो त्यामुळे भूपृष्ठ कमी तापून त्यावरील हवेचे तापमान कमी राहण्यास मदत होते. परिणामी हवामान सौम्य बनते. या उलट आकाश सतत निरभ्र रहात असल्यास पृथ्वीकडे येणाऱ्या व अवकाशाकडे परत जाणाऱ्या सौरशक्तीत कोणताही अडथळा येत नाही त्हयामुळे  हवा दिवसा जास्त  उष्ण  व रात्री खूप थंड होऊन तेथील हवामान विषम प्रकारचे बनते उदा. सहाराचे हवामान 

वनस्पतीचे आच्छादन :
वनस्पती दाटीवाटीने वाढलेल्या असल्यास वनस्पती सूर्यकिरणे जमीनी पर्यंत पोहचू देत नाहीत. त्यामुळे जमिनीला कमी उष्णता मिळून जमीन कमी तापते. वनस्पती श्वासोच्छवासातून सतत बाप्प बाहेर टाकतात. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून तेथील हवामान दमट बनण्यास मदत होते. याउलट परिस्थिती ओसाड प्रदेशात किंवा विरळ वनस्पतीच्या प्रदेशात आढळते.

प्रदेशाचा उतार :
दोन भिन्न उतारावर भिन्न प्रकारचे हवामान आढळते. त्याला सुर्याचे भासमान भ्रमण कारणीभूत ठरते. सुर्याचे भासमान भ्रमण होताना सूर्य उत्तर व दक्षिण दिशेत कर्क आणि मकर वृत्तापर्यंत जातो. त्यामुळे उत्तर-दक्षिण उतार असलेल्या भूप्रदेशात त्याच्या विषुववृत्तीय उताराला सौरशक्ती जास्त तर ध्रुवाकडील उताराला ती कमी मिळते. परिणामी त्या दोन्ही उतारावर भिन्न भिन्न प्रकारचे हवामान तयार होते. परिणामी विषुववृत्ताकडील उतार नेहमीच उबदार तर ध्रुवाकडील उतार थंड आढळतात.

  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...