tipeharish.blogspot.com

Tuesday, September 17, 2024

 

प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान

महाराष्ट्राचे स्थान :

१.     निरपेक्ष स्थान :

 महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य असून राज्याने भारतीय  द्वीपकल्पाचा पश्चिम, वायव्य व मध्य भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश ४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे  उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे.  महाराष्ट्राचा आकार दक्षिणेकडे अरुंद आहे, तर उत्तरेकडे विस्तृत स्वरुपाचा आहे.  महाराष्ट्राच्या उत्तरेस गुजरात, पूर्वेस छत्तीसगड, आग्न्येयेस तेलंगना,  दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्ये तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे.

२.    सापेक्ष स्थान :

·     क्षेत्रफळ : महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ८०० किमी. असून उत्तर-दक्षिण लांबी ७२० किमी इतकी आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण भोगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी  ९.३६  टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत  महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान आणि मध्यप्रदेश नंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.

·     भूरचना : महाराष्ट्राची भूरचना भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने वेगळी व वैशिष्टयपूर्ण अशी आहे. महाराष्ट्राचा फार मोठा भाग पठारी आहे. महाराष्ट्रात लहानमोठे पर्वत आहेत. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व तामीळनाडूच्या खालोखाल उंच शिखरे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात मैदानी भाग मात्र कमी आहे.

·     समुद्रकिनारा : महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. गुजरात, आंध्र व तामीळनाडू नंतर समुद्रकिनाऱ्याच्या लांबीबाबत महाराष्ट्राचा क्रमांक ४ था लागतो.

·     जलप्रणाली : महाराष्ट्रातून लहानमोठ्या अनेक नद्या वाहतात. ह्या नद्या पूर्व, पश्चिम व दक्षिण वाहिनी आहेत. महाराष्ट्रातून वाहत गेलेल्या गोदावरी नदीचा भारतातील लांब नद्यांत समावेश होतो.

·     हवामान : महाराष्ट्राचे हवामान मोसमी प्रकारचे असले तरी राज्यात स्थानपरत्वे हवामानात थोडी भिन्नता आढळते. विशेषतः किनारवर्ती व अंतर्गत भागातील हवामानात फरक आढळतो.

·     जमीन : महाराष्ट्रात काळी लाव्हारसाची, गाळाची, जांभी (लॅटराईट) हे जमिनीचे प्रमुख प्रकार असून भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लाव्हा जमिनीचे क्षेत्र जास्त आहे.

·     जंगले : भारतातील जंगलाचे क्षेत्र ७.१६ लक्ष चौ. कि. मी. असून देशाच्या २१. ७२% भागावर जंगले आहेत. महाराष्ट्रात ६१५७९ चौ. कि.मी. क्षेत्रात जंगले आढळतात.

·     जलसिंचन : महाराष्ट्रातील ३२.९२ लक्ष हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आहे. भारतात जलसिंचनाखाली असलेल्या एकूण जमिनीच्या १३.१% जमीन महाराष्ट्रात जलसिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात कालवे, विहिरी व उपसा सिंचनाचा विकास झालेला आहे.

·     शेती : कृषि क्षेत्रात महाराष्ट्राने बरीच प्रगती केलेली आहे. भारताच्या ११.५% लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रात आहे. कापूस, ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात वरचा क्रमाक लागतो.

·     मासेमारी : मासेमारीत महाराष्ट्राचा भारतात १ ला क्रमांक आहे. महाराष्ट्रात सागरी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते.

·     खनिजे : महाराष्ट्रात अशुद्ध लोखंड, मँगनीज इत्यादी खनिजे सापडतात. यात मँगनीज महत्त्वाचे आहे. मँगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा मध्यप्रदेशानंतर २रा क्रमांक लागतो.

·     शक्तिसाधने : महाराष्ट्रात दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही शक्तिसाधने सापडतात. जलविद्युत उत्पादनात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात अणु ऊर्जेचा बराच विकास झालेला आहे.

·     उद्योगधंदे : उद्योगधंद्याबाबतीत महाराष्ट्र भारतामध्ये अग्रेसर आहे. देशाच्या २०% औद्योगिक मालाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. सुतीकापड उत्पादनात महाराष्ट्राचा देशात १ ला क्रमांक आहे. देशाच्या ३५% कापडाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. साखर उद्योगात महाराष्ट्राचा भारतात १ ला क्रमांक व कागद उद्योगात २ रा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ऑटोमोबाईल्स, खत, इंजिनीरिंग, काच इत्यादी उद्योगांचाही विकास झालेला आहे.

·     लोकसंख्या : २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११कोटी २४ लक्ष इतकी होती. देशाच्या ९.२८% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे.

 

 

 

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अतिशय साधी व सोपी आहे. महाराष्ट्राचा बराच मोठा भाग पठारी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली पर्वताची रांग असून या पर्वतरांगेपासून पूर्वेस अनेक डोंगररांगा गेलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील पर्वतरांग आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान किनारपट्टीचा प्रदेश आहे. या प्रकारे महाराष्ट्राच्या भूरचनेत थोडी विविधता आढळते; भूरचनेच्या दृष्टीने महाराष्ट्राचे खालील तीन मुख्य विभाग पडतात :

१.     समुद्रकिनारपट्टीचा प्रदेश / कोकण किनारपट्टी

२.    पर्वतीय व डोंगराळ प्रदेश / सह्याद्री किंवा पश्चिम घाट

३.    पठारी प्रदेश. /

१. समुद्रकिनारपट्टीचा प्रदेश / कोकण किनारपट्टी :

महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान किनारपट्टीचा प्रदेश आहे. याचा विस्तार उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे. यात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात याला "कोकण" म्हणतात. या किनारपट्टीची लांबी ७२० कि. मी. आहे. याची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस ती कमी आहे. या किनारपट्टीची रुंदी ४५ ते ७५ कि. मी. आहे. हा समुद्रकिनारपट्टीचा प्रदेश असला तरी बराच उंचसखल आहे; कारण या प्रदेशात सह्याद्री पर्वताच्या उपशाखा व सुळके सर्वत्र विखुरलेले आहेत. या प्रदेशाच्या किनाऱ्याला लागूनच गाळाची चिंचोळी मैदाने आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे या किनारपट्टीची उंची वाढताना आढळते. या किनारपट्टीची कमीत कमी उंची ५ मीटर आणि जास्तीत जास्त उंची ३०० मीटर आहे. या प्रदेशात अधून मधून लहानमोठ्या खाड्या निर्माण झाल्या आहेत. यांपैकी दातीवार, वसई, घरमतर, राजपुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली, तेरेखोल इ. महत्त्वाच्या खाड्या आहेत. या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांमुळे या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. या प्रदेशात उल्हास, माडखोल, वैतरणा, वशिष्ठी या नद्यांची खोरी आहेत. या प्रदेशात सागरी लाटांच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण झालेली भूमिस्वरूपे आढळतात. उदा. सागरी गुहा, तरंगघर्षित चबुतरे, आखाते, पुळण, वाळूचे दांडे, इत्यादी. या किनारपट्टीचे उत्तर कोकण, मध्य कोकण, आणि दक्षिण कोकण असे तीन भाग पडतात. तसेच या किनारपट्टीच्या पश्चिम व पूर्व दिशेत समुद्रकिनाऱ्याजवळची सखलपट्टी (खलाटी), पश्चिमेकडील डोंगराळ भाग (वलाटी) व सह्याद्रीचा पश्चिमेकडील उताराचा भाग असे तीन उपविभागही पडतात.

२.पर्वतीय व डोंगराळ प्रदेश / सह्याद्री किंवा पश्चिम घाट

महाराष्ट्राचा बराचसा भाग पर्वत व डोंगररांगांनी व्यापलेला आहे. यात सह्याद्री पर्वत, सातमाळा, अजिंठा, बालाघाट, हरिश्चंद्र, महादेव इत्यादी डोंगररांगांचा समावेश होतो.

सह्याद्री :

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर उत्तर- दक्षिण पसरलेला सह्याद्री पर्वत प्रमुख आहे. यास 'पश्चिम घाट' असेही म्हणतात. सह्याद्रीचा विस्तार उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी सुमारे ६५० कि. मी. आहे. सह्याद्रीची पश्चिम बाजू तीव्र उताराची व पूर्व बाजू सौम्य उताराची आहे. उत्तरेस सह्याद्रीचर्ची रुंदी जास्त असून दक्षिणेस याची रुंदी कमी कमी होत गेली आहे; परंतु महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. सह्याद्रीची सर्वसामान्य उंची १३०० मीटर आहे. सह्याद्रीची बहुतेक शिखरे १४०० मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत. नाशिक जिल्ह्यातील 'कळसूबाई' हे सह्याद्रीचे सर्वांत उंच शिखर आहे. याची उंची १६४६ मीटर आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. नाशिक जिल्ह्यातीलच साल्हेर (१५६७ मीटर) व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (१४३८ मीटर) ही सह्याद्रीची इतर उंच शिखरे आहेत. सह्याद्री पर्वतात अधून मधून लहाना मोठचा खिंडी आहेत. यांना 'घाट' म्हणतात. या पर्वताच्या उत्तरेस थळघाट, बोरघाट आणि दक्षिणेस कुंभाली, अंबा, फोंडा, अंबोली व नाना घाट प्रमुख आहेत. या खिंडीतून काही महत्त्वाचे पक्के रस्ते व लोहमार्ग गेलेले आहेत; त्यामुळे देश व कोकण हे एकमेकांस जोडले गेलेले आहेत. सह्याद्रीतील घाट : १) थळघाट (उत्तरेकडे), २) माळशेज घाट, ३) बोर (खंडाळा) घाट, ४) वरंधा घाट, ५) खंबाटकी घाट, ६) परसणी घाट, ७) आंबेनळी घाट, ८) कुंभार्ली घाट, ९) आंबा घाट, १०) फोंडा घाट, ११) आंबोली घाट

 सह्याद्री पर्वताचा बहुतांश भाग दुर्गम आहे. याच भागात शिवकालीन किल्ले आढळतात. उदा. सिंहगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड इत्यादी. सह्याद्री हा एक प्राचीन पर्वत असल्याने याची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. तरी या पर्वतात अधूनमधून तीव्र उताराचे भाग आढळतात.

सातमाळ - अजिंठा : सह्याद्री पर्वताच्या पूर्वस पश्चिम पूर्व दिशेत अनेक डोंगररांगा गेलेल्या आहेत. त्यांपैकी उत्तरेस सातमाळ-अजिंठा ह्या डोंगररांगा आहेत. ह्या डोंगररांगा पश्चिमेस नाशिक व धुळे जिल्ह्यातून अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतून नांदेड जिल्ह्याच्या पूर्वेकडील सरहद्दीपर्यंत गेलेल्या आहेत. डोंगराची सभोवतालच्या प्रदेशापासून सर्वसाधारण उंची २०० ते ३०० मीटर एवढी आहे. देवगिरीचा (दौलताबाद) किल्ला व अजिंठा लेणी याच पर्वतरांगांतीत आहेत. या रांगामुळे उत्तरेकडे तापी व दक्षिणेकडे गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले आहे.

हरिश्चंद्र -बालाघाट रांगा : या रांगांमुळे गोदावरी व भीमा खोरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत. बालाघाट डोंगररांगा अहमदनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यात विस्तारल्या आहेत.

महादेव डोंगररांगा : या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. या रांगामळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी अलग झाली आहेत.त्र्यंबकेश्वर डोंगर, माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची भूवैशिष्ट्ये आहेत.

सातपुडा रांगा : राज्याच्या उत्तरेकडे नंदूरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे. पूर्व-पश्चिम विस्तार असलेल्या सातपुड्याचा फारच थोडा भाग राज्यात समाविष्ट होतो. नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे एकमेकांपासून अलग झाली आहेत.नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार’ म्हणून ओळखले जाते.अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या’ असे म्हटले जाते.

महाराष्ट्र पठार -

            पश्चिम घाट व कोकण किनारपट्टीचा प्रदेश सोडून महाराष्ट्राचा उर्वरित भाग हा दख्खनच्या पठाराची भूमी  असून सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण – पश्चिम भागात झालेल्या ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा रसाचे थर एकमेकांवर साचून या पठाराची निर्मिती झाली आहे.थरांच्या या रचनेला ‘डेक्कन ट्रॅप’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थरांची जाडी ही पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतांमध्ये अधिक तर पूर्वेला विदर्भाकडे कमी होत जाते. त्यामुळे पठाराची उंचीही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. म्हणजेच पठाराचा उतार हा पूर्वेकडे (आग्नेयेकडे) आहे. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या खणन कार्यामुळे महाराष्ट्र पठारावर अनेक डोंगररांगा व नद्यांची खोरी निर्माण झाली.  सह्याद्री पर्वंत रांगेच्या पूर्वे पासून पसलेल्या सातमाळा, अंजिठा, हरिशचंद्र, बालाघाट व महादेव टेकड्या महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडे उंची नुसार एकाच दिशेने संपूर्ण महाराष्ट्रात पठार विखुरलेल्या आहेत. या रांगा दरम्यान गोदावरी, भीमा व कृष्णा नदीचे खोरी आहेत. महाराष्ट्र पठाराची विभागणी विविध घटकामध्ये झालेली आढळली ती पुढीलप्रमाणे -

सातमाळ या डोंगररांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे. अजिंठा या डोंगररांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे. हरिश्चंद्रगड या डोंगररांगेच्या दक्षिण दिशेला अहमदनगर पठार आहे. बालाघाट डोंगर रांगेच्या पश्चिमेला बालाघाट पठार आहे. तर  मांजरा नदीच्या खोऱ्यात मांजरा पठार आहे. शंभू महादेव डोंगर रांगेच्या पश्चिम दिशेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत. शंभू महादेवाच्या डोंगर रांगेच्या मध्यभागात औंध चे पठार , दक्षिणेला  खानापूरचे पठार आहे व त्यापुढे सांगली जिल्ह्यात जत चे पठार, उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे.

 

महाराष्ट्र नदी प्रणाली :

नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते.

१.       तापी नदी

             मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत मुलताई येथे तापी नदीचा उगम पावते. तापी नदीचा एकूण प्रवाह ७२४ किमीचा आहे तर महाराष्ट्रातील प्रवाह हा २०८ किमीचा आहे. तापी नदीचे प्रवाह एकूण क्षेत्रफळ ६५,१५० चौ किमी आहे तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ ३१,६६० चौ. किमी आहे. तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे.

            दक्षिणेस सातमाळा-अजिंठा डोंगररांगा आणि उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान सखल भागातून तापी नदी वाहते. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्राला मिळते. महाराष्ट्रातील तिचा प्रवाह हा अमरावती, जळगाव, धुळे नंतर नंदुरबार या जिल्ह्यातून होतो. पूर्णा नदी हि तापी नदीची मुख्य उपनदी आहे हि विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येऊन तापीला मिळते. त्यामुळे तापीनदीचे  खोरे महाराष्ट्रात तापी- पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते. तापी- पूर्णा खोरे हे अमरावती, अकोला, बुलढाणा,धुळे, नंदुरबार असे आहे.

उपनद्या :

उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या: नागझिरी,मोर,गुळी,अनेर,अरुणावती,गोमती,वाकी

दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या :  कापरा, शिवना, गाडगी, पूर्णा,वाघूर, गिरणा,बोरी, अंजनी, पांझरा,बोराई, अमरावती, शिवा, नेसू 

२. नर्मदा नदी 

            नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे सातपुडा पर्वतरांगेत होतो. तिची एकूण लांबी १३१२ किमी  आहे तर महाराष्ट्रातील लांबी ५४ किमी आहे. नर्मदा नदी प्रवाह मध्य प्रदेश, महाराष्ट्र नंतर गुजरात मधील भरूच येथे खंबायतच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.  अरुंद अशा खोल घळईतून तसेच खचदरीतून वाहते.नर्मदा नदीच्या उगमापासून काही अंतरावर कपिलधारा हा २५ मीटर उंचीचा धबधबा आहे. जबलपूर येथे धुवांधार हा ३५ उंचीचा धबधबा आहे.नर्मदा नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य भागातून वाहते.

उपनद्या : 

उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या: हिरण,कोलार, बरना, ओसरंग

दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या : बंजार, शेर, शक्कर,  गंजाल, तवा, कुंडी (महाराष्ट्रातील उपनद्या: उदाई, देवगंगा, देवनाड )

३. गोदावरी नदी:

        गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात होतो.गोदावरीची एकूण लांबी १४६५ किमी. आहे तर महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी आहे.गोदावरी नदी सातमाळा,अजिंठा डोंगररांगांच्या दक्षिणेकडून वाहते तर हरिश्चंद्र, बालाघाट डोंगररांगांच्या उत्तरेकडून वाहते. गोदावरी नदीचा प्रवास हा महाराष्ट्रामध्ये  नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड,परभणी नांदेड आणि पुढे गडचिरोली असा एकूण आठ जिल्ह्यातून होतो. सर्वात जास्त लांबीचा प्रवाह महाराष्ट्रतून जातो.गोदावरी नदीस वृद्धगंगा किंवा दक्षिणगंगा म्हणूनही संबोधले जाते. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जात बंगालच्या उपसागराला मिळते.

गोदावरी नदीच्या उपनद्या(डाव्या बाजूने मिळणाऱ्या)

·       कादवा नदी: कादवा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील वणी डोंगररांगात होतो.तिची लांबी ७४ किमी.आहे. नांदूरमधमेश्वर हे अभयारण्य कादवा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.

·       शिवना नदी: शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगररांगात होतो.तिची लांबी ११० किमी.आहे.

·       खाम नदी: खाम नदीचा उगम दौलताबाद किल्ल्याजवळ होतो.

·       दक्षिण पूर्णा:  दक्षिण पूर्णा नदीचा उगम औरंगाबाद मधील अजिंठा डोंगररांगात होतो.तिची लांबी २७३ किमी. आहे. तिचा प्रवाह मार्ग औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी असा आहे. तिला अंजना, गिरीजा,जीवनरेखा,काथरा, दुधना, घामना, खेळणा अशा उपनद्या आहेत.

·       प्राणहिता नदी:  प्राणहिता नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातून वाहते तीची एकूण लांबी १२० किमी आहे. वर्धा व पैनगंगा या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो तिथून या दोन्ही नद्यांना प्राणहिता या नावाने ओळखले जाते. 

·       इंद्रावती नदी: इंद्रावती नदीचा उगम ओडिशा राज्यातील रामपूर जिल्ह्यात होतो तिथून ती वाहत महाराष्ट्रात येते.तिची एकूण लांबी ५३५ किमी आहेत तर महाराष्ट्रातील लांबी १२९ किमी आहे.

गोदावरी नदीच्या उपनद्या(उजव्या  बाजूने मिळणाऱ्या)

·       दारणा नदी:  गोदावरी नदीला तिच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांपैकी दारणा हि एक नदी आहे त्या नदीचा उगम उगम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे होतो. तिची लांबी ८८ किमी आहे.

·       प्रवरा नदी:  प्रवरा नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे होतो.तिची लांबी २०८ किमी आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा हे धरण आहे तर त्याची उंची साधारणतः ८२.३ मीटर आहे. मुळा आणि आढळा ह्या दोन प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत.

·       सिंदफणा नदी: सिंदफणा नदीचा उगम बीड जिल्यातील पाटोदा येथे चिंचोली टेकड्यांमध्ये होतो. तिची लांबी १२२ किमी आहे तर किन्हा, बिंदुसरा, कुंडलिका ह्या उपनद्या आहेत.

·       बिंदुसरा नदी: बिंदुसरा नदीचा उगम बीड येथील बालाघाट डोंगररांगेत होतो.हि नदी पुढे जाऊन सिंदफणा नदीला मिळते.

·       मांजरा नदी: मांजरा नदीचा उगम बीड जिल्यातील पाटोदा येथे बालाघाट डोंगररांगेत होतो. तीचा प्रवाह मार्ग बीड, उस्मानाबाद, लातूर नांदेड अशा आहे तर तिची लांबी ७२४ किमी आहे. लातूर शहर मांजरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. उत्तरेकडून केज, रेना,लिंबा,चौसाळा,धरणी,लेंडी,मन्याड ह्या उपनद्या मिळतात तर दक्षिणेकडून तावरजा आणि तेरणा ह्या उपनद्या मिळतात.

४. कृष्णा नदी

Rivers in Maharashtra: Krishna River System          पठारी महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेस कृष्णेचे खोरे आहे. कृष्णा नदी सह्याद्रीत महाबळेश्वर येथे उगम पावते पुढे वाहत कर्नाटक, तेलंगणा आणि  आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे बंगालच्या उपसागरात मिळते.

           कोयना, वारणा व पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य तीन उपनद्या आहेत. कृष्णा नदीची एकूण लांबी १४०१ किमी. आहे तर महाराष्ट्रातील तिची लांबी २८२ किमी. आहे.

          कृष्ण नदीच्या खोऱ्याची उत्तरेकडील मर्यादा म्हणजे शंभू महादेव डोंगर व दक्षिणेस चिकोटी डोंगर, ज्योतिबा डोंगर यांच्या दरम्यान आहे. तर पश्चिमेस सहयाद्री पर्वत. कृष्णा नदीचा प्रवाह हा उत्तर दक्षिण असून सह्याद्री पर्वतास बऱ्याच अंशी समांतर आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाऱ्या तिच्या उपनद्या साधारणतः सह्याद्री पर्वतात व शंभू महादेव डोंगर यात उगम पावतात. कृष्णा नदीला डावीकडून म्हणजेच उत्तरेकडून येरळा नदी मिळते. तर उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी ह्या नद्या मिळतात.

·       वेण्णा नदी:  वेण्णा नदीची लांबी ६४ किमी आहे. ती महाबळेश्वर येथे उगम पावते. सातारा जिल्ह्यातील माहुली येथे वेण्णा नदी कृष्णा नदीला मिळते.

·       कोयना नदी: कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. तिची लांबी ११९ किमी.आहे तर कोयना नदीवर महाराष्ट्रातील सर्वात उंच कोयना धरण आहे. धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजीसागर म्हणतात. कोयना धरणाचा प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी उपयोग करण्यात येतो.

·       वारणा नदी: वारणा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात प्रचितगड येथे होतो.सांगली जिल्ह्यात हरिपूर येथे जाऊन कृष्णा नदीला मिळते. वारणा नदीवर चांदोली धरण आहे.

·       पंचगंगा नदी : पंचगंगा नदी म्हणजे पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह यामध्ये कुंभी,कासारी,सरस्वती, तुळशी आणि भोगावती नद्यांचा समावेश होतो.

·       घटप्रभा नदी :  घटप्रभा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात कोल्हापूर जिल्ह्यात होतो.तिची एकूण लांबी २८३ किमी. आहे तर महाराष्ट्रातील तिची लांबी ६० किमी आहे. घटप्रभा नदीवर गोकाक हा प्रसिद्ध धबधबा आहे.

५. भीमा नदी:

Rivers in Maharashtra: Bhima River Systemभीमा ही कृष्णेची उपनदी असून महाराष्ट्राबाहेर कृष्णेला मिळते. उगम पुणे मधील अंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ उगम पावते. महाराष्ट्रातील लांबी- ४५१ किमी असून प्रवाहात तिला अनेक उपनद्या मिळतात. भीमेची एकुण लांबी ८६० किमी आहे. पंढरपूर जवळ भीमानदीचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून तिला चंद्रभागा' म्हणतात. कर्नाटकातील रायपुर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा नदयांचा संगम होतो. भीमा नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने पुणे व सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. पवित्र तीर्थ क्षेत्र पंढरपुरातून भीमा नदी वाहते.

नदीच्या उपनद्या : उजव्या (दक्षिण) : भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, कहा, बोर, नीरा, माण

डाव्या (उत्तर) : वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना, भोगावती

६. वर्धा नदी:

वर्धा नदी मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावते. महाराष्ट्रात वर्धा नदीची एकूण लांबी 465 किमी आहे चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.

उजव्या (पश्चिम) : माडू, पेनगंगा, वेमला, निरगुडा  

डाव्या (पूर्व) : कार, वेणा, जाम, बोर, नंद, इरई, वैनगंगा

७. वैनगंगा नदी:

वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत झाला आहे. विदर्भात ती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.

उजव्या (पश्चिम) : कन्हान, मूल, सूर, बावनथडी, पेंच, नाग, पेनगंगा       

डाव्या (पूर्व) : वाघ, चूलबंद, गाढवी, दीना

कोकणातील प्रमुख नद्या:

१.वैतरणा : वैतरणा नदीचा उगम नाशिक येथील त्र्यंबकेश्वर अंजनेरी डोंगररांगेत होतो. हि नदी पुढे वाहत जात पालघर येथे अरबी समुद्राला दातिवरे खाडीतून मिळते.तिची एकूण लांबी १५४ किमी आहे. कोकणातील हि सर्वाधिक लांब नदी आहे. वैतरणा नदीवर मोडकसागर हे धरण आहे. उपनद्या:  पिंजाळ,देहरजा,सूर्या व तानसा

२. उल्हास नदी : उल्हास नदीचा उगम लोणावळ्याजवळ राजमाची टेकडीत होतो. तिची एकूण लांबी १४५ किमी आहे. उल्हास नदी पुणे, रायगड आणि ठाणे अशी वाहत येत अरबी समुद्राला मिळते. उल्हास नदीच्या भातसा, काळू, मुरबाडी आणि भिवपुरी, बारवी, भिवपुरी ह्या उपनद्या आहेत.

३. सावित्री नदी : सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो सावित्री नदी रत्नागिरी, रायगड अशी वाहत येत बाणकोट खाडीतून अरबी समुद्राला मिळते. तिची एकूण लांबी 38 किमी आहे. 

४. पाताळगंगा नदी: उगम: – गडबाद डोंगर, बोर घाट , लांबी  45 किमी असून रायगड जिल्ह्यातून धरमतर च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते. उपनदी: भोगवती

५. सावित्री नदी :उगम: – महाबळेश्वर  लांबी: – 38 किमी  उपनद्या: काळ, गंधार, घोड. रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. बाणकोटच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते

६. वशिष्ठी नदी: उगम: – सह्याद्री पर्वतरांग, रत्नागिरी जिल्हा. लांबी: – 68 किमी उपनद्या: गडगडी व जगबुडी

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्रात प्रमुख ऋतू :

महाराष्ट्राचे सर्वसाधारण हवामान मोसमी प्रकारचे आहे, परंतु वर्षभराचा विचार केल्यास, महाराष्ट्रात वर्षभर हवामानाची परिस्थिती सारखी नसते. वर्षभरातील हवामानाची परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्रातील हवामानाची विभागणी पुढीलप्रमाणे केली जाते :

१) ईशान्य मान्सून हवामान

               अ) शीत ऋतू

 ब) उष्ण ऋतू

२) नैर्ऋत्य मान्सून हवामान

 अ) वर्षा ऋतू

 ब) शरद ऋतू

 

 

१) ईशान्य मान्सून हवामान

 अ) शीत ऋतू

 ब) उष्ण ऋतू

 

अ) शीत ऋतू :

महाराष्ट्रात मध्य डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत शीत ऋतू असतो. याला हिवाळा किंवा थंड ऋतू म्हणतात. या ऋतूत हवामानाची परिस्थिती पुढीलप्रमाणे असते.

 

तापमान : या काळात महाराष्ट्रात तापमान कमी असते या ऋतूत दिवसाचे सरासरी कमाल तापमान किनारपट्टीच्या भागात ३२ सेल्सियस व अंतर्गत भागात ते २८ सेल्सियस असते. या वेळी दिवसाचे किमान तपमान कोकणात २१ सेल्सियस तर मराठवाडा व विदर्भात ते १४ सेल्सियस असते. या काळात सर्वांत कमी तापमान उत्तर महाराष्ट्रात म्हणजे १२सेल्सिअस असते. या वेळी नाशिक जिल्हयाच्या काही भागात तापमान गोठणबिंदूपर्यंत जाते. या वेळी समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशात अंतर्गत भागापेक्षा रात्रीचे तपमान थोडे जास्त असते. या ऋतूत अंतर्गत भागात दैनंदिन तापमान कक्षा जास्त तर समुद्रकिनाऱ्याजवळ ती कमी असते. उदा. पुण्याची तापमान कक्षा २५ सेल्सियस व मुंबईची तापमान कक्षा ५ सेल्सियस असते.

 

वायुभार व वारे : हिवाळयात महाराष्ट्रातील तापमान कमी होत असल्याने सर्वत्र जास्त भार निर्माण होतो. संपूर्ण महाराष्ट्रात या वेळी १०१४ ते १०१७ मिलीबार इतका हवेचा भार असतो. तरी मध्य व पूर्व महाराष्ट्रात हवेचा भार जास्त आणि महाराष्ट्राच्या दक्षिण व पश्चिम किनाऱ्यालगत हवेचा भार कमी असतो; त्यामुळे वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे मंद गतीने वाहतात.

 

पर्जन्य व आर्द्रता : महाराष्ट्रात वाहणारे ईशान्य मोसमी वारे जमिनीवरून वाहत असल्याने कोरडे असतात; त्यामुळे या वाऱ्यांपासून फारसा पाऊस पडत नाही. या वाऱ्यांपासून पूर्व महाराष्ट्रात थोडा पाऊस पडतो. या ऋतूत महाराष्ट्रातील पर्जन्याची सरासरी १० सें.मी. असते. एकंदरीत हा ऋतू कोरडा असतो. या काळात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. या वेळी अंतर्गत भागात सकाळी ४५ टक्के व समुद्रकिनाऱ्याजवळ ६०-७५ टक्के आर्द्रता असते. या ऋतूत पिके परिपक्व होऊ लागतात. या काळात आकाश स्वच्छ असल्याने रात्री दंव पडते; त्यामुळे पिके चांगली येतात.

 

ब) उष्ण ऋतू (Hot Season)

महाराष्ट्रात मार्च ते मे या काळात उष्ण ऋतू असतो याला उन्हाळा किंवा वसंत ऋतू असेही म्हणतात. या ऋतूत हवामानाची परिस्थिती पुढीलप्रमाणे असते.

 

तापमान : या ऋतूत संपूर्ण महाराष्ट्रात तापमान जास्त असते. तरी पश्चिम भागापेक्षा मध्य व पूर्व भागात तापमान जास्त असते. या काळात पूर्वेस विदर्भात ३६ सेल्सियसपर्यंत तापमान असते. या वेळी विदर्भातील चंद्रपूरचे तापमान ४५ सेल्सियस इतके असते. या वेळी उत्तर व मध्य महाराष्ट्रातही तापमान जास्त (३४° सेल्सियस) असते. पश्चिमेस कोकण भागात या ऋतूत समुद्रसान्निध्यामुळे तापमान कमी (३२ सेल्सियस) असते. बहुतेक भागात दैनिक तापमान कक्षा जास्त असते. या वेळी विदर्भात २४ सेल्सियस, मध्य महाराष्ट्रात २० सेल्सियस व कोकणात १८ सेल्सियस इतकी तापमान कक्षा असते.

 

वायुभार व वारे : या काळात महाराष्ट्रात तापमान जास्त असल्यानेहवेचा भार कमी होतो. एप्रिलमध्ये हवेचा भार १००८ ते १०१० मिलीबार असतो; तर मध्य व पूर्व महाराष्ट्रापेक्षा पश्चिमेस समुद्रकिनाऱ्यालगत हवेचा भार थोडासा जास्त असतो.

या काळात सर्वत्र उष्ण व कोरडे वारे वाहत असतात. या वेळी अंतर्गत भागात वावटळी व धुळीची वादळे निर्माण होतात. एप्रिल - मे महिन्यात अशा वादळांचे प्रमाण जास्त असते.

 

आर्द्रता : या ऋतूत संपूर्ण महाराष्ट्रात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. या वेळी पठारावर सरासरी १०-२० टक्के इतकी आर्द्रता असते. पश्चिम किनारपट्टीत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते.

 

पर्जन्य : हा कोरडा ऋतू असला तरी या ऋतूत थोडा पाऊस पडतो. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर जिल्हयांत १० सें.मी. पर्यंत पाऊस पडतो. हा पाऊस बहुतेक दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह पडतो. कधी कधी या पावसाबरोबर गारांचा वर्षावदेखील होतो. हा पाऊस आंब्याच्या पिकास उपयुक्त असल्याने यास 'आंबेसरी' किंवा 'आम्रसरी' (Mango Showers) म्हणतात. या पावसामुळे अनेक भागांत पिण्याचे पाणी उपलब्ध होते; तसेच उन्हाळी पिकांना जीवदान मिळते. ह्या पावसानंतर हवा थोडी आल्हाददायक होते. महाराष्ट्राच्या इतर भागात पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे ५ सें.मी. पेक्षा कमी असते. या ऋतूत तापमान जास्त असते.

 

२) नैर्ऋत्य मान्सून हवामान

           अ) वर्षा ऋतू

           ब)  शरद ऋतू

 

अ) वर्षा ऋतू (Rainy Season)

जून ते सप्टेंबर हा महाराष्ट्रातील वर्षा ऋतूचा कालावधी आहे. याला पावसाळा असे म्हणतात

 

वायुभार व वारे : मे महिन्याच्या उत्तरार्धात भारताचे तापमान अधिक होऊन भारताच्या उत्तर भागात अतिशय कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. या वेळी दक्षिणेस हिंदी महासागरावर जास्त भाराचा प्रदेश असतो. त्यामुळे हिंदी महासागरावरील जास्त भाराच्या प्रदेशावरून कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. हे वारे अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरून भारताच्या दिशेने वाहू लागतात. यांनाच नैऋत्य मोसमी वारे म्हणतात.

 

पर्जन्य : साधारणपणे ७ जूनला हे वारे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर येऊन थडकतात. यास 'मान्सूनचा स्फोट' म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीत खूप पाऊस पडतो. विशेषतः सह्याद्रीला हे वारे अडल्याने पश्चिम बाजूवर या वाऱ्यांपासून खूप पाऊस पडतो. याला 'प्रतिरोध पाऊस' (Relief Rainfall) म्हणतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून कोकणात २५० ते ३०० सें.मी. पाऊस पडतो. उंच भागात पावसाचे प्रमाणयाहीपेक्षा जास्त असते. उदा. महाबळेश्वर येथे ६६३ सें.मी. तर अंबोली येथे ७४७ सें.मी. पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पूर्वेकडे मात्र पर्जन्याचे प्रमाण कमी असते. सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात (Rain Shadow Region) येत असल्याने, पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असते. उदा. वाई येथे ५० सें.मी., पुणे येथे ६६ सें.मी. व धुळे येथे ६८ सें.मी. पाऊस पडतो. अहमदनगर, सोलापूर व मराठवाडा विभागात पावसाचे प्रमाण फारच कमी असते. पुढे विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त होते; कारण विदर्भातील काही जिल्हयांचा भाग वनस्पतींनी आच्छादलेला आहे. या काळात भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत १५० सें.मी. पाऊस पडतो, तर अमरावती जिल्हयातील चिखलदरा येथे १७० सें.मी. पाऊस पडतो.

 

तापमान व आर्द्रता: वास्तविक जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडत असल्याने महाराष्ट्राचे तापमान कमी होते; शिवाय या काळात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. या वेळी किनारपट्टीच्या भागात ८० ते ९० टक्के तर अंतर्गत भागात ६० ते ८० टक्के आर्द्रतेचे प्रमाण असते; त्यामुळेही महाराष्ट्रात वर्षा ऋतूच्या काळात तापमान कमी होते. उन्हाळ्यापेक्षा पावसाळयात महाराष्ट्रात दैनिक तापमान कक्षा कमी असते. तरीसुद्धा अंतर्गत व किनारावर्ती भागातील तापमान कक्षेत फरक असतो. महाराष्ट्रातील शेती या ऋतूवर अवलंबून असल्याने या ऋतूला खूप महत्त्व आहे. खरीप पिकांच्या दृष्टीने या ऋतूला जास्त महत्त्व आहे. महाराष्ट्रात पावसाळा सुरू होताच सर्वत्र पेरण्या सुरू होतात. या ऋतूच्या सुरुवातीस ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद, कापूस, तूर, भात इत्यादी पिकांची पेरणी होते. या ऋतूत पडणारा पाऊस वेळेवर व समाधानकारक पडला तर या पिकांचा हंगाम चांगला असतो.

 

ब) शरद ऋतू (The Post Monsoon Period)

शरद ऋतू म्हणजे पावसाळयाचा उत्तरार्ध व हिवाळयाचा पूर्वार्ध आहे. ऑक्टोबर ते मध्य डिसेंबर हा या ऋतूचा काळ होय. या ऋतूत नैऋत्यमोसमी वारे भूमिखंडावरून परतू लागतात. म्हणजेच या वेळी मोसमी वाऱ्यांची दिशा बदलून ती ईशान्येकडून नैऋत्येकडे होते. या ऋतूला परतीच्या मोसमी वाऱ्यांचा ऋतू (Period of Retreating Monsoon) म्हणतात. या ऋतूत हवामानाची परिस्थिती पुढीलप्रमाणे असते.

 

पर्जन्य : ईशान्य मान्सूनपासून महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडतो. हा पाऊस हिवाळी पिकांसाठी उपयुक्त असतो. परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून पूर्व महाराष्ट्रात अधिक पाऊस पडतो. इतर भागात पावसाचे प्रमाण कमी असते. या वेळी महाराष्ट्रात सरासरी १० सें.मी. पाऊस पडतो.

 

आर्द्रता : शरद ऋतूत महाराष्ट्रातील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. तरी किनारावर्ती भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्तच असते. या वेळी किनारपट्टीच्या भागात ६० ते ८० टक्के आणि अंतर्गत भागात ६० ते ६५ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण असते.

 

तापमान : या ऋतूत विशेषतः ऑक्टोबरमध्ये दिवसाच्या सरासरीतापमानात वाढ झालेली आढळते; पण त्यानंतर दिवसाचे व रात्रीचे तापमान कमी होते. या काळात किनारपट्टीच्या प्रदेशात दिवसाचे सरासरी तापमान ३० सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २५ सेल्सिअस इतके असते, तर अंतर्गत भागात दिवसाचे तापमान ३२ सेल्सिअस व रात्रीचे तापमान २३ सेल्सिअस इतके असते.

 

वायुभार व वारे : या ऋतूत दिवसाचे तापमान थोडे जास्त असले तरी वर्षा ऋतूपेक्षा थोडे कमीच असते; त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या वायुभारात वाढ होते. प्रामुख्याने अंतर्गत भागात हवेचा भार १०१० मिलीबार इतका असतो. या वेळी हवेच्या भाराचा उतारही कमी असतो; त्यामुळे वारे मंद गतीने वाहत असतात. वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. या वेळी आकाश निरभ्र असते; त्यामुळे तापमान वाढून उष्मा होतो. या ऋतूत हवा स्वच्छ व सूर्यप्रकाश भरपूर असल्याने पिके परिपक्व होतात. या ऋतूत थोडा पाऊस पडतो. हा पाऊस खरीप पिकांना व पुढे रब्बी पिकांना चांगला असतो. रब्बीच्या पिकांसाठी हिवाळी पाऊस फारच उत्तम असतो.

 

 

 

  प्रकरण १. महाराष्ट्र प्राकृतिक रचना व हवामान महाराष्ट्राचे स्थान : १.      निरपेक्ष स्थान :   महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम क...